डॉ. सुवर्णा बोबडे समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ
ही जुनी गोष्ट तुम्ही ऐकली असेल- बेडकीच्या पिल्लांनी एकदा बैल पाहिला आणि त्या ‘मोठ्ठ्या’ प्राण्याविषयी ती आईला सांगू लागली. ते ऐकून अस्वस्थ झालेली बेडकी ‘आपणही मोठे दिसू शकतो,’ असं म्हणून स्वत:ला फुगवत राहिली... आणि शेवटी ती फुटली.
एक महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही- ज्या गोष्टीत मी दुसऱ्यासारखा व्हायचा प्रयत्न करत आहे, ती गोष्ट माझ्यासाठी खरोखर साध्य, सुसंगत आणि वास्तववादी आहे का? हा विचार न केल्यामुळे तुलना अनेकदा आंधळी स्पर्धा होते. मग आपण ध्येयाकडे नाही तर फक्त दुसऱ्याच्या सावलीच्या मागे भरकटत राहतो.
तुलना ही आपल्याला रोज जाणवणारी आणि अगदी सहज घडणारी मानसिक सवय आहे! ‘गीताच्या मुलाला किती चांगले मार्क्स मिळाले’, ‘तिने बघ किती पटकन प्रमोशन मिळवलं’, ‘ती माझ्याच वयाची आहे, पण कित्ती काय काय करते ती! आणि मी...’ तुलना म्हणजे स्वतःकडे किंवा आप्तस्वकीयांकडे, आपल्या परिस्थितीकडे दुसऱ्याच्या संदर्भातून बघणे. मग तुलना करायचीच नाही का? ते खरंच शक्य आहे का? प्रामाणिक उत्तर असं, की तुलना न करणे अवघड आहे. परंतु तुलना कशी करावी हे शिकता येऊ शकतं.
अस्वस्थ तुलना (‘अनहेल्थी’)
जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा नकळत आपल्या मनातल्या काही मापदंडांवरून एक लपलेला निष्कर्ष तयार होतो. उदा. ‘मला त्याच्यासारखं व्हायला हवं होतं’, ‘माझं मूल तिच्यासारखं का नाही?’ पण वास्तव काय आहे? की आपण कुणासारखे होऊ शकत नाही. आपलं मूल कुणाच्या मुलासारखं होऊ शकत नाही. हे माहीत असूनही आपण तुलना करतो. कारण तुलना करण्यामागे उद्देश असतो, तो इतर आहेत तसंच बनण्याचा. उदा. शेजारच्या मुलाला क्रिकेट छान येतं म्हणून आपल्या मुलालाही जबरदस्तीने क्रिकेटचं कोचिंग लावणं, ऑफिसमध्ये कुणी तरी उशिरापर्यंत काम करतं म्हणून स्वतःही तसंच करणं. हल्ली सोशल मीडिया तुलना वाढवण्याचं एक मोठं साधन झालं आहे. तिथे आपल्याला लोकांचं जीवन, त्याचं यश, आनंद, प्रवास, साजरे क्षण असं संपादित (एडिटेड) आणि निवडक (सिलेक्टेड) स्वरूपात दिसतं. संघर्ष, अपयश, कंटाळवाणे दिवस हे फारसे दिसत नाहीत. मग आपण नकळत आपल्या संपूर्ण आयुष्याची तुलना दुसऱ्यांच्या ‘हायलाइट रील’शी करायला लागतो. यामुळे मनात कमीपणाची भावना, असमाधान, चिंता, हेवा, मत्सर आणि असुरक्षितता वाढू शकते. कधी कधी ही तुलना आर्थिक ताणही निर्माण करते. दुसऱ्यांसारखं दिसावं, जगावं, दाखवावं यांसाठी अनावश्यक खर्च, कर्ज किंवा दिखाऊपणाकडे आपण वळतो.
आरोग्यदायी तुलना (‘हेल्थी’)
यात तुलना करताना आपल्याला तो माणूस व्हायचं नसतं. आपल्याला त्याच्यातलं काहीतरी दिसतं आणि ते आपल्याला आपल्यात बघायचं असतं. जर एखादी गोष्ट आपल्यासाठी साध्य, सुसंगत आणि वास्तववादी असेल, तर आपण त्या व्यक्तीसारखं होण्याचा प्रयत्न न करता त्यांच्याकडून आपण काही शिकू शकतो.
आरोग्यदायी तुलनेमध्ये उद्देश दुसऱ्यासारखं होणं हा नसतो, तर स्वतःला थोडं अधिक सक्षम बनवणं हा असतो. स्वतःचं अधिक विकसित रूप घडवणं. उदा. ‘मैत्रिणीने नियमित व्यायाम सुरू ठेवला आहे... मलाही ‘फिटनेस’कडे लक्ष द्यायचं आहे.’ आता हे तिचं आयुष्य नाही, तर माझं ध्येय बनतं!
Premium: Interview: 'एनएसडी' मध्येही मी अनेक चुकीच्या गोष्टी शिकले, पण..; अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांची रोखठोक मुलाखतआरोग्यदायी तुलना कशी काम करते, त्याचे टप्पे बघू. हे ‘फिटनेस’चंच उदाहरण घेऊ-
• १) सुरुवात
मी आज कुठे आहे?- मी फिटनेस ला प्राध्यान्य देत नाही.
• २) दिशा
मला कुठे पोहोचायचं आहे?- रोजचा व्यायाम सातत्याने करणं.
• ३) भर कशावर?
शेवटावर नाही, तर प्रक्रियेवर. उदा. रोज थोडा सराव, छोटा बदल, छोटं पाऊल- कालपेक्षा आज ५ मिनिटं जास्त व्यायाम.
• ४) स्पर्धा
दुसऱ्याशी नाही, स्वतःशी.
उदा. ‘ती रोज लवकर उठते’- ‘मी उद्या १० मिनिटं लवकर उठून बघतो.’ किंवा ऑफिसमध्ये- ‘सहकाऱ्याचं सादरीकरण कौशल्य चांगलं आहे/ तो मीटिंगमध्ये भरपूर मुद्दे मांडतो’- ‘मलाही माझी मांडणी सुधारायची आहे/ मी पुढच्या मिटिंगमध्ये एक मुद्दा मांडीन.’
पालकत्वात तुलना कशी करायची हे कौशल्य फार महत्त्वाचं असतं. कारण पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या विचारपद्धतीवर खोल परिणाम करत असतो. जणू त्यांच्या मनाचे ‘प्रोग्रॅमर’च असतो. आपण सतत इतरांशी तुलना केली, तर मुलांच्या मनात हीनतेची भावना, मत्सर किंवा असुरक्षितता निर्माण होऊ शकते. पण योग्य पद्धतीने तुलना केली, तर मुलांसाठी ती स्वतःला अधिक चांगले बनवण्याची प्रेरणा ठरू शकते. म्हणूनच पालकांनी मुलांवर दुसऱ्यासारखे बनण्याचा दबाव न आणता स्वतःच्या प्रगतीशी तुलना करून शिकण्याची सवय लावणं अधिक आरोग्यदायी ठरतं.
उदा. अस्वस्थ तुलना- ‘पहा, तुझा मित्र किती नीट आणि स्वच्छ लिहितो!’
आरोग्यदायी तुलना- ‘तुला काय वाटतं?... अक्षर सुधारायला आपण रोज ५ मिनिटं सराव करू शकतो का?’ इथे लक्ष दुसऱ्यावरून स्वतःच्या प्रगतीवर येतं.
स्वतःशी स्पर्धा केल्याचे फायदे असे होतात, की गती स्वीकारता येते (‘मी हळू का होईना, पुढे जातोय’), प्रेरणा जास्त काळ टिकते, प्रक्रिया महत्त्वाची वाटते आणि त्याविषयीचं समाधान मिळतं. याचा फायदा आत्मविश्वास वाढीसाठी होऊ शकतो.
जेव्हा आपण दुसऱ्यासारखं व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा तुलना आपल्याला कैद करते. पण जेव्हा आपण म्हणतो, की ‘मला त्याच्यासारखं नाही, मला अमुक एका क्षेत्रात कालपेक्षा आज थोडं अधिक चांगलं व्हायचंय...’ तेव्हा ती तुलना आपल्याला मुक्त करते!