Thaai Kizhavi Box Office Collection: तमिळ चित्रपटसृष्टीत सध्या एका छोट्या बजेटच्या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. राधिका सरथकुमार मुख्य भूमिकेत असलेला ‘थाई किझावी’ हा ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित कॉमेडी-ड्रामा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई करत आहे. अवघ्या 9 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली असून रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यातही थिएटरमध्ये जोरदार कमाई सुरू आहे. विशेष म्हणजे मोठे स्टार नसतानाही या चित्रपटाने दक्षिणेतील आणि बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. (Box Office Collection)
दिग्दर्शक शिवकुमार मुरुगेसन यांच्या ‘थाई किझावी’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत 50 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाने 27 फेब्रुवारी रोजी भारतात 2.65 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह ओपनिंग केली होती. त्यानंतर पहिल्या वीकेंडला कमाईत मोठी वाढ झाली. शनिवारी 5 कोटी तर रविवारी 6.15 कोटी रुपयांची कमाई झाली. आठवड्याच्या दिवसांमध्येही चित्रपटाची कमाई स्थिर राहिली आणि कलेक्शन 1.7 कोटींहून कमी झाले नाही.
रिपोर्टनुसार, रिलीजच्या 12 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी चित्रपटाने सुमारे 1.79 कोटी रुपये कमावले. यासह भारतातील चित्रपटाची 12 दिवसांची नेट कमाई 39.64 कोटी रुपये झाली आहे. तर भारतातील ग्रॉस कलेक्शन 45.36 कोटी रुपये झाले आहे.
‘थाई किझावी’ हा शिवकुमार मुरुगेसन यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे आणि त्यांनीच याची कथा लिहिली आहे. हा चित्रपट पॅशन स्टुडिओज आणि शिवकार्तिकेयन प्रोडक्शन्स यांच्या बॅनरखाली तयार झाला आहे.चित्रपटात राधिका सरथकुमार मुख्य भूमिकेत असून सिंगमपुली, अरुलडोस, मुनीशकांत, बाला सरवनन आणि इलावरसु हे कलाकार सहाय्यक भूमिकांमध्ये दिसतात.
या चित्रपटाची कथा काही मुलांभोवती फिरते. त्यांची आई पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळलेली असते. तिच्या मृत्यूनंतर वारसाहक्काने पैसे मिळतील अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र आईकडे एक मौल्यवान खजिना असल्याचे समजल्यावर परिस्थिती बदलते आणि ते तिला जिवंत ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करू लागतात. या कथेतून एक डार्क कॉमेडी फॅमिली ड्रामा उलगडत जातो.