नागरिकांच्या महसूल प्रश्नांचे तातडीने निराकरण होणार
esakal March 05, 2026 10:45 PM

भिवंडी, ता. ५ (वार्ताहर) : सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन अडचणींचे त्वरित निराकरण व्हावे; तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नवीन तरतुदींबाबत जनजागृती करून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने भिवंडी तहसीलदार कार्यालयातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा १’ राबविण्यात येणार आहे. मार्च ते मे या कालावधीत महसूल मंडळ स्तरावर विविध ठिकाणी ही शिबिरे होणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली.

अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना महसूल सेवांचा त्वरित आणि सुलभ लाभ मिळवून देणे. विशेषत: डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर सुनिश्चित करून नागरिकांना ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना विविध दाखले व महसूल विषयक कामांसाठी वारंवार कार्यालयाचे फेरे मारण्याची गरज भासणार नाही. शिबिरांमध्ये नागरिकांच्या अनेक प्रलंबित महसूल कामांचा निपटारा करण्यात येणार आहे. यात प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ उताऱ्यातील चुका दुरुस्त करणे, डिजिटल स्वाक्षरी असलेले ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र देणे, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, तसेच अकृषिक (NA) परवानग्या आणि संबंधित तरतुदींविषयी मार्गदर्शन व सुधारणा करण्यात येणार आहेत. या शिबिरांमुळे नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी व कमी वेळेत मिळणार असल्याने शेतकरी व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अभिजित खोले यांनी केले आहे.

देण्यात येणाऱ्या सेवा
नवीन व्यवस्थापनानुसार ‘सनद’ प्रक्रियेची माहिती देणे, विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखले वाटप करणे, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनासंबंधी प्रकरणांचा निपटारा करणे, घरांसाठी पट्टे वाटप करणे, ई-मोजणी अर्ज स्वीकृती, अँग्रीस्टक आणि पीएम-किसान योजनेसाठी नोंदणी यांसारख्या सेवाही शिबिरांमधून दिल्या जाणार आहेत. तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगी संदर्भातील कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याचे कामही करण्यात येणार आहे.

तारखांनुसार शिबिरे
अभियानांतर्गत विविध महसूल मंडळांमध्ये नियोजित तारखांनुसार शिबिर होणार आहे. ७ मार्चला भिवंडी मंडळातील पोलिस संकुल येथे, ९ मार्चला अनगाव मंडळातील ग्रामपंचायत कार्यालय, १४ मार्चला अप्पर भिवंडी मंडळातील दापोडे ग्रामपंचायत कार्यालय, १६ मार्चला अंबाडी मंडळातील ज्ञानेश्वर माउली मंदिरात शिबिर होणार आहे. तसेच, १० एप्रिलला पडघा मंडळातील बी. बी. पाटील हायस्कूल येथे, १७ एप्रिलला खारबाव मंडळातील कारीवली ग्रामपंचायत कार्यालयात, ८ मे रोजी शेलार मंडळातील मंडळ अधिकारी कार्यालय, मिठपाडा; तर १५ मे रोजी राहूर मंडळातील ग्रामपंचायत कार्यालय, डोहाळे येथे शिबिर होणार आहे. ही सर्व शिबिरे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.