नाशिक शहरात एक अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील नामवंत आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. मनीषा जेजुरकर (वय अंदाजे ४०) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवले. या घटनेमुळे नाशिकच्या वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. पण मनीषा यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या…
प्रकरण काय?
डॉ. मनीषा जेजुरकर या गंगापूर रोड परिसरातील रेवती ब्ल्यू अपार्टमेंट, डी. के. नगर येथे कुटुंबासह राहत होत्या. शुक्रवारी (६ मार्च २०२६) सकाळी सुमारे ११:३० वाजता त्यांनी घरातील खिडकीच्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच त्यांना बेशुद्ध अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नवरा मनोविकारतज्ज्ञ
विशेष म्हणजे, डॉ. मनीषा यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञ (Psychiatrist) आहेत. ते मानसिक आरोग्य, नैराश्य, तणावग्रस्त रुग्णांना उपचार आणि मार्गदर्शन देतात आणि समाजात मानसिक आरोग्य जागृतीचे कामही करतात. अशा तज्ज्ञाच्या घरातच अशी घटना घडल्याने अनेकांना हे अत्यंत विचित्र आणि दुःखद वाटत आहे.
डॉ. मनीषा जेजुरकर या नाशिकमध्ये कुशल आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जात होत्या. आयुर्वेदिक उपचार, समुपदेशन आणि वैकल्पिक चिकित्सेच्या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना आरोग्य लाभ मिळवून दिला होता. त्यांच्या उपचार पद्धतीमुळे रुग्णांमध्ये त्या खूप लोकप्रिय होत्या. अशा यशस्वी आणि अनुभवी डॉक्टरने अचानक हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मनीषा यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट नाही. गंगापूर रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. शवविच्छेदन पूर्ण झाले असून, सुसाईड नोट सापडली आहे की नाही याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. कुटुंबीय, शेजारी आणि परिचितांचे जबाब नोंदवून पोलिस तपास करत आहेत. कौटुंबिक कलह, वैयक्तिक तणाव किंवा इतर कारणे यामागे असू शकतात, असे तर्क लावले जात आहेत. या घटनेने नाशिकच्या वैद्यकीय समुदायात शोककळा पसरली आहे.