महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आज (6 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सादर होणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या अर्थसंकल्पात नाशिक शहर आणि जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाच्या विकासकामांची घोषणा करण्यात आली असून धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा, उद्योग आणि शेती या सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
नाशिकच्या धार्मिक महत्त्वाला लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात असल्याने त्यांच्या विकासासाठी पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून त्र्यंबकेश्वर परिसराचा पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकास केला जाणार आहे.
याशिवाय नाशिकमधील महत्त्वाकांक्षी ‘रामकाल पथ’ विकास प्रकल्पाला गती देण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. रामायणकालीन वारसा आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक आणि इतर आवश्यक कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नाशिकसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. नाशिक विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार आणि टर्मिनलचे आधुनिकीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे 1,000 कोटी रुपयांच्या रिंग रोड प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच नाशिकची पुणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या महामार्गांच्या सहापदरीकरणावरही भर देण्यात येणार आहे, ज्यामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल.
शेती क्षेत्रासाठीही मोठी घोषणा करण्यात आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत सप्टेंबर 2025 पर्यंतचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाचा मोठा फायदा नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा आणि इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असल्याचे मानले जात आहे. तसेच राज्य जलमाहिती केंद्र नाशिक येथे उभारण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या केंद्राच्या इमारतीसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नागपूरनाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे ग्रोथ हब विकसित करण्याची योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि शहरी विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा