Pune News : पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती मधील सभापतीची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत वेगवेगळी सत्ता समीकरणे तयार होताना पाहायला मिळाली. काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरण बाबतच्या चर्चा थांबल्या आहेत.
अस असलं तरी पंचायत समिती निवडणुकीमध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येताना पाहायला मिळाल्या. मुळशी मध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याच पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंदा शेळके यांना सभापतीपद तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दगडूकाका करंजवणे यांना उपसभापतीपद मिळाले.
मुळशी पंचायत समिती साठी एकीकडे भाजप नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर हे इतर पक्षातील सदस्यांना आपल्याकडे घेऊन नवी समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न करत होते. ही समीकरणे जुळवण्यात मांडेकर यांना यश आले. मांडेकरांच्या समीकरणामुळे थोपटेंना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा आहे.
मुळशी पंचायत समितीमध्ये 6 जागांपैकी 3 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजय झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन सदस्य निवडून आले आहेत. आणि भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहेत.
मुळशी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्या तरी त्यांना बहुमतासाठी एका सदस्याच्या पाठींबाची आवश्यकता होता. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन सदस्य आणि भाजपाचा एक अशी एकत्रित तीन सदस्यांची सांगड बांधून संग्राम थोपटे यांनी मांडेकरांना शह देण्यासाठी आखणी केली होती.
मात्र आता मांडेकरांनी हा गेम पालटवला असून मुळशी पंचायत समिती मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन वेगळा पॅटर्न अस्तित्वात आणला आहे. त्यानुसार आता राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उपसभापती मुळशीमध्ये झाला आहे.
दरम्यान आमदार शंकर मांडेकर यांनी अडीच वर्षांचा कार्यकाळामध्ये प्रत्येक महिलेला 10 महिने सभापतीपद असे ठरवून देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडून आलेल्या तिन्ही महिला सदस्यांन सभापती होता येणार आहे. तर, पुरुष तीन सदस्यांना याप्रमाणेच उपसभापतिपद, त्यामुळे सर्वच सदस्यांना पदे मिळतील.
थोपटेंना धक्काभोर, राजगड आणि मुळशी विधानसभा मतदार संघामध्ये भोर, राजगड आणि मुळशी या तिन्ही पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली असल्याचं पाहायला मिळत आहे.त्यामुळे कुठेतरी हा माजी आमदार संग्राम थोपटे यांना धक्का मानला जात आहे.