मुंबई : भारतीय शेअर बाजारातील घसरणीला आज ब्रेक लागल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यानं सेन्सेक्स वधारला. गेल्या काही दिवसात सेन्सेक्स 4 टक्क्यांनी घसरला होता, आजच्या तेजीमुळं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. सेन्सेक्स 900 अंकांनी वधारुन 80015.90 अंकांवर पोहोचला तर एनएसईवर निफ्टी 50 निर्देशांक 24765.90 अंकांवर पोहोचला.
बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.44 टक्क्यांनी वाढला तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 1.38 टक्क्यांनी वाढला. शेअर बाजार आज अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धामुळं झालेल्या नुकसानातून सावरताना दिसून आला. भारतीय रुपया कालच्या तुलनेत सुधारला असून 91.60 रुपये डॉलरवर पोहोचला आहे.
भारतीय शेअर बाजारात काल झालेल्या घसरणीमुळं सेन्सेक्सवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 457 लाख कोटींवरुन घसरुन 447 लाख कोटींवर आलं होतं. आजच्या 900 अंकांच्या तेजीमुळं 453 लाख कोटी रुपयांवर आलं आहे. म्हणजेच आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
गेल्या चार दिवसांमध्ये सेन्सेक्समध्ये 3160 अंकांची घसरण झाली होती. त्यामध्ये आज सुधारणा झाली. आज सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला आहे. इराणनं अणवस्त्र कार्यक्रम सशर्त थांबवण्याचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चा समोर आल्यानं आणि संघर्ष थांबण्याची चिन्ह समोर आल्यानंतर बाजार मजबूत झाला असं, जिओजित इन्वेस्टमेंटस लिमिटेडचे विनोद नायर यांनी म्हटलं.
भारतीय शेअर बाजारात आज रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी, एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये तेजीदिसून आली. तर, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
दरम्यान, भारतीय शेअर बाजारात काल सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण झाली होती. गुंतवणूकदारांचं काल 10 लाख कोटींचं नुकसान झालं होतं. तर, मंगळवारी सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरल्यानं गुंतवणूकदारांचं 7 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
भारतीय शेअर बाजारात आज एलटी फूडसच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. एलटी फूडसचा शेअर 15 टक्क्यांपर्यंत वधारला. एलटी फूडसच्या शेअरनं 416 रुपयांचा टप्पा गाठल्याचं पाहायला मिळालं.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा