मुंबई : अजितदादांच्या अपघातामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी जनता अस्वस्थ आहे, त्यामुळे त्यांच्या अपघाताची चौकशी ही पारदर्शक व्हावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच ज्या लोकांमुळे आपल्याला संसदेत जायची संधी मिळाली त्यांच्या भावनेशी प्रामाणिक राहा असा सल्लाही त्यांनी पार्थ पवारांना दिला. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्याचं निश्चित झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी सर्वांचं आभार मानले आणि सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "गेल्या सहा दशकांपासून ज्या लोकांनी शरद पवारांनी साथ दिली ते लोक आजही आमच्यासोबत आहेत. बारामतीच्या लोकांचं मी आभार मानते. 1967 पासून सुरू झालेला पवार साहेबांचा राजकीय प्रवास हा बारामतीच्या जनतेमुळे आजही सुरू आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे आभार. आज बिनविरोध झालेल्या प्रत्येक उमेदवाराला शुभेच्छा."
अजित पवारांच्या अपघातावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "अजितदादांवर प्रेम करणारी सर्वच जनता अस्वस्थ आहे. त्यामुळे अजितदादांच्या अपघाताचा पारदर्शक तपास व्हावा अशी सर्वांचीच मागणी आहे. यावर वारंवार रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, तसेच जय पवारांनीही त्यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे दादांच्या अपघाताची पारदर्शच चौकशी व्हावी."
पार्थ पवारांना सल्ला काय?
संसदेची पायरी चढतो ती संधी फक्त आणि फक्त बारातमी लोकसभा मतदारसंघामुळे मिळाली आहे. जोपर्यंत त्यांच्या भावनेशी प्रामाणिक राहशील तोपर्यंत ही पायरी चढत राहशील असा सल्ला मला शरद पवारांनी दिला होता. तोच सल्ला मी पार्थला, एक आत्या म्हणून देते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लोकसभा आणि राज्यसभेत कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचे. जेव्हा बोलायची वेळ येईल त्यावेळी अभ्यासपूर्ण बोलायचं. कारण त्या ठिकाणी बसलेला व्यक्ती आपल्यापेक्षा ज्ञानी असतो आणि देश आपल्याकडे बघत असतो, असा सल्ला सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना दिला.
राज्यातील सात जागांसाठी होणारी राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होणार आहे. सात जागांसाठी सात उमेदवारांचे अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामध्ये महायुतीच्या सहा जागा आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार निवडून जाणार आहेत.
ही बातमी वाचा: