Dattatray Bharane farmers statement : शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर कृषीमंत्री दत्ता भरणे म्हणाले, "५० हजार रुपये शेतकऱ्यांना मोठा आधार..."
esakal March 07, 2026 08:45 AM

Farmer loan waiver Maharashtra 50 thousand : राज्य सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेची घोषणा करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शेतकरी कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल आपण त्यांचे विशेष आभार मानतो, असे भरणे यांनी सांगितले. राज्यातील शेतकरी मोठ्या निर्णयाची अपेक्षा करत होते. अर्थसंकल्पातून सरकारने त्या अपेक्षांची दखल घेतल्याने शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

भरणे म्हणाले, की हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. शेतकरी कर्जमाफीबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांची मदत देण्याची तरतूद सरकारने केली आहे. त्यामुळे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळणार आहे.

Devendra Fadnavis Agriculture AI : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 'महाविस्तार-एआय, शेतीत होणार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरच; फडणविसांची मोठी घोषणा

कर्जमाफीची घोषणा होत असतानाच ‘लाडकी बहीण’ योजना बंद होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र या योजनेसाठी सरकारने अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे या योजनेला नव्याने बळ मिळाले असून महिलांसाठी सरकारची बांधिलकी कायम असल्याचेही भरणे यांनी स्पष्ट केले.

अर्थसंकल्पातील या निर्णयामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार असून राज्यातील कृषी क्षेत्राला दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.