Middle East Conflict Hits Stock Market Rupee Falls and Oil Gets Costly आखातामधील युद्धामुळे निर्माण झालेला तणाव कायम असल्याने सोमवारी शेअर बाजारात पुन्हा मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आणि निर्देशांक १.७५ टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्स हा एक हजार ३५२.७४ अंशांनी, तर निफ्टी ४२२.४० अंशांनी घसरला. शेअर बाजारातील ही एकाच दिवसात झालेली सहावी मोठी घसरण आहे. पडझडीमुळे सर्व गुंतवणूकदारांच्या एकूण सर्व शेअरचे बाजारमूल्य आठ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ते ४४१ लाख कोटी रुपयांवर आले. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने अर्थकारणाला हा फटका बसला आहे. सोने-चांदीच्या भावांमध्येही घसरण झाली.
'सेन्सेक्स'च्या व्यवहारांना सकाळी सुरुवात होतानाच तो सुमारे ९०० अंश घसरला होता. तो ७६,४२४ अंशांपर्यंत घसरल्यावर तेथून खालच्या स्तरावर खरेदी सुरू झाली व तिथून दिवसभर 'सेन्सेक्स' हळूहळू वाढतच होता. तरीही तो कालच्या बंद भावाच्या जवळपासही जाऊ शकला नाही. दिवसअखेर 'सेन्सेक्स' ७७,५६६.१६ अंशांवर, तर 'निफ्टी' २४,०२८.०५ अंशांवर स्थिरावला.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव पिंपामागे १०० डॉलरच्या वर गेल्यामुळे आज वाहननिर्मिती, धातूनिर्मिती कंपन्यांचे शेअर घसरले, तर युद्धामुळे 'इंडिगो'च्या नफ्यावर परिणाम होईल, असा अंदाज मानांकन संस्थांनी वर्तविल्यामुळे तो शेअरही घसरला. नफा वसुलीमुळे निफ्टी डिफेन्स निर्देशांकदेखील साडेतीन टक्क्यांपर्यंत घसरला.
मांस वितळवतं, ८०० डिग्रीपर्यंत तापमान; इस्रायलने धोकादायक केमिकलचा युद्धात वापर केल्याचा आरोपवाहननिर्मिती, भांडवली वस्तु, धातूनिर्मिती, सरकारी बँका, ग्राहकोपयोगी वस्तू, खासगी बँका, ऑइल अँड गॅस हे निर्देशांक दोन ते चार टक्क्यांपर्यंत घसरले. 'मिड कॅप आणि स्मॉल कॅप' निर्देशांकदेखील दोन टक्क्यांच्या आसपास घसरले. 'सेन्सेक्स' मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, इन्फोसिस, टेक महिंद्र, एच.सी.एल.टेक या शेअरचे भाव वाढले. दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट, पाच टक्के घसरला. मारुती तसेच महिंद्र आणि महिंद्र साडेचार टक्क्यांपर्यंत घसरले. स्टेट बँक, इंडिगो, अदानी पोर्ट, टाटा स्टील, कोटक बँकेच्या शेअरमध्ये तीन टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली. 'लार्सन अँड टुब्रो', आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट, बीईएल, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, टायटन या शेअरच्या भावांत दोन ते तीन टक्क्यांची घसरण झाली.
कच्चे तेल आणखी महाग
पश्चिम आशियातील युद्धाच्या झळा तीव्र होऊ लागल्याने कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. हे भाव सोमवारी प्रतिपिंप १२० डॉलरवर पोचले होते; पण नंतर ते १०७ डॉलर प्रतिपिंपपर्यंत कमी झाले. अमेरिकेमध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचे भाव ही ११९.४८ डॉलर प्रतिपिंपवर पोचले होते.
इराणमध्ये आकाशातून पडतंय तेल, हवा विषारी; लोकांना घरातच कोंडून घेण्याची वेळ, इस्रायलच्या हल्ल्यानंतर भीषण परिस्थितीसोन्याचा भाव १,२०० रुपयांनी घटला
युद्धामुळे सोने-चांदीचे भावदेखील अस्थिर झाले आहेत. सोन्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. सोन्याच्या भावात सोमवारी (ता. ९) १,२०० रुपयांची घट झाली, तर चांदीच्या भावात दोन हजार रुपयांची घट झाली. सोन्याचा भाव शनिवारी (ता. ७) १,२०० रुपयांनी घटल्याने सोने एक लाख ६१ हजार २०० रुपयांवर (विनाजीएसटी प्रतिदहा ग्रॅम) पोहोचला होता. सोन्याच्या भावात सोमवारी १,२०० रुपयांची घट होऊन ते एक लाख ६० हजारांवर पोहोचले. चांदीच्या भावात सोमवारी पुन्हा दोन हजारांची घट होऊन तिचा भाव दोन लाख ६६ हजार रुपयांवर (प्रतिकिलो) पोहोचला आहे.
पडझड का ?
युद्धामुळे वाढलेल्या तेलाच्या किमती
तेल आयातीवरील भारताचे अवलंबित्व
रुपयाच्या किमतीत झालेली घसरण
जागतिक बाजारांतील मोठी पडझड
परकी गुंतवणूकदारांमधील विक्रीचा कल
२५ दिवसांनीच गॅस बुकिंग
घरगुती वापरासाठीच्या गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, या उद्देशाने सरकारने सिलिंडर रिफील बुकिंगच्या नियमांत बदल केला आहे. आता ग्राहकांना पहिले सिलिंडर घेतल्यानंतर दुसरे २५ दिवसांनीच बुक करता येईल. याआधी हा कालावधी २१ दिवस होता.
रुपया ९२.३४च्या पातळीवर
कच्च्या तेलाचा भाव पिंपामागे १०० डॉलरच्या वर गेल्यामुळे आज रुपयानेदेखील अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ९२.३४ असा नीचांकी टप्पा गाठला. रुपया रविवारी ९१.७४ वर बंद झाला होता. आजच्या घसरणीमुळे आता रुपयाची पडझड थांबविण्यासाठी रिझर्व्ह बँक आक्रमकपणे डॉलरची विक्री करेल का, याकडे अभ्यासकांचे लक्ष आहे.
सध्या औषधनिर्मिती आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात खरेदी सुरू आहे. बाजारातील पडझडीला त्यामुळे थोडा उतारा मिळत आहे. रुपया कमकुवत होत असतानाच गुंतवणूकदार अल्पकाळासाठी बचावात्मक शेअरकडे लक्ष देत आहेत. - विनोद नायर, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स.