जंगल सफारीत विद्यार्थ्यांचा निसर्गानुभव; जांभळी येथे उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
esakal March 19, 2026 07:45 PM

जंगल सफारीत विद्यार्थ्यांना निसर्गानुभव

जांभळी येथे उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार

आनेवाडी, ता. १९ : वाईचा सामाजिक वनीकरण विभाग आणि उडतरे येथील बाळासाहेब पवार हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने वाई तालुक्यातील जांभळी निसर्ग पर्यटन केंद्रात विद्यार्थ्यांसाठी जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले हाेते. या उपक्रमास सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
सफारीदरम्यान विद्यार्थ्यांनी कमंडलू नदीचे दर्शन घेतले. ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखराचेही त्यांनी जवळून निरीक्षण केले, तसेच विविध प्रकारच्या वनस्पती, झाडेझुडपे, वेलींची माहिती घेताना जंगलातील प्राण्यांच्या पावलांचे ठसेही पाहण्यास मिळाले. करवंद, आंबोळी यांसारखा रानमेवा चाखण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला.
यावेळी सामाजिक वनीकरण विभागाने कमी जागेत अधिक वृक्ष लागवड करण्याच्या जपानी पद्धतीवर आधारित उपक्रमाचे प्रात्यक्षिक दाखवले. एकाच वेळी लावलेल्या झाडांमध्ये सूर्यप्रकाश व पाण्यासाठी होणारी निकोप स्पर्धा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिली.
जंगलातील स्वच्छ हवा, शांत वातावरण आणि दैनंदिन जीवनापासून वेगळी अनुभूती यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता. निसर्गातील प्रत्येक घटकाचा त्यांनी उत्साहाने अभ्यास केला.
या सहलीत वाईच्या कन्या शाळेचाही सहभाग होता. उपक्रमाचे आयोजन स्काऊट गाइड व हरितसेना क्रीडा शिक्षक प्रकाश सोनावणे आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब बनसोडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप बाबर, पंचायत समिती सदस्या राणी पवार, सरपंच अर्चना पवार तसेच पाचवड येथील तिरंगा स्कूलचे जयवंत पवार उपस्थित होते.
या उपक्रमात वनक्षेत्रपाल कुंडलिक होरे, वनपाल दौलत भोसले, वनरक्षक वसंत गवारी, हर्षदा हांडे, वैभव शिंदे, दादा जानकर, राहुल निकम, वनसेवक सुनील बुलुंगे तसेच शिक्षक वर्गातील प्रकाश सुतार, नयना शिंदे, सौ. तनपुरे, प्रीती बागुल आणि गजानन पाडळे यांनी सहभाग घेतला.

फोटो :.......... 02435
जांभळी : जंगल सफारीदरम्यान निसर्गाचा आनंद लुटताना विद्यार्थी.
.................................................................................

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.