Getty Images ट्रम्प यांनी इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्यावर अद्याप सार्वजनिकपणे भाष्य केलेलं नाही
इराणमधील युद्ध संपवण्याच्या प्रश्नावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणमधील अमेरिकेची लष्करी कारवाई लवकरच संपू शकते, परंतु या आठवड्यात ती संपणार नाही.
ट्रम्प म्हणाले, "इराणकडे जे काही होते ते जवळजवळ संपले आहे, अगदी त्यांचे नेतृत्व देखील."
इराणचे नवे नेते म्हणून ज्या नावाची चर्चा होत आहे ते फारसे लोकांना माहीत देखील नाही असं देखील ट्रम्प यांनी म्हटलं.
अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची इराणचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडीबद्दल नाराज असल्याचे म्हटले आहे, हे देखील उल्लेखनीय आहे.
ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचेही सांगितले. संभाषणादरम्यान युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावरही चर्चा झाली, असं त्यांनी म्हटलं.
ट्रम्प म्हणाले, "युक्रेनमधील युद्ध हा एक संघर्ष आहे जो संपताना दिसत नाही. राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात कट्टर वैर आहे आणि ते अद्याप कोणत्याही करारावर पोहोचू शकलेले नाहीत. पण मला वाटते की, त्या मुद्द्यावरील चर्चा सकारात्मक होती."
चर्चेदरम्यान मध्य पूर्वेतील परिस्थितीवरही चर्चा झाली आणि पुतिन यांनी मदत करण्याची तयारी दर्शविली, असंही त्यांनी नमूद केलं.
ट्रम्प यांच्या मते, त्यांनी पुतिन यांना सांगितले, "जर तुम्ही युक्रेनमधील युद्ध संपवण्यास मदत केली, तर ते आणखी उपयुक्त ठरेल."
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी (9 मार्च) इराणचे नवे सर्वोच्च नेते झाल्याबद्दल मोज्तबा खामेनी यांचे अभिनंदन केले.
रशियन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, "रशिया इराणला असलेला पाठिंबा आणि त्यांच्यासोबतची एकजुटता पुन्हा अधोरेखित करतो. आम्ही एक विश्वासार्ह भागीदार राहण्याचे वचन देतो."
गेल्या महिन्याच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. त्यामुळे मध्य पूर्वेतील देशांमध्ये तणाव वाढला आहे.
मोज्तबा खामेनींच्या इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्तीवर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?इराणची राजधानी तेहरानमधील तेल डेपोवर झालेल्या हल्ल्यानंतर मोठी आग लागली आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बघायला मिळत आहेत.
दुसरीकडे, इराणी माध्यमांनी अयातुल्ला अली खामेनी यांच्या जागी पुढील सर्वोच्च नेते निवडण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त दिले आहे. अयातुल्ला अली खामेनींचे पुत्र मोज्तबा खामेनी हे सर्वोच्च नेते म्हणून निवडण्यात आल्याचे वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिले आहे.
इराणचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांच्या निवडीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
फॉक्स न्यूजच्या एका कार्यक्रमात दिलेल्या माहितीनुसार, इराणचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांच्या नियुक्तीवर डोनाल्ड ट्रम्प 'खुश नाहीत'.
फॉक्स न्यूजचे समालोचक ब्रायन किल्मेडे म्हणाले की नवीन सर्वोच्च नेत्याच्या घोषणेनंतर त्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मते, ट्रम्प यांनी त्यांना सांगितले, "मी खूश नाही."
किल्मेडे यांनी संभाषणाबद्दल अधिक तपशील दिले नाहीत. ट्रम्प यांनी अद्याप या विषयावर सार्वजनिकपणे भाष्य केलेलं नाही.
बीबीसी पर्शियनने मेहर न्यूज एजन्सीचा हवाला देत वृत्त दिले आहे की, इराणच्या 'असेंबली ऑफ एक्सपर्ट्सट'चे सदस्य अहमद अलामोलहोदा यांनी सांगितले की, पुढील सर्वोच्च नेत्यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि नवीन नेता निवडला गेला आहे.
अलामोलहोदा पुढे म्हणाले की, आता सर्व काही 'असेंबली ऑफ एक्सपर्ट्सट'चे सचिवालय प्रमुख होसेनी बुशेरी यांच्यावर अवलंबून आहे. तेच हा निर्णय जाहीर करतील.
इराण सरकारचं समर्थन असलेल्या मेहर न्यूज एजन्सीने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये, एक वरिष्ठ धर्मगुरू असे म्हणत आहेत की, इराणच्या 'असेंबली ऑफ एक्सपर्ट्सट'ने दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या जागी कोण येईल यावर जवळजवळ निर्णय झाला आहे.
मेहर न्यूज एजन्सीच्या मते, अयातुल्ला मोहम्मद मेहदी मीरबाघेरी म्हणाले की, 'बहुमताने निर्णय' झाला आहे, परंतु काही प्रक्रियात्मक अडथळे दूर व्हायचे आहेत. लवकरच 'असेंबली ऑफ एक्सपर्ट्सट'ची बैठक होणं अपेक्षित आहे.
सर्वोच्च नेत्याचं नाव जाहीर झालेलं नसलं, तरी रॉयटर्सने 2 इराणी सूत्रांचा हवाला देऊन वृत्त दिले आहे की, अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. असं असलं तरी, अशा दाव्यांची पुष्टी करणे कठीण आहे.
Reuters/Getty Images
इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे (SNSC) प्रमुख अली लारिजानी यांनी अनेक अमेरिकन सैनिक इराणच्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे.
त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं, "माझ्याकडे अशी माहिती आली आहे की, अनेक अमेरिकन सैनिकांना कैद करण्यात आलं आहे. मात्र, अमेरिकेचा दावा आहे की, ते युद्धात मारले गेले."
AFP via Getty Images
ते पुढे म्हणाले, "त्यांच्या निष्फळ प्रयत्नांनंतरही ते सत्य फार काळ लपवू शकणार नाहीत."
मात्र, या दाव्याबाबत अमेरिकेकडून अद्याप कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (7 मार्च) डोव्हर एअर फोर्स बेसवर इराणसोबतच्या युद्धात मृत्यू झालेल्या 6 अमेरिकन सैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. त्यानंतरपासून मध्य पूर्वेतील देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे.
लेबनॉनची राजधानी बेरुत येथील हॉटेलवर इस्रायली हल्ला, 4 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमीलेबनॉनची राजधानी बेरूतमधील एका हॉटेलवर इस्लायलने रविवारी (8 मार्च) केलेल्या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, दक्षिण लेबनॉन आणि बेरूतच्या दक्षिण उपनगरांमध्ये सुरू असलेल्या युद्धात बेघर झालेल्या लोकांच्या आश्रयासाठी हे हॉटेल वापरलं जात होतं.
दरम्यान, आणखी हल्ले होतील या भीतीने काही लोक इमारतीबाहेर पडताना दिसले.
दुसरीकडे इस्रायल डिफेंस फोर्सेसनी टेलिग्रामवर एका पोस्टद्वारे म्हटलं आहे की, त्यांनी लक्ष्य कुद्स फोर्सच्या 'मुख्य कमांडर'ना लक्ष्य करून अचूक निशाणा साधला.
आयडीएफने या आठवड्याच्या सुरुवातीला असा दावा केला होता की त्यांनी लेबनॉन कॉर्प्सचे तात्पुरते कमांडर दाऊद अलिजादेह यांना ठार मारलं आहे.
ट्रम्प यांनी ब्रिटनला म्हटलं, 'आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिलं , "युनायटेड किंगडम, जो कधीकाळी आमचा महान मित्र होता, कदाचित सर्वात महान.. तो अखेर मध्य पूर्वेत 2 विमानवाहू युद्धनौका पाठवण्याचा गंभीर्याने विचार करत आहे."
त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर यांना उद्देशून म्हटलं, "ठीक आहे, पंतप्रधान स्टार्मर, आता आम्हाला त्यांची गरज नाही, पण आम्ही हे लक्षात ठेवू."
Getty Images अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टार्मर
ट्रम्प पुढे म्हणाले, "आम्हाला अशा लोकांची गरज नाही. ते युद्धात तेव्हा सामील होतात, जेव्हा आम्ही ते आधीच जिंकलेलं असतं."
दरम्यान, इराणविरोधात ब्रिटनच्या सरकारने आतापर्यंत कोणत्याही लष्करी कारवाईत सहभागी होण्याची किंवा तसे करण्याची कोणतीही बांधिलकी व्यक्त केलेली नाही.
