तळेगाव दाभाडे, ता.४ ः तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. ६) सकाळी ७.०० वाजता तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर असलेल्या छत्रपती श्री शिवशंभू तीर्थ येथे अभिषेक व पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी हा हा सोहळा आयोजित केला आहे.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आयपीएस वैभव निंबाळकर हे उपस्थित राहणार असून, त्यांच्या शुभहस्ते अभिषेक व पूजन विधी होणार आहेत. छत्रपती श्री शिवशंभू तीर्थ स्मारकाच्या अनावरणानंतर प्रथमच हा अभिषेक सोहळा होत आहे.
इतर कार्यक्रम :
-तळेगाव शहरातील सर्व मंडळांकडून गडकोट किल्ल्यांवरून आणण्यात आलेल्या शिवज्योतींचे भव्य स्वागत सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत करण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्ष संतोष दाभाडे व सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
-सायंकाळी नऊ वाजता ग्रामदैवत डोळसनाथ महाराज उत्सव समिती आयोजित श्री शिवजयंती मिरवणुकीचा छत्रपती शिवशंभू स्मारक येथे भव्य समारोप होणार असून, त्यानंतर नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम शिवशंभू तीर्थ समिती अध्यक्ष संतोष भेगडे (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे शहरातील सर्व शिवभक्त नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.