Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: राज्य शासनाने शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. तर जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात. त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले. गेल्यावर्षी राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने थैमान घातले होते. अतिवृष्टी आणि पूराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली होती. पण ती मदत तुटपुंजी असल्याची ओरड झाली होती. विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला होता. तर आता सरकारने कर्जमाफी जाहीर करताना सप्टेंबरपासून ती लागू होणार आहे. म्हणजे त्यापूर्वी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागेल का, अशी चर्चा होत आहे. तर यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
अतिवृष्टी-पुरग्रस्त शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 मधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का, यावरून संभ्रम आहे. सरकारने याविषयी स्पष्ट भूमिका मांडावी अशी शेतकरी मागणी करत आहेत. अगोदर आस्मानी आणि नंतर सुलतानी संकटाने कोलमडल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे.पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहातील अशी भीती व्यक्त होत आहे. अतिवृष्टी आणि पूराने अनेक जिल्ह्यातील नदीकाठचे शेतकरी उद्धवस्त झाले. त्यांनी यापूर्वी मिळालेली मदत तुटपुंजी असल्याने नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी त्यावेळी महाराष्ट्र पिंजून काढत सरकारवर जहरी टीका केली होती. सरकारने सरसकट मदत केली नाही. त्यावरून नाराजी पसरली होती. तर आता कर्जमाफी योजनेतही या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप करण्यात आला होता.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना
बहुप्रतिक्षीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली. तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
मुख्यमंत्र्यांची काय ग्वाही?
दोन लाखांपर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही बँकेने दिलेले पीक कर्ज राज्य सरकार माफ करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. 30 जूनपूर्वी आपण कर्जमाफी करणार आहोत. बजेटमध्ये कर्जमाफीची घोषणी केली आहे. आता पुढच्या कार्यवाहीला सुरूवात होईल. समिती यावर काम करत आहे. समिती आता याविषयीची माहिती देईल. जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.त्यामुळे पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल का हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.