पुणे - राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे शहराला ‘ग्रोथ हब’ बनविण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याबरोबरच धार्मिक व वारसा स्थळे, रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक वाढीला चालना देण्यासाठीच्या विविध प्रकल्पांवर भरीव तरतूद करण्यात आली आहे. विशेषत: पुणे महानगरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी चार महामार्गांच्या कामांना मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील सर्वाधिक गतीने वाढ होत असलेल्या पुणे शहराचा केंद्र सरकारच्या नीती आयोगाने ‘ग्रोथ हब’मध्ये समावेश केला आहे. त्या दृष्टीने आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर या अर्थसंकल्पात भर दिला असल्याचे समोर आले आहे.
वाहतूक कोंडीवरील उपाययोजना
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वे, मेट्रो आणि महामार्ग प्रकल्पांना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून गती देण्यात आली आहे. गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या पुणे ते लोणावळादरम्यान ५ हजार १०० कोटी रुपयांच्या खर्चाच्या तिसरी आणि चौथी रेल्वेमार्गिका उभारण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव परिसरातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
राज्यातील मेट्रो नेटवर्क १ हजार २०० किलोमीटरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात ठेवण्यात आले असून, ६ हजार किलोमीटरहून अधिक द्रुतगती मार्गांचे जाळे विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे मेट्रोच्या टप्पा-२ अंतर्गत खडकवासला–स्वारगेट–हडपसर–खराडी मार्गावर हडपसर ते लोणी काळभोर तसेच हडपसर बस डेपो ते सासवड रोड या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
रामवाडी ते वाघोली (११ किलोमीटर) मेट्रो मार्गालाही मंजुरी देण्यात आली असून, येरवडा ते कात्रज आणि हिंजेवाडी ते सिंहगड रोड या ५४ किलोमीटर दुहेरी भुयारी मेट्रो मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास मान्यता दिली आहे.
तसेच पुणे ते शिरूर ५३ किलोमीटर उन्नत मार्गासाठी ७ हजार ५१४ कोटी रुपये, तळेगाव–चाकण २५ किलोमीटर उन्नत मार्गासाठी ६ हजार ४९९ कोटी रुपये, चाकण–शिक्रापूर २८ किलोमीटर मार्गाच्या सहा पदरीकरणासाठी ५ हजार २३२ कोटी रुपये, शिरूर ते छत्रपती संभाजीनगर १९२ किलोमीटर ग्रीनफिल्ड महामार्गासाठी १४ हजार ८८६ कोटी रुपये, तसेच हडपसर ते यवत ३१.५० किलोमीटर सहा पदरीकरणासाठी ५ हजार २६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मीडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्र
मुंबईच्या धर्तीवर पुण्यात ‘ग्रोथ हब’ विकसित करण्यात येणार आहे. तसेच मुंबई आणि पुणे येथे मिळून ५० अब्ज डॉलर्स क्षमतेचे मिडिया-टेक आणि एव्हीजीसी (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग व कॉमिक्स) केंद्र उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून ३० लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, राज्यात ४०० जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी) तसेच नवउपक्रम शहरांची उभारणी करण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
वारसास्थळांचा विकास
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक वारसास्थळांच्या विकासालाही अर्थसंकल्पात प्राधान्य दिले आहे. आंबेगाव तालुक्यातील शिवसृष्टी परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या तुळापूर येथील स्मारकाचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, वढू बुद्रुक येथील समाधीस्थळाचा विकास जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
तसेच जगद्गुरू तुकाराम महाराजांचे देहू येथील जीर्ण घर व जन्मस्थान यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासकामांंतर्गत श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून मंदिर परिसराचा विकास आणि भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी देण्यात आला आहे.