एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
एबीपी ब्युरो March 19, 2026 10:13 PM

Maharashtra Rain News : राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. यामुळं अनेक ठिकाणी शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचे दिसत आहे. अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांची तारंबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. 

बुलढाण्यातील अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर व खामगाव तालुक्यातील अनेक परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला तर काही भागात तुरळक प्रमाणात गारपीट देखील झाली. दुपारच्या सुमारास चिखली शहर परिसरात अचानक झालेल्या गारपिटीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर शेतीची कामे करण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांची मात्र धावपळ उडाली अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांदा या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 वाशिम जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह गारपीट 

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यातील सायंकाळच्या सुमारास काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर काही भागात गारपीटीची नोंद झाली आहे. वाशिमसह रिसोड, मंगरुळपीरच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी बरसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काढणीला आलेली तसेच उभी असलेली गहू, हरभरा, कांदा आणि फळबागांवरील पिके धोक्यात आली आहेत. दरम्यान, हवामान विभागाने येत्या दोन  ते तीन दिवस जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिल्याने आणखी शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात वादळी पाऊस आणि गारपीट 

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात वादळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. चिंचोली बुद्रुक गावाला लगत असलेल्या लखमाजी महाराज मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. आज दुपारनंतर अचानक अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक गावांत वादळी वारा आला आणि काही गावात वादळी पाऊस पडला तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस होत आहे. अकोला जिल्ह्यात देखील अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. याचा फळ बागांना फटका बसला आहे. 

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सावरा, मोहाळा, वडनेर गंगईसह 15 ते 20 गावात गारिपीटसह पाऊस झाला आहे.. जवळपास 20 ते 25 मिनिटं गारपिट आणि पाऊस सुरू होता, पावसाचं जोराचा वारा देखील वाहत होता.. या गारपीटीमुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे.. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी विशेषता फळ बाग शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.

जालना शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस

जालना शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊ झाला आहे. जालना आणि बदनापूर तालुक्यात पावसासह गारपीट झाली आहे. जालना जिल्ह्यातील मोसंबी, आंबा, द्राक्ष यासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जालना जिल्ह्याला आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता. जालना जिल्ह्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.

नाशिक जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपीट

नाशिक जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकदा, वनसगाव, उगाव परिसरात जोरदार गारपीट झाली आहे. लासलगाव, विंचूर, लोणवाडी, पालखेड, रानवड, खानगावसह तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे द्राक्ष, कांदा आणि गहू पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्याता आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी माढा तालुक्यात अवकाळी पाऊस

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी माढा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला आहे. बार्शी तालुक्यातील ममदापूर, पांगरी,गोरमाळा,कारी या भागात गारांचा पाऊस झाला आहे. यामुळे कांदा,गहू,ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.