महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत ही कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात, त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणाही सरकारकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या घोषणेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही तकलादू आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. ऑक्टोबर महिन्यात आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. बहुतांश शेतकऱ्यांची पीक कर्जे ही साडेतीन ते चार लाख इतकी आहेत. दोन लाखांच्या वरची रक्कम भरल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
मेटाकुटीला आलेला शेतकरी दोन लाखांच्या वरची रक्कम कशी भरणार? हा प्रश्न आहे. फळ उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था देखील बिकट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे जो शेतकरी नियमित कर्ज भरत होता, तो देखील आता थकीत झाला आहे. सरकारने केलेली ही कर्जमाफी बँकांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी आहे? असा प्रश्न पडतो, अशी टीका त्यांनी केलीय.
किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले म्हणाले की, कर्जमाफी घोषणेचे स्वागत आहे. मात्र, 30 जून 2026 पर्यंतचे कर्ज माफ करावे, अशी आमची मागणी होती. मोठ्या प्रमाणात शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहतील याची भीती आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 50 हजार प्रोत्साहन अनुदान ही त्यांची बोळवण आहे. त्यांचा देखील विचार व्हावा अशी आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आणखी वाचा
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र?
आणखी वाचा