Pune Crime: 'तू खूप सुंदर दिसतेस...', आधी अंगाला स्पर्श केला नंतर...; डिलिव्हरी बॉयचं तरुणीसोबत भयंकर कृत्य
Saam TV March 08, 2026 12:45 PM
Summary -
  • डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केला

  • पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील घटना

  • पार्सल देण्यासाठी आले असता केलं भयंकर कृत्य

  • हाताला स्पर्ध करत म्हणाला तू खूप सुंदर दिसतेस

  • आरोपीविरोधात गुन्हा दाखल

पुण्यामध्ये डिलिव्हरी बॉयने तरुणीची विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर भागामध्ये ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. एका खासगी ॲपवरून तरुणीने सामान मागवले होते. हे सामान देण्यासाठी घरी आलेल्या डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केला. डिलिव्हरी बॉयने आधी तरुणीच्या हाताला स्पर्श केला त्यानंतर तिला 'तू खूप सुंदर दिसतेस' असे म्हणत गैरवर्तन केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने नेहमीप्रमाणए एका मोबाईल ॲपवरून काही सामान मागवले होते. ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास डिलिव्हरी बॉय सामान घेऊन तिच्या घरी पोहचला. तरुणीने दरवाजा उघडून त्याच्याकडून सामान घेतले. पार्सल दिल्यानंतर डिलिव्हरी बॉयने तरुणीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. तरुणीने त्याला पाणी दिले. मात्र त्यावेळी डिलिव्हरी बॉयने तिच्या हाताला स्पर्श करत 'तू खूप सुंदर दिसतेस' असे म्हणत तिचा विनयभंग केला.

डिलिव्हरी बॉयच्या या कृत्यामुळे तरुणी प्रचंड घाबरली. ही घटना घडली त्यावेळी घरात तरुणीचे बाळ आणि सासू उपस्थित होते. ही घटना महिलेच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. घाबरलेल्या तरुणीने घडलेला प्रकार आपल्या नवऱ्याला सांगितला. त्यानंतर दोघांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या फरार असून शिवाजीनगर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.