स्वखर्चाने बांधले ग्रामपंचायत कार्यालय
भिलारेवाडीच्या ‘आदर्श जनसेवा’चा उपक्रम; लोकार्पण उत्साहात
ढेबेवाडी, ता. ५ : वाल्मीक पठारावरील भिलारेवाडी (वडदनगाव, ता. पाटण) येथील आदर्श जनसेवा भिलारेवाडी मंडळाने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रामपंचायतीसाठी स्वखर्चाने सुसज्ज कार्यालय उभारले. नुकतेच त्याचे लोकार्पण झाले. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाचे विविध कार्यक्रमही उत्साहात झाले.
दुर्गम वाल्मीक पठारावर १९७५ ला मंडळाची स्थापना झाली. मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांच्या हस्ते मंडळाने स्वखर्चाने नव्याने बांधलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण झाले. नवीन इमारतीमुळे ग्रामस्थांची प्रशासकीय कामे अधिक सुलभ व गतिमान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, पंचायत समिती सदस्य नितीन काळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालिंदर पाटील, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भिलारे, राहुल पेंढारकर, जनसहकारचे संस्थापक मारुती मोळावडे, बाजार समितीचे संचालक जोतिराज काळे, बनपुरीचे सरपंच मनोज पाटील, मनोज मोहिते, निवास साबळे, धनाजी भिलारे, किशोर पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यानिमित्त वासू पाटील यांनी खेळ पैठणीचा कार्यक्रम सादर केला. कोल्हापूर येथील कलाकारांच्या ‘गाथा महाराष्ट्राची’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंडळाने गावात प्रत्येक कुटुंबास घड्याळ, बॅग भेट दिली. मान्यवरांसह रामचंद्र असवले, अशोक भिलारे, विठ्ठल भिलारे, अविनाश काटकर आदींची भाषणे झाली. विश्वास भिलारे यांनी प्रास्ताविक केले. युवराज भिलारे यांनी आभार मानले.
-----------------
चौकट
..........
पोलिस अधीक्षकांकडून सन्मान
जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनीही मंडळाच्या कार्याचा आढावा घेऊन कौतुक केले. संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भिलारे, आत्माराम भिलारे, शाहीर भिलारे, पोलिस पाटील कृष्णा मोरे, तुकाराम भिलारे आदींनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार स्वीकारला. मंडळातर्फे श्री. दोशी यांचाही सन्मान झाला.
--------------------
B08169
भिलारेवाडी : कार्यक्रमात बोलताना यशराज देसाई. त्या वेळी मान्यवर.
---------------