Nashik Crime News: नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात घडलेल्या डॉ. मनीषा जेजुरकर (Manisha Jejurkar) आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या घटनेनंतर मृत डॉक्टरच्या माहेरच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप करत पती डॉ. निलेश जेजुरकर (Nilesh Jejurkar) यांच्यासह डॉ. स्वाती चव्हाण यांची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे (Nashik Police) केली आहे. हा मृत्यू खरोखर आत्महत्या आहे की हत्या, याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी नातेवाईकांनी केली असून त्यामुळे या प्रकरणाची चर्चा अधिकच वाढली आहे.
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत काही दिवसांपूर्वी विवाहित महिला डॉक्टर डॉ. मनीषा निलेश जेजुरकर यांचा मृतदेह त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली. डॉ. मनीषा या स्वतः डॉक्टर असून त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर हे नाशिक जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू असल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, मृत महिलेच्या बहिणीने पोलिसांकडे गंभीर शंका उपस्थित करत हा प्रकार केवळ आत्महत्या म्हणून बंद करू नये, अशी मागणी केली आहे. “माझ्या बहिणीचा मृत्यू नेमका कसा झाला, हा खरा प्रश्न आहे. खिडकीला दोर लावून कोणी आत्महत्या करेल का? त्यामुळे हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या, याचा सखोल तपास झाला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
मृत महिलेच्या कुटुंबियांनी आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की, डॉ. निलेश जेजुरकर यांचे डॉ. स्वाती चव्हाण यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. याची माहिती डॉ. मनीषा यांना मिळाल्यानंतर त्यांनी या संदर्भात पतीला जाब विचारला होता. मात्र त्यानंतर त्यांचा आवाज दाबण्यात आला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, डॉ. निलेश जेजुरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण हे दोघेही नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकत्र काम करत होते. त्यामुळे डॉ. मनीषा यांच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या पोस्टमार्टम अहवालाबाबतही कुटुंबियांनी शंका व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष तपास व्हावा आणि सत्य बाहेर यावे, अशी त्यांची मागणी आहे.
तसेच, “जर डॉ. स्वाती चव्हाण निर्दोष असत्या तर त्या सध्या फरार का आहेत?” असा प्रश्नही नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पोलिसांनी डॉ. स्वाती चव्हाण यांचा शोध घेऊन त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी डॉ. निलेश जेजुरकर यांच्या विरोधात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र नातेवाईकांचा आरोप आहे की, या प्रकरणात अनेक संशयास्पद बाबी असल्याने पोलिसांनी सर्व बाजूंनी सखोल चौकशी करून हा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या, याचे सत्य समोर आणावे.
आणखी वाचा