Sabhapati Election : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच 'दादा'; जिल्ह्यातील 13 पैकी 10 पंचायत समितीत सत्ता, भाजप, ठाकरे अन शिंदे सेनेला 'या' ठिकाणी संधी
Sarkarnama March 10, 2026 02:45 AM

Pune, 09 March : पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापतींच्या निवडी आज (ता. ०९ मार्च) पार पडल्या. या निवडीमध्ये अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी करत तब्बल १० पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा गजर झाला आहे. भोरमध्ये ईश्वरी चिठ्ठीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने पडली आणि आमदार शंकर मांडेकरांनी बालेकिल्ल्यातच माजी आमदार संग्राम थोपटेंना चितपट केले. पुरंदरमध्ये शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने सभापतिपद मिळविले. जुन्नरमध्ये शिवसेनेची, खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, तर दौंडमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे.

ईश्वरी चिठ्ठी राष्ट्रवादीच्या बाजूने

सभापती आणि उपसभापतीच्या निवडीत आज पुणे जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. विशेषतः थोपटेंचा बालेकिल्ला असलेल्या भोरकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच माजी आमदार संग्राम थोपटे यांनी ‘भोरमध्ये नवा पॅटर्न’ पहायला मिळेल, असे विधान केले होते. मात्र, प्रत्यक्ष निवडीत दोन्ही बाजूच्या उमेदवाराला प्रत्येकी चार चार मते मिळाली, त्यामुळे ईश्वरी चिठ्ठीवर सभापती आणि उपसभापती निवडीचा निर्णय घेण्यात आला. त्यात ईश्वरी चिठ्ठीचा कौल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लागला. यात सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा कंक, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे विशाल कोंडे यांची निवड करण्यात आली.

भाजपकडून युतीधर्माचे पालन निवडणुकीतून माघार

शिरूर पंचायत समितीच्या निवडणुकीत एकूण १४ जागांपैकी ८ जागा जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहुमत मिळविले होते. भाजपचे पाच, तर कोमल ढेरंगे या अपक्ष निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीच्या सहयोगी सदस्य म्हणून त्यांच्यासह नऊजणांच्या गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करण्यात आली होती. राज्यपातळीवरील युतीधर्माचे पालन म्हणून आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून भाजपने या पदाधिकारी निवडणूकीतून माघार घेतली, त्यामुळे सभापतिपदी स्वाती विठ्ठलशेठ घावटे यांची; तर उपसभापतीपदी रामभाऊ बबनराव सासवडे यांची बिनविरोध निवड झाली.

राजगडमध्ये १० वर्षांनंतर राष्ट्रवादीला संधी

राजगड पंचायत समितीच्या निवडणुकीत चार सदस्यांपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले होते, तर एका जागेवर भाजपचा सदस्य निवडून आला होता, त्यामुळे सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा किरण राऊत यांची, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचेच संदीप लहू खुटवड यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत सत्तेपासून दूर राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

पुरंदरमध्ये शिवतारेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा

पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत आठ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक चार, शिवसेना दोन आणि भाजपने दोन सदस्य निवडून आले होते. सभापतिपदासाठी पाच सदस्य कोणत्याही पक्षाकडे नव्हते, त्यामुळे सत्ता कोणाची येणार याची उत्सुकता होती. ऐनवेळी शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित झेंडे हे सभापती, तर शिवसेनेचे प्रवीण जगताप हे उपसभापती झाले.

हवेलीत अपक्षाला आला मदतीला

हवेली पंचायत समितीच्या निवडणुकीत एकूण १२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ६, भाजपने ४, तर शिवसेना आणि अपक्षाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला केवळ एक जागेची आवश्यकता होती. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नानंतर अपक्ष सदस्या विद्या गायकवाड यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला. त्यांमुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ ७ वर पोचले आणि हवेली पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे युवराज हिरामण काकडे; तर उपसभापतिपदी अपक्ष सदस्या विद्या दत्तात्रेय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.

मुळशीत भाजपचा डाव हाणून पाडला

मुळशी पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीन, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन, भाजपला एक जागा मिळाली होती. भाजपकडून या ठिकाणी ईश्वरी चिठ्ठी आणण्यासाठी जोरदार हालचाली झाल्या. मात्र दोन्ही राष्ट्रवादीत सत्तेसाठी एकमत झाले. पण पवारांच्या राष्ट्रवादीकडून सभापतीपदाची मागणी झाली. त्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपवण्यात आला. त्यांच्याकडून राष्ट्रवादीकडे पहिल्या सव्वा वर्षासाठी सभापतिपद, तर उपसभापतिपद हे पवारांच्या राष्ट्रवादीकडे सोपविण्यात आले.

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्याला संधी

इंदापूर पंचायत समितीमध्ये इतिहासात कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रथमच एकत्र आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच्या सर्व १६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंचायत समिती सभापतिपदी हर्षवर्धन मधुकर लोंढे, तर उपसभापतिपदी जयकुमार गोपाळ कारंडे यांना संधी देण्यात आली. पंचायत समिती सभापती आणि उपसभापती दोन्ही पदे तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात देण्यात आली.

आंबेगावात वळसे पाटील-आढळरावांची सत्ता

आंबेगाव पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळरा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने १० पैकी ८ जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले होते, त्यामुळे आंबेगाच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलासबुवा काळे, तर उपसभापतिपदी ज्योती पारधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षाने दोन्ही पदे पश्चिम भागाला देऊन प्रादेशिक समतोल साधला आहे.

दौंडमध्ये भाजपची प्रथमच सत्ता

दौंड पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपचे सुखदेव सोनबा चोरमले, तर उपसभापतिपदी अमृता अभिमन्यू गिरमकर यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच भाजपची सत्ता आली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील खामगाव गणातून निवडून आलेले चोरमले यांना सभापतिपदावर; तर तालुक्याच्या पूर्व भागातील देऊळगाव राजे गणातून निवडून आलेल्या गिरमकर यांना उपसभापतिपदावर संधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे.

खेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता

खेड तालुक्याच्या इतिहासात दुसऱ्यांदा पंचायत समितीवर आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकला. तालुक्याच्या सभापतीपदी शिवसेनेच्या विद्या मोहिते आणि उपसभापतीपदी मंगेश सावंत हे निवडून आले. खेड पंचायत समितीचे एकूण १६ सदस्य आहेत. या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आणि शिवसेनेचे १ सदस्य निवडून आले आहेत.

जुन्नरमध्ये शिंदेसेना-उबाठा एकत्र

जुन्नर पंचायत समितीच्या निवडणुकीत एकूण सोळा सदस्यांपैकी शिवसेना शिंदे गटाचे आठ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा, तर शिवसेना उबाठा व भाजप यांचा प्रत्येकी एक सदस्य विजयी झाला होता. मात्र, शिवसेनेने उबाठाच्या सदस्याला उपसभापतिपदाची ऑफर देऊन स्वतःकडे ओढले, त्यामुळे जुन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या कमल बाळासाहेब शेळकंदे यांची, तर उपसभापतिपदी शिवसेना उबाठाचे अमित अनंता ढोले यांची निवड झाली.

मावळमध्ये 30 वर्षांनंतर राष्ट्रवादीची सत्ता

मावळ पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनीता मनोहर येवले यांची, तर उपसभापतीपदी साहेबराव नारायण कारके यांची बिनविरोध निवड झाली. सुमारे तीस वर्षांनंतर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा अशा सर्व पंधरा जागांवर विजय मिळवला होता.

बारामतीत निर्विवाद वर्चस्व

बारामती पंचायत समितीच्या सभापतिपदी किरण रावसाहेब तावरे, तर उपसभापतिपदी शुभांगी आगवणे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीत झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. पुरुष व महिला असा समतोल साधण्याचा प्रयत्न श्रेष्ठींनी केल्याचे निवडीनंतर स्पष्ट झाले.

पुणे जिल्ह्यातील पंचायत समितीचे पक्षीय सभापती आणि उपसभापती पुढीलप्रमाणे

१) बारामती (राष्ट्रवादी काँग्रेस)

सभापती : किरण रावसाहेब तावरे

उपसभापती : शुभांगी आगवणे

.................

२) भोर (राष्ट्रवादी काँग्रेस)

सभापती : मनीषा संतोष कंक

उपसभापती : विशाल सुभाष कोंडे

..................................

३) शिरूर (राष्ट्रवादी काँग्रेस)

सभापती : स्वाती विठ्ठलशेठ घावटे

उपसभापती रामभाऊ बबनराव सासवडे

......................

४) राजगड (राष्ट्रवादी काँग्रेस)

सभापती : सुवर्णा किरण राऊत

उपसभापती : संदीप लहू खुटवड

...............

५) पुरंदर (राष्ट्रवादी-शिवसेना)

सभापती : अमित झेंडे

उपसभापती : प्रवीण जगताप (शिवसेना)

६) हवेली (राष्ट्रवादी काँग्रेस)

सभापती : युवराज हिरामण काकडे

उपसभापती : विद्या दत्तात्रेय गायकवाड

.....................

७) मुळशी (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

सभापती : मंदा बाबाजी शेळके

उपसभापती : दगडूकाका नामदेव करंजावणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

.....................

८) आंबेगाव (राष्ट्रवादी काँग्रेस)

सभापती : कैलासबुवा काळे

उपसभापती : ज्योती पारधी

....................

९) इंदापूर (राष्ट्रवादी काँग्रेस)

सभापती : हर्षवर्धन मधुकर लोंढे

उपसभापती : जयकुमार गोपाळ कारंडे

................................

१०) मावळ (राष्ट्रवादी काँग्रेस)

सभापती : सुनीता मनोहर येवले

उपसभापती : साहेबराव नारायण कारके

११) दौंड (भाजप)

सभापती : सुखदेव सोनबा चोरमले

उपसभापती : अमृता अभिमन्यू गिरमकर

....................

१२) खेड (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

सभापती : विद्या मोहिते

उपसभापती : मंगेश सावंत

........................

१३) जुन्नर (दोन्ही शिवसेना)

सभापती : कमल बाळासाहेब शेळकंदे ( शिवसेना)

उपसभापती अमित अनंता ढोले (शिवसेना उबाठा)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.