जम्मू-काश्मीर क्रिकेट घोटाळा भोवण्याची शक्यता
वर्तमानपत्र / श्रीनगर
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला आणि इतरांच्या विरोधात आरोपनिश्चिती करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. हे प्रकरण जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेतील घोटाळ्याचे आहे. श्रीनगरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी तब्बसूम यांनी गेल्या आठवड्यात हा आदेश दिला. पुढची सुनावणी 12 मार्चला असून त्या दिवशी आरोप निश्चिती केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यानंतर सर्व आरोपींच्या विरोधात ट्रायलाला प्रारंभ केला जाईल, असे दिसून येते.
या प्रकरणात आपल्यालाही पक्षकार करुन घेण्यात यावे, ही प्रवर्तन निदेशालयाची (ईडी) मागणी मात्र न्यायालयाने फेटाळून लावली. या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयने पेले आहे. तसेच सीबीआयनेच आरोपपत्रही सादर केले आहे. अशा स्थितीत ईडीला पक्षकार करुन घेण्याचे कारण नसल्याने या संस्थेने केलेला अर्ज फेटाळण्यात येत आहे, असे न्या. तब्बसुम यांनी स्पष्ट केले आहे.
प्रकरण काय आहे…
हे घोटाळा प्रकरण 2011-2012 या वर्षातील आहे. त्यावर्षी जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेला राज्यात क्रिकेटचा विकास करण्यासाठी 112 कोटी रुपये देण्यात आले होते. तथापि, या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या रकमेपैकी 46 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा आरोप आहे. या संदर्भात याच प्रदेशातील माजीद याकूब दर आणि निस्सार अहमद खान या दोन क्रिकेट खेळाडूंनी पोलिसांकडे तक्रार सादर केली होती. ती तक्रार 2015 मध्ये सादर करण्यात आली होती. फारुख अब्दुला त्यावेळी या संघटनेचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांना या प्रकरणात आरोप करण्यात आलेले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला होता. तसेच घोटाळ्याची चौकशी करण्याकरिता रणबीर समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीनेही घोटाळा झाला असल्याचे प्रथम दर्शनी सिद्ध होत आहे, असा अहवाल दिला होता. हा अहवाल आणि सीबीआय चौकशी यांच्या आधारावर फारुख अब्दुल्ला आणि इतरांच्या विरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. आता न्यायालयाने आरोपनिश्चिती करण्याचा आदेश दिल्याने अब्दुल्ला यांच्या अडणचीत वाढ होणे शक्य आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.