Sairaj Patil UPSC Success : इंग्रजीचं टेन्शन विसरा! कराडच्या पठ्ठ्यानं मराठीतून शिकून यूपीएससीत मारली बाजी; 545 वी रँक मिळवत झाला IPS
esakal March 07, 2026 05:45 PM

कराड (सातारा) : इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होणे सोपे असते, असा अनेकांच्या मनात न्यूनगंड असतो. मात्र, येथील साईराज पंडित पाटील (SaiRaj Patil UPSC Success Story) याने हा समज खोटा ठरवत मराठी माध्यमातून शिक्षण घेऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला.

वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी त्याने तिसऱ्याच प्रयत्नात देशात ५४५ वी रँक मिळवत भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) स्थान पटकावले. अभ्यासातील सातत्य, जिद्द आणि चिकाटी असेल, तर यश नक्की मिळते, असा आत्मविश्वास साईराजने (Marathi medium student clears UPSC) व्यक्त केला आहे.

साईराज हा उंडाळे (ता. कऱ्हाड) गावचा सुपुत्र असून, तो आपल्या कुटंुबासमवेत कऱ्हाडमध्ये वास्तव्यास आहे. पाटणचे नायब तहसीलदार पी. डी. पाटील आणि शिक्षिका जयश्री पाटील यांचा तो मुलगा आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण येथील नूतन मराठी शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण टिळक हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अकरावी, बारावीचे शिक्षण त्याने पुण्यातील महाविद्यालयात घेतले.

Anuj Agnihotri UPSC Topper : डॉक्टर ते थेट IAS टॉपर! कोण आहे अनुज अग्निहोत्री? ज्यानं तिसऱ्याच प्रयत्नात मिळवलं देशात अव्वल स्थान, वाचा थक्क करणारा प्रवास

अभ्यासातील प्रखर जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने देशातील प्रतिष्ठित असलेल्या आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश मिळवला. तेथून अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांतून अधिकारी होण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी थेट दिल्ली गाठली.

Omkar Pawar IAS Success Story : एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल 4 वेळा अपयश! साताऱ्याचा ओमकार कसा झाला IAS? वाचा शेतकर्याच्या लेकाची यशोगाथा

दिल्लीत लोकसेवा आयोगाच्या अभ्यासाची सुरुवात करताना साईराजसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. त्यापैकी सर्वात मोठी अडचण म्हणजे, इंग्रजी भाषेची होती. मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे सुरुवातीला अभ्यासाची गती मंदावली. अनेक संकल्पना समजून घेण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागला, तरीही त्याने हार मानली नाही. पहिल्याच प्रयत्नात त्याने मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली; मात्र अंतिम यश मिळाले नाही. पहिल्या अपयशानंतर अनेक जण खचून जातात; परंतु साईराजने या अपयशातूनच पुढील यशाचा मार्ग शोधला. दुसऱ्या प्रयत्नातही त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, अभ्यासातील त्रुटी त्याने शोधून काढल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.