प्रभा जोशी - saptrang@esakal.com
छत्तीसगड इथल्या राजनांदगावजवळच्या सुकुलदेहान या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या फुलबासन यादव यांच्या संघर्षमय जीवनावर फिल्म्स डिव्हिजनने लघुपट काढला. ही संघर्षगाथा भारतातील कोट्यवधी स्त्रियांसमोर आदर्श ठेवते. शहरात सुशिक्षित, सुस्थितीत घरात जन्मलेल्या स्त्रियांना फुलबासन यांच्या खडतर जीवनाची सत्यकथा लघुपटात विचार करायला भाग पाडते.
भारत अथवा इंडिया ही आपल्या देशाची ओळख आहे. दोन्ही शब्दांचा अर्थ समान असला तरी एका मोठ्या पटावर याच्या अर्थात एक अदृश्य विषमता आहे. महानगरातील उंच इमारती, शहरी सुविधा आणि आधुनिकता, वेगवान जीवनशैली जगणारे नागरिक ‘इंडिया’त राहतात. दूरवर खेड्यात शेती आणि शेतीपूरक व्यवसाय इथे आधुनिक सुविधा नसलेली संथ जीवनशैली जगणारे नागरिक ‘भारता’त राहतात, असं हे एक अदृश्य विभाजन आहे. ही विषमता देशातील अनेक प्रश्नांचं मूळ आहे. भारतीय समाजाच्या एकूण व्यवस्थेत अशा विषमतेत स्त्रिया अधिक भरडल्या जातात. कुटुंब व्यवस्थेतील स्थान, सामाजिक स्थान, निरक्षरता आणि गरिबी याच्याशी संघर्ष करणाऱ्या अगणित स्त्रिया आपल्या देशात आहेत.
या समस्यांनी डगमगून न जाता धैर्य अथक परिश्रम यातून स्वतःला आणि समाजातील अशी लढाई लढणाऱ्या अन्य स्त्रियांना भक्कम पायावर उभं करण्याचं काम काहीजणी करतात. आदर्श ठेवतात. छत्तीसगड इथल्या राजनांदगावजवळच्या सुकुलदेहान या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या फुलबासन यादव यांची अशीच संघर्षमय कहाणी आहे आणि फिल्म्स डिव्हिजननी त्यावर लघुपट काढला आहे. संघर्षमय जीवन जगणाऱ्या भारतातील कोट्यवधी स्त्रियांसमोर अशी एखादी फुलबासन कसा आदर्श ठेवते, त्याचीच ही कहाणी.
शहरात सुशिक्षित, सुस्थितीत घरात जन्मलेल्या स्त्रियांना फुलबासन यांच्या खडतर जीवनाची सत्यकथा लघुपटात विचार करायला भाग पाडते. साक्षरता, आर्थिक, कौटुंबिक आणि भावनिक सुरक्षितता असं कुठलंही दान पदरात पडलं नाही, तरी खेड्यातली एखादी गरीब स्त्री स्वतःच्या समस्यांची उत्तरं शोधते, गरिबी दूर करण्याचे प्रयत्न करते तिची ही प्रेरणा आणि काम तिला ‘पद्मश्री’ या सन्माननीय नागरी पुरस्कारापर्यंत घेऊन जाते.
फिल्म्स डिव्हिजनसाठी नवनिंद्र बहल यांनी लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे. लेखन, नाट्य दिग्दर्शन, अभिनय, दृकश्राव्य निर्मिती या विषयात प्रदीर्घ अनुभव असलेल्या नवनिंद्र यांनी लघुपटात फुलबासन यादव यांच्या संघर्षाला यथोचित न्याय दिला आहे.
लघुपट सुरू होतो तेव्हा उगवत्या सूर्याच्या प्रकाशात फुलबासन बकऱ्या चरायला घेऊन जाताना दिसतात. संध्याकाळी बकऱ्या आणि फुलबासन परतीचा रस्ता घेऊन येतात. सूर्य मावळतीला असतो. फुलबासन घरात येतात. चूल पेटवतात, दिवे लावतात आणि फ्लॅशबॅक सुरू होतो.
भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील राष्ट्रपती भवनात फुलबासनना समजसेवेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करतात. टाळ्यांच्या गजरात फुलबासन पुरस्कार स्वीकारतात. गावी परत येतात तेव्हा मिरवणूक निघते. फुलबासन यांचा त्यांच्या महिला सहकारी आणि गावकरी सत्कार करतात. फुलबासन त्यांच्या साध्या बोलीत प्रभावी भाषण करतात. ‘एक लकडी ले तो हर कोई लेकर तोडके कर फेक देते हैं। लेकिन पंधरा-बीस लकडी बांधे तो हिम्मत नही किसी की के तोड के फेंक दे।’ हे वाक्य त्यांनी कसं काम केलं ते समजण्यास पुरेसं असतं.
‘जीवन में कुछ पाना हैं तो मनको मारे मत बैठ, आगे आगे बढना हैं तो हिम्मत हारे मत बैठो’ हे महिला समितीचं गाणं जमलेल्या महिला गाऊ लागतात आणि फुलबासनबाईंचा जीवनपट कॅमेऱ्यापुढे उलगडू लागतो.
Premium|Zero Vally: आपातानी जमातीची अनोखी शेती पद्धत; झिरो व्हॅलीतील कृषी आणि मत्स्यपालनाचं सहजीवन नेमकं कसं..?फुलबासन यांचं माहेर छुरिया हे एक छोटसं खेडं. अगदी गरीब घरातला जन्म. कुटुंब मोठं आणि पैशाचा अभाव यामुळे चार यत्ता शिक्षण आणि मग दहाव्या वर्षी लग्न. लघुपटात हे माहेरचं गाव आणि तिथलं घर अंगण दिसतं. फुलबासनबाईंची आई भेटते. मुलीला शिकवता आलं नाही, समाज रूढीमुळे लवकर लग्न करावं लागलं, याची खंत व्यक्त करते. लघुपटात पूर्वायुष्य दाखवताना काही भागाच छोटसं नाट्यीकारण केलं आहे.
लग्न होऊन फुलबासन ज्या सुकुलदेहान खेड्यात जातात, तिथे ही परिस्थिती वेगळी नाही. रोज शेण, गोठा, गुरं, बकऱ्या, ढोर मेहनत, अपुरं अन्न, नवऱ्यांनी केलेली मारहाण सगळं पदरी येतं. मुलं होतात. त्यांनाही उपाशी झोपवायची वेळ यायला लागते तेव्हा फुलबासनमधली लढावू वृत्ती जागृत होते. ही लढाई गरिबीशी आहे. आजूबाजूच्या घरांमध्ये थोड्या फार फरकाने तीच परिस्थिति असते. मोलमजुरीमधून मिळणाऱ्या पैशांतून आठवड्याला दोन रुपये बाजूला काढायचेच, असं फुलबासन आणि आजूबाजूच्या महिला निश्चय करतात. महिन्याला प्रत्येकीचे दहा रुपये जमतात. इथून बचत आणि रोजच्या अडचणी, मुलांची आजारपण, औषधं अशा छोट्याशा गरजेला पैसा उभा राहील, याची तरतूद होऊ लागते. काही दिवसांतच महिला जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत खातं उघडतात. बचत गटाचा प्रवास सुरू होतो. फुलबासन आणि तिच्या सहकारी स्त्रिया यांच्या आयुष्यात स्वयंसहाय्यता आणि अधिकार याचा नवा अध्याय सुरू होतो.
या लघुपटात दिग्दर्शिका नवनिंद्र बहल यांनी फुलबासनना त्यांच्या पहिल्या संघर्षमय काळात भेटलेल्या शासकीय यंत्रणेमधील अधिकारी मंडळींनाही आवर्जून बोलतं केलं आहे. युनियन बँक ग्रामीण शाखा तत्कालीन अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य अधिकारी रीतू सेन, डॉ. बाफना, आयएएस रोहित यादव, जिल्हा मॅजिस्ट्रेट अशोक अगरवाल असे अधिकारीगण फुलबासन यांच्या हुशारीचं, निर्णयक्षमतेचं कौतुक करताना दिसतात.
राजनांदगाव परिसरात बमलेश्वरी देवी हे भाविकांचं मोठं दैवत आहे. फुलबासन यांनी प्रत्येक स्वयंसहाय्यता समूह, गटाला बमलेश्वरी देवीच नाव दिलं आहे. या गटांनी आता शेतीबरोबरच हातमाग, शिवणकाम, प्रक्रिया अन्नपदार्थ, भाजीपाला अडत, शाळेतील मध्यान्ह भोजन, दुग्धव्यवसाय अशा अनेक व्यवसाय संधी शोधून त्यात जम बसवला आहे. फुलबासन बाई आपल्या मैत्रिणीसह या मंदिरात जातात, असा शॉट या लघुपटात आहे. गरिबीशी लढणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी त्या जणू बमलेश्वरी देवीचं रूप आहेत.
या लघुपटात फुलबासन यांच्या यशोगाथेत सहभागी झालेल्या सर्वसामान्य स्त्रिया त्यांच्या भाषेत त्यांचा प्रवास सांगतात, तो ही प्रेरणादायी वाटतो. समाजाने धुत्कारलेल्या ममता या पूर्ण विकलांग मुलीला स्वयंसहाय्यता गटात सहभागी करून, पुढे तिचं काम पाहून तिला काही गटांची प्रमुख करणाऱ्या फुलबसन यांना कदाचित तेव्हा अपंग पुनर्वसन योजना हे शब्दही माहीत नसतील. गरिबी, अन्याय, असमानता दूर करत रस्ता तुडवणाऱ्या या स्त्रीने घडवलेला बदल सर्वंकष आहे, याची लघुपट पाहताना वेळोवेळी जाणीव होते.
फुलबासन यांनी हाती घेतलेलं काम हे स्वतःवर ओढवलेल्या परिस्थितीमुळे आणि स्वयंप्रेरणेने घडलं आहे. त्यातून दिव्याने दिवा लागावा, असा कामाचा प्रसार झाला. त्यांची निष्ठा वादातीत आहे. इतका मोठा विस्तार झाल्यावरही अद्याप त्यांचं रोजचं काम बदलल नाही. त्यांचा नवरा अद्याप गुरं घेऊन जातो. त्या शेण थापतात. रोजची काम करतात. मग स्वयंसहाय्यता गटाच्या ऑफिसमध्ये जातात. वेळोवेळी मिळालेली बक्षिसांची रक्कम तिथेच देतात. वेशभूषा राहणीमान यात कुठलाही फरक त्यांनी केलेला नाही. त्या छत्तीसगडी बोलीभाषा बोलतात. हा सगळा भाग लघुपटात सहजपणे दिसत राहतो. मग वाटतं हे सगळे गुणच फुलबासन यांच्या समाजसेवेला झळाळी प्राप्त करून देतात.
विषय कठोर आणि अवघड आहे तरी लघुपटाची मांडणी, फ्रेम्स, पार्श्वसंगीत यात एक सौंदर्य आणि हळुवारपणा अखेरपर्यंत जपला आहे. उगवता सूर्य हे प्रतीक इथे वारंवार दिसते. फुलबासन यांच्या स्वयंसहाय्यता गटाची गाणी इथे अनेकदा पार्श्वभूमीवर ऐकू येतात. या स्त्रिया गात असतात.
तेज दौडनेवाला खरहा दो पग चलकर हार गया।
धीरे धीरे चलनेवाला कछुवा देखो बाजी मार गया।
पूर्ण लघुपट पाहिल्यावर अखेरीस समूह स्वरात गाणाऱ्या या स्त्रियांची कहाणी मनात रुजते. शहरांपासून कोसो दूर खेड्यात राहणाऱ्या स्त्रिया आणि त्यांचं जगणं समजावून घ्यायचं असेल तर इंडियामधल्या स्त्रियांनी भारताकडे वळून बघितलं पाहिजे. हा लघुपट तिथे वळून बघायची एक खिडकी आहे.
(लेखिका आकाशवाणीच्या माजी निर्मात्या आणि संगीत अभ्यासक आहेत.)