Pune News : मध्य रेल्वेत चोरीचा सुळसुळाट; १६ दिवसांत मोबाईल व मंगळसूत्र चोरी
esakal March 19, 2026 11:45 PM

दौंड : मध्य रेल्वेच्या पुणे - दौंड - सोलापूर आणि अहिल्यानगर - दौंड कॅार्ड लाइन स्थानक - पुणे दरम्यानच्या प्रवासात मागील सोळा दिवसांत दोन ज्येष्ठ महिला प्रवाशांचे दोन मंगळसूत्र हिसकावण्यात आले आहे. तर प्रवाशांचे नऊ मोबाईल संच चोरीस गेले आहेत.

१ ते ५ मार्च दरम्यान बिदर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस, हजूर साहिब नांदेड - पनवेल एक्सप्रेस, पुणे - दौंड डीइएमयू, हैद्राबाद - मुंबई एक्सप्रेस, नागपूर - पुणे एक्सप्रेस, दादर - पंढरपूर - सातारा एक्सप्रेस आणि दौंड रेल्वे स्थानकावरून एकूण नऊ मोबाईल संच चोरीस गेले. चोरीस गेलेल्या या नऊ मोबाईल संचांचे एकूण मूल्य १ लाख ८६ हजार २३९ रूपये इतके आहे. दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात या प्रकरणी संबंधित प्रवाशांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठाणे रेल्वे मार्गावर मोबाईल चोरीचे सत्र सुरूच

१४ मार्च रोजी महाराष्ट्र एक्सप्रेस दौंड कॅार्ड लाईन रेल्वे स्टेशनवरून रवाना झाल्यावर दोन मंगळसूत्र हिसकावण्यात आले. स्मिता शशिकांत जोशी ( रा. दत्तवाड, जि. कोल्हापूर) व अमृता अरूण जोशी ( रा. अंकली, जि. बेळगाव, कर्नाटक ) यांच्या गळ्यातील सोन्याचे प्रत्येकी एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरण्यात आले. धावत्या गाडीच्या खिडकीतून हात घालून हे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. तर १६ मार्च रोजी अजनी - पुणे हमसफर एक्सप्रेसने प्रवास करणार्या आयुषी खुमेंद्र बोपचे ( वय २१, रा. बालाघाट, मध्य प्रदेश) यांची दहा हजार रूपयांची रोकड असलेली पर्स दौंड कॅार्ड लाइन स्थानक सोडल्यावर चोरीस गेली.

मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर प्रवासी गाड्या आल्यानंतर काही संशयास्पदरित्या वावरणारे महिला व तरूण फलाटावर फिरून आरक्षित डब्यांसमोर किंवा आत जाऊन टेहळणी करतात. त्याचवेळी टोळीतील अन्य सदस्य चोरलेल्या वस्तू गाडीच्या दाराजवळील कचऱ्याच्या कुंडीत किंवा प्रसाधनगृहातील कुंडीत टाकून निघून जातात. स्थिती पाहून टोळीतील अन्य सदस्य त्या वस्तू काढून धावती गाडी सोडून निघून जातात. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील रेल्वे स्थानकांच्या बाहेर तळ ठोकून राहणारे आणि प्रवासी गाड्यांमध्ये वावरणाऱ्या अल्पवयीन मुलांचा व संशयास्पद वर्तन असलेल्या महिलांचा या चोऱ्यांसाठी वापर होत असल्याची माहिती नागरिकांना आहे. परंतु रेल्वे प्रशासनाला माहिती असूनही कारवाई टाळली जात आहे.

मोबाईलच्या किंमतीवरून तपास होतो ?

प्रवाशाचा चोरीला गेलेला मोबाईल संच दहा हजार रूपयांचा आहे का दीड लाख रूपयांचा यावरून तपासाची दिशा ठरवून सोईने तपास केला जातो. मोबाईल वरून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची नोंदणी, डिजिटल पेमेंट, बॅंक खात्यांचे वन टाईम पासवर्ड (ओटीपी) आधारे व्यवहार केले जात असल्याने संबंधित प्रवासी मोबाईल चोरीनंतर प्रचंड अडचणीत येतात. आरक्षित डब्यातील प्रवासी मोबाईल संचावरून रेल्वे प्रवासाचे आरक्षण व परतीचा प्रवास करतात आणि त्याचा तपशील मोबाईल मध्ये असल्याने तोच मोबाईल चोरीला गेल्यावर त्यांची अवस्था दयनीय होते. रेल्वे प्रशासनाकडून चोऱ्यांचा प्रतिबंध करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

वाढत्या चोऱ्यांना आळा कोण घालणार ?

रेल्वेच्या गुलबर्गा - सोलापूर - दौंड - पुणे, अहिल्यानगर - दौंड कॅार्ड लाइन स्थानक - पुणे, पुणे - दौंड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रवासी गाड्यांमधील दागