लहान मुलांतील ॲनिमिया
esakal March 10, 2026 01:45 AM

- डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ

रक्ताच्या निर्मितीसाठी लोह, फोलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी- १२, प्रथिने आणि व्हिटॅमिन ‘इ’ यांची गरज असते. या पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते, याला ‘रक्तक्षय’ (ॲनिमिया) असे संबोधले जाते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने मार्गदर्शक तत्त्वानुसार, सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण ११ ग्रॅमहून कमी असल्यास, तर पाच ते बारा वर्षे वयोगटात ते ११.५ ग्रॅमहून कमी असल्यास आणि बारा ते चौदा वर्षे वयात १२ ग्रॅमहून कमी असल्यास तो ॲनिमिया असतो.

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये पाच वर्षाखालील सुमारे ७० टक्के बालकांत ॲनिमिया आढळून आला. आईच्या दुधात लोहाचे प्रमाण कमी असले, तरी त्या दुधातले बरेचसे लोह शरीरात शोषले जाते. त्यामुळे बाळाला पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान केले, तरी त्याची लोहाची गरज भागत असते. बाळाला ॲनिमिया कधी होईल, हे त्या बाळाचा जन्मानंतर रक्तातील लोहाच्या रक्तातील साठ्यांवर अवलंबून असते.

तो रक्तातील साठा आईच्या शरीरातील लोहाच्या स्थितीवर अवलंबून असतो आणि तो योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. जन्मानंतर बाळाचे वजन अडीच किलोपेक्षा कमी असल्यास हा साठा कमी असतो आणि अशा बाळांना ॲनिमिया होऊ नये म्हणून जन्मानंतर दीड ते दोन महिन्यानंतर अतिरिक्त लोह सुरू करावे लागते.

मुलाचे हिमोग्लोबिन कमी असल्यास त्याची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता कमी होते. लोह, ‘ब’, जीवनसत्त्व आणि फाॅलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयाचे प्रमाण लहान मुलांमध्ये प्रचंड आहे.

लक्षणे

तळव्याचा फिक्कटपणा हे रक्तक्षयाचे एक चिन्ह आहे. ते तळवे साधारण फिक्कट आहेत की, अतिशय जास्त फिक्कट, पांढुरके आहेत यावरून रक्तक्षयाचे वर्गीकरण करता येते. अतिशय फिक्कट तळवे हे ‘गंभीर रक्तक्षयाचे’ चिन्ह असते. भूक लागत नाही. वजन वाढीचा वेग मंदावतो.

अन्नाव्यतिरिक्त माती, पेन्सिल, खडू, बर्फ इत्यादी खाण्याची इच्छा होणे, वारंवार तोंड येणे, चिडचिडेपणा, अशक्तपणा, हालचाली मंदावणे, छातीत धडधड होणे अशी लक्षणे असतात. मूल लवकर दमते. त्याचे अभ्यासात लक्ष लागत नाही. लहान मुले दूध नीट पीत नाहीत. गंभीर रक्तक्षय असणाऱ्या मुलाच्या पायावर सूज येते, धाप लागायला सुरुवात होते. रक्तक्षयाची शिकार बनलेली मुले नेहमी आजारी पडतात.

निदान

निदानासाठी रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण तपासण्यात येते. पेरिफेरल स्मिअर करून (काचपट्टीवर पसरलेल्या रक्ताच्या थेंबाद्वारे) रक्तक्षयाचे वर्गीकरण करता येते. कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयासाठी शौचाची तपासणीही करावी लागते.

उपचार

उपचार करताना मुलाचे जन्मत: असणारे वजन, गर्भाशयातील काळ, त्याला होणारे वारंवार आजार, त्याला हवा असलेला वयानुसार आहार अन् तो प्रत्यक्षात सेवन करीत असलेला आहार, रक्तस्राव, वरचेवर अतिसार, जंत होणे या बाबींचा विचार महत्त्वाचा आहे. कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयावर उपचार करताना लोह दिले जाते. गंभीर रक्तक्षयासाठी रक्त द्यावे लागते. जंताची लागण झालेली आढळल्यास तशी उपाययोजना करावी लागते.

ॲनिमिया न होण्यासाठी लोहयुक्त पदार्थाचा आहारात समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. रक्तक्षयावर उपचार करण्यापेक्षा हा विकार होऊच नये म्हणून नियंत्रण करणे अधिक सोपे आहे. लोहयुक्त ओषध किंवा अन्नपदार्थ भरपूर प्रमाणात घेतल्यास दीर्घकाळ ॲनिमिया होत नाही. जवळजवळ सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वांची रक्तनिर्मितीसाठी गरज असते.

ब्रेड, बेकरी पदार्थ, पाॅलिश केलेले तांदूळ यामुळे शरीरातले लोह कमी होते. आहारात हिरव्या पालेभाज्या, पालक, खजूर, गूळ, अंड्याचा पिवळा बलक, लिव्हर यांचा समावेश करावा. मांसाहरी पदार्थ, मनुका यात लोहाचे प्रमाण जास्त असते. लोखंडाच्या कडईत अन्न शिजवल्यास लोहाचे प्रमाण वाढते.

जेवताना लिंबाचा वापर केल्याने अन्नातील लोहाची उपलब्धता वाढते. गहू, गव्हाचे पदार्थ, हातसडीचा तांदूळ, कोबी, गाजर, टोमॅटो, सफरचंद, द्राक्ष, चेरी, मध, काकडी इत्यादींमध्ये लोहाचे प्रमाण मुबलक असते. वाढीच्या वयातल्या मुलांना ॲनिमिया होणे, हे त्या मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी घातक असते.

लहान मुलात काॅम्प्लिमेंटरी फिडिंग उशिराने सुरू केल्याने आणि वरच्या दुधाचा अतिरेक केल्याने ॲनिमिया होण्याचे प्रमाण जास्त असते. ॲनिमियाचा सहज प्रतिबंध करता येतो. संतुलित आहार आणि लोह दिल्याने त्याचा प्रतिबंध करता येतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.