मोठी बातमी! एक कोटी लाडक्या बहिणी निकषांत अपात्र; योजनेसाठी अर्थसंकल्पात २६५०० कोटींचीच तरतूद; आता एप्रिलपासून 'या' महिलांनाच मिळणार लाभ, वाचा...
esakal March 09, 2026 10:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरवातीला दोन कोटी ५३ लाख महिलांना प्रत्येकी १५०० रुपयांचा लाभ देण्यात आला. त्यावेळी ४५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, आता निकषांच्या आधारे झालेल्या पडताळणीत अंदाजे एक कोटी पाच लाख महिला अपात्र ठरू शकतात. त्यामुळे यंदा दीड कोटी लाभार्थींसाठीच २६ हजार ५०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. २०२४-२५ च्या तुलनेत चालू वर्षातील तरतूद १९ हजार कोटींनी कमी आहे.

लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलेचे वय २१ ते ६५ वर्षांपर्यंत अपेक्षित आहे. टॅक्ट्रर वगळता त्यांच्याकडे चारचाकी वाहन नसावे, एका कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित, अशा दोघींनाच लाभ घेता येतो. लाभार्थी महिला राज्य किंवा केंद्र सरकारच्या दुसऱ्या कोणत्याही वैयक्तिक योजनेच्या लाभार्थी नसाव्यात, त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, त्या सरकारी नोकरदार नसाव्यात, असे प्रमुख निकष आहेत.

मात्र, सुरवातीला काही मोजकीच कागदपत्रे जोडून योजनेसाठी अर्ज केलेल्या अडीच लाख महिलांना काही महिने लाभ मिळाला. मात्र, डिसेंबर २०२४ पासून निकषांवर बोट ठेवत लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार आता राज्यातील तब्बल एक कोटी पाच लाख महिला अपात्र ठरतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. हा अंदाज लक्षात घेऊनच लाडकी बहीण योजनेसाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात पूर्वीपेक्षा १९ हजार कोटींनी तरतूद कमी केल्याचेही सांगण्यात आले.

लाडकी बहीण योजनेची स्थिती

  • सुरवातीचे एकूण लाभार्थी

  • २.५३ कोटी

  • सुरवातीची एकूण तरतूद

  • ४६,००० कोटी

  • पडताळणीअंती अंदाजे पात्र लाभार्थी

  • १,४८,६०,०००

  • यावर्षी अर्थसंकल्पातील तरतूद

  • २६,५०० कोटी

  • कमी होणारे अंदाजे लाभार्थी

  • १.०५ कोटी

उत्पन्नाचा निकष महिलांच्या जिव्हारी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी अपेक्षित आहे. ई-केवायसीच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नेमके किती, हे समोर येत आहे. अनेक महिलांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी ई-केवायसीच केलेली नाही. आता ई-केवायसीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १ एप्रिलपासून निकषांनुसार पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींनाच दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत.

निकषांनुसार पात्र महिलांनाच योजनेचा लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार प्रत्येक लाभार्थींची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी झाली आहे. आता सर्व लाभार्थींनी ‘ई-केवायसी’ करायची असून त्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. १ एप्रिलपासून योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या लाभार्थींनाच दरमहा योजनेचा लाभ वितरीत होईल.

- प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.