तात्या लांडगे
सोलापूर : प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. १० महिन्यानंतरही त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. खरे कारण समोर यावे म्हणून संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेंच्या वतीने ॲड. प्रशांत नवगिरे यांनी डॉक्टरांसह सहा जणांचे सहा महिन्यांचे ‘सीडीआर’ मागितले होते. १ ते १८ एप्रिलपर्यंत डॉक्टरांना एकाच नंबरवरुन ३१ वेळा कॉल आले. त्यावर डॉक्टर तब्बल १२ हजार २५८ सेकंद बोलल्याचे ‘सीडीआर’मध्ये नमूद आहे. आत्महत्येच्या काहीवेळापूर्वी व आदल्या दिवशीही त्या क्रमांकावरुन डॉक्टरांना कॉल आले होते, असेही सूत्रांनी सांगितले.
गोरगरीब रुग्णांसाठी देवमाणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. शिरीष यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याचे उत्तर शोधताना त्यांच्या घनिष्ठ मित्रांच्याही डोळ्यात आजही पाणी येते. १८ एप्रिल रोजी दवाखान्यातून घरी आलेले डॉक्टर बराचवेळा एकटेच बेडरुममध्ये होते. त्यांच्या बाथरूममध्ये सिगारेटची १८ थोटके पोलिसांना आढळली होती. ज्या पिस्टलमधून डॉक्टरांनी स्वत:वर गोळ्या झाडल्या, ती बंदुक त्यांच्या बेडरुममधील कपाटातून जप्त केल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यात नमूद आहे. त्यांना मृत घोषित केल्यावर दुसऱ्या दिवशी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेल्यावर त्यांच्या खिशात मराठीतून लिहिलेली सुसाईड नोट सापडली. त्यावरून डॉ. शिरीष यांचे चिरंजीव डॉ. अश्विन यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून रुग्णालयाच्या कर्मचारी मनीषा यांना सदर बझार पोलिसांनी अटक केली होती. गुन्ह्याचा तपास करून तब्बल ७२० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.
मात्र, त्यामध्ये डॉक्टरांना सतत कॉल करुन बोलणाऱ्या त्या क्रमांकधारकाचा जबाब नोंदविला नसल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे. यावरही संशयित आरोपीचे वकील आगामी काळातील सुनावणीवेळी न्यायालयात प्रश्न उपस्थित करु शकतात. त्याचा वापर ते संशयित आरोपीच्या बचावासाठी देखील करतील. एवढ्या प्रसिद्ध, हुशार डॉक्टरांनी आत्महत्या का केली, त्यासाठी नेमके जबाबदार कोण, यामागील सत्य सर्वांसमोर यावे, अशी आपली भूमिका असल्याचे ॲड. नवगिरे ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले.
दोषमुक्ती अर्जावर आज सुनावणी
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येसाठी रुग्णालयातील मनीषा मुसळे माने जबाबदार असल्याची फिर्याद पोलिसांत दाखल आहे. मात्र, आपण डॉक्टरांच्या आत्महत्येला जबाबदार नसून ते आपल्याला वडिलांप्रमाणे होते. त्यांच्या आत्महत्येला आपण जबाबदार नसून आपल्याला या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, असा अर्ज मनीषा यांनी वकील प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत न्यायालयात केला आहे. त्या अर्जावरील सुनावणीची उद्या (सोमवारी) तारीख आहे.