मात्र ब्रिटनने अमेरिकेला संरक्षणासाठी त्यांच्या लष्करी तळांचा वापर करण्याची परवानगी दिली आहे.
मला वाटतं इराणनेच शाळेवर हल्ला केला आहे - ट्रम्पइराणमधील मिनाब येथील शाळेवरील हल्ल्यामागे इराणचा हात असू शकतो, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
इराणी अधिकाऱ्यांनी या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं होतं. बीबीसी न्यूजने या आकड्याची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.
शनिवारी रात्री एअर फोर्स वन विमानात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांना विचारण्यात आलं की, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) एका ठिकाणाजवळ झालेल्या या हल्ल्यासाठी अमेरिका जबाबदार आहे का?
यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, "नाही! माझ्या मते आणि मी जे पाहिलं त्यावरून हा हल्ला इराणनेच केला आहे."
यावेळी अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनाही प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, "आम्ही याची चौकशी करत आहोत, परंतु, नागरिकांना लक्ष्य करण्याची पद्धत साधारणपणे इराणचीच राहिली आहे."
यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा म्हटलं, "आम्हाला वाटते हा हल्ला इराणनेच केला आहे. तुम्हाला माहिती आहे की त्यांची शस्त्रं फारशी अचूक नाहीत. त्यांच्याकडे अचूकता नाही."
Getty Images
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनीही म्हटलं होतं की, अमेरिका जाणीवपूर्वक कोणत्याही शाळेला लक्ष्य करणार नाही आणि नागरिकांच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचे अमेरिकन सैन्याकडे कोणतेही कारण नाही.
मात्र, त्याचवेळी अमेरिका आणि इस्रायल इराणच्या लष्करी तळांवर आणि नेत्यांवर मोठे हल्ले करत होते.
दरम्यान, इराणी अधिकाऱ्यांनी शाळेवरील हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार ठरवलं आहे. तर इस्रायली सैन्याने म्हटलं आहे की, त्या भागात कोणतीही कारवाई केल्याची माहिती त्यांच्याकडे नाही, मात्र ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
बीबीसी व्हेरिफायच्या उपग्रह विश्लेषणात अनेक स्फोटांच्या खुणा आणि जळालेल्या जागा दिसून आल्या, ज्यावरून असे दिसून येते की, शाळेवर एकापेक्षा जास्त वेळा हल्ला झाला होता.
मात्र, वापरलेल्या शस्त्रांचे अवशेष स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे हा हल्ला नेमका कोणी केला हे निश्चितपणे सांगता येणं कठीण आहे.
अडकलेले किती भारतीय देशात परतले? परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती
Getty Images
मध्य पूर्वेतील वेगाने विकसित होणाऱ्या परिस्थितीवर, विशेषतः तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत, बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं भारताने शनिवारी (7 मार्च) म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने उशिरा रात्री जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, या भागात काही प्रमाणात हवाई क्षेत्र खुले झाल्यानंतर आतापर्यंत 52,000 हून अधिक भारतीय नागरिक देशात परतले आहेत.
मंत्रालयाने त्या प्रदेशात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे आणि भारतीय दूतावासांनी जारी केलेल्या निर्देशांचे पालन करावे.
गेल्या शनिवारी (7 मार्च) अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. त्यानंतरपासून मध्य पूर्वेतील देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
इराणच्या तेल साठा केंद्रांवर इस्रायलचा मोठा हल्लाइस्रायल सुरक्षा दलाने इराणची राजधानी तेहरानमधील 'अनेक फ्युल स्टोरेज कॉम्प्लेक्स'वर हल्ला केल्याची पुष्टी केली आहे.
आयडीएफच्या मते, फ्युल टँक्सविरोधात केलेला हा एक आवश्यक हल्ला होता.
सैन्याने असा दावा केला की, इराणी शासन "सैन्याला पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी या फ्युल टँक्सचा वापर" करत होते.
याआधी इराणच्या फार्स या वृत्तसंस्थेनंदेखील तेहरानमधील एका तेल साठ्याला लक्ष्य करण्यात आल्याचं वृत्त दिलं होतं.
Getty Images
दरम्यान, बीबीसी व्हेरिफायने सोशल मीडियावर शेअर झालेल्या एका व्हीडिओची पुष्टी केली आहे. या व्हीडिओमध्ये तेहरानच्या आकाशात आग आणि धुराचे मोठे लोळ उठल्याचे दिसून येत आहे.
मात्र, या हल्ल्यात आतापर्यंत कोणाचा मृत्यू झाला आहे की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही.
'इराणचं सैन्य 'पूर्णपणे उद्ध्वस्त' झालं, त्यांची सर्व 32 जहाजं समुद्रात बुडाली'; ट्रम्प यांनी काय दावे केले?दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (6 मार्च) म्हटलं की, अमेरिका इराणविरोधात चांगलं काम करत आहे. इराणचं सैन्य 'पूर्णपणे उद्ध्वस्त' झाल्याचाही दावा त्यांनी केला.
व्हाईट हाऊसमध्ये कॉलेज स्पोर्टसवर आयोजित राउंडटेबल दरम्यान ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, "आमचं सैन्य अतिशय चांगली कामगिरी करत आहेत"
Reuters व्हाइट हाऊसमध्ये कॉलेज क्रीडासंदर्भात झालेल्या राउंडटेबलदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
ट्रम्प म्हणाले, "त्यांचं (इराण) सैन्य संपलं आहे, त्यांचं नौदलही संपुष्टात आलं असून हवाईदलही पूर्णपणे नष्ट झालं आहे. त्यांचं कम्युनिकेशन बंद पडलं असून पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेतृत्व संपलं आहे. त्यांच्याकडे आता तिसऱ्या फळीतील नेतृत्व उरलं आहे."
"त्यांच्याकडे 32 जहाजं होती, ती सर्व जहाजं समुद्रात बुडाली आहेत", असाही दावा त्यांनी केला.
इराणच्या मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?इराणच्या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हीडिओ फुटेजमध्ये मेहराबाद विमानतळावर जळणारी विमाने आणि त्यातून निघणारा धूर दिसत आहे.
शुक्रवारी (6 मार्च) घेतलेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये विमानतळावर अनेक विमान असल्याचं दिसून येत आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनीही विमानतळाच्या काही भागांना लक्ष्य करण्यात आल्याचं वृत्त दिलं आहे.
ATTA KENARE / AFP via Getty Images या विमानतळाच्या नेमक्या कोणत्या भागांवर बॉम्बस्फोट करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हे अशा वेळी घडलं, जेव्हा इस्रायली लष्कराने इराणमध्ये 'मोठ्या प्रमाणावर नवे हल्ले' सुरू करत असल्याचे सांगितलं.
यापूर्वी इस्रायली लष्कराने 4 मार्च रोजीही या विमानतळाला लक्ष्य केले होते. त्यावेळी त्यांच्या हल्ल्यांमुळे इस्रायली हवाई दलासाठी धोका निर्माण करणाऱ्या संरक्षण आणि शोध यंत्रणा नष्ट केल्याचा दावा करण्यात आला होता.
या विमानतळाच्या नेमक्या कोणत्या भागांना लक्ष्य करण्यात आलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, यावेळी बॉम्बस्फोट अतिशय तीव्र होता, असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे.
इराणमध्ये आतापर्यंत किती जणांचा मृत्यू?संयुक्त राष्ट्रांमधील (युएन) इराणचे स्थायी प्रतिनिधी अमीर सईद इरवानी यांनी सांगितलं की, 28 फेब्रुवारीपासून देशावर झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत 1,332 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
न्यूयॉर्कमधील युएन मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना इरवानी यांनी सांगितलं की, इराणी रेड क्रिसेंट सोसायटीच्या मते मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
ते म्हणाले, "हजारो लोक जखमी झाले आहेत आणि ही संख्या सतत वाढत आहे."
UN संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे स्थायी प्रतिनिधी अमीर सईद इरवानी म्हणाले की, हल्ल्यात "हजारो लोक जखमी झाले असून ही संख्या सतत वाढत आहे."
शाळा, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांना 'जाणूनबुजून' लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप इरवानी यांनी केला.
मात्र, अमेरिकेने नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले केल्याचा आरोप नाकारला आहे. इराणमधील मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात अमेरिकेने 'चौकशी केली जाईल' असे म्हटले. या हल्ल्यात 150 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये बहुतेक मुली आहेत.
दरम्यान, इस्रायलनेही इराणवर त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)