नाशिक: महापालिका क्षेत्रात समाविष्ट २४ खेड्यांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अंदाजपत्रकात महापौर हिमगौरी आडके यांनी निधीची तरतूद केली. त्याव्यतिरिक्त खेडे विकासासाठी विशेष निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचेही महापौरांनी जाहीर केले.
सभागृहात बोलू न दिल्याने सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी पीठासनासमोर ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना खडे बोल सुनावत महासभा गुंडाळल्याने सभा संपल्यानंतरही सत्तारूढ पक्षासह ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी पीठासनासमोर ठिय्या आंदोलन केले.
महापालिकेची नियमित सभा बुधवारी (ता. १८) महापौरांच्या अध्यक्षतेखाली झाली. पत्रिकेवरील खेडे विकास निधीचा विषय उपमहापौर विलास शिंदे, दिनकर पाटील, प्रमोद पालवे, संगीता घोटेकर, भारती धिवरे यांनी उपस्थित केला. शहरातील खेडे भागाच्या विकासाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. अंदाजपत्रकातून खेडे विकास निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष यापूर्वी होते. परंतु २०१८ पासून लेखाशीर्ष वगळल्याने खेडे परिसर विकासापासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला.
उपमहापौर शिंदे यांनी खेडे विकासाचा १४ वर्षांचा वनवास संपविण्याची मागणी केली. दाढेगाव, वडनेर दुमाला, पाथर्डी, चेहेडी, चाडेगाव, देवळाली, मखमलाबाद, नांदूर-मानूर, आडगाव, म्हसरूळ, अंबड, मोरवाडी गाव, पिंपळगाव खांब, अंबडगाव, वडाळागाव, विहितगाव, सातपूर, गंगापूरगाव, आनंदवली, दसक या गावांमधील प्रलंबित प्रश्नावरून नगरसेवक आक्रमक झाले. खेडे विकास निधीसाठी स्वतंत्र तरतूद करून विकास करण्याची मागणी केली. महापौरांनी खेडे परिसर समाविष्ट असलेल्या प्रभागांसाठी अंदाजपत्रकात जादा तरतूद करण्याची घोषणा केली.
सभागृहात गोंधळ
खेडे विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याच्या विषयावर प्रत्येक प्रभागातील एका नगरसेवकाला बोलू देण्याची भूमिका महापौरांनी घेतली. मात्र खेडे भागातील सर्वच नगरसेवकांना भूमिका मांडायची असल्याने आग्रह धरण्यात आला. परंतु त्याच प्रभागातील दुसऱ्या नगरसेवकाला बोलण्यास महापौरांनी परवानगी न दिल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. प्रभाग १९ मधील योगेश भोर, भारती ताजनपुरे यांनी सभागृहातील पीठासनासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर महापौरांनी खडसावताना लेखी स्वरूपात मांडण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, परंतु त्यानंतर लगेचच महापौरांनी खेडे विकास निधीसह जादा विषय मंजूर करत महासभा संपल्याचे जाहीर केल्याने नगरसेवक आक्रमक झाले. ठाकरे शिवसेना, काँग्रेस व सत्तेत सहभागी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. शिवसेनेचे भागवत आरोटे, किरण गामणे, योगेश भोर, भारती ताजनपुरे यांनी ठिय्या आंदोलन केले.
महापौरांची दादागिरी खपवून घेणार नाही. प्रश्नांवर गंभीर नसल्याचा आरोप केला. सभागृहातून महापौर निघून गेल्यानंतर महापौरांच्या दालनाकडे धाव घेत नाराजी व्यक्त केली. शिवसेना (उबाठा) गटनेते केशव पोरजे व प्रथमेश गिते यांना त्यांच्या पक्षातील नगरसेवकांना शिस्त लावण्याचे महापौरांनी सुनावले.
गांधीगिरी पद्धतीने आंदोलन
महापालिकेच्या सभागृहात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमा लावण्यासाठी जागृती गांगुर्डे, सीमा ठाकरे, किरण राजवाडे, आशा तडवी यांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. ही प्रतिमा महापौर, उपमहापौर, आयुक्तांना भेट दिल्या.
द्वारका पाणीप्रश्नावरून पोस्टरबाजी
द्वारका परिसरात एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आल्याने याविरोधात नगरसेवक प्रथमेश गिते व सीमा पवार यांनी सभागृहात पोस्टर आंदोलन केले. ‘द्वारका परिसराला कोणी पाणी देत का पाणी’ या आशयाचे पोस्टर झळकावले.
Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?८८ लाखांची वस्त्र धुलाई
बिटको रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांना चादर, बेडशीट घरून आणावे लागत असताना वैद्यकीय विभागाने ८८ लाखांच्या वस्त्र धुलाई व रक्तघटक रक्तपेढीकरिता ३९ लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव सादर केला होता. धुलाईच्या प्रस्तावाला महासभेत भारती ताजनपुरे, रुचिरा साळवे यांनी विरोध केला. रुग्णालयातील सेवा सुधारण्याची मागणी करण्यात आली. या वेळी प्रमोद पालवे यांनी रुग्णालयातील दैनावस्थेचे फोटो दाखवले. महापौरांनी प्रस्ताव मंजूर केला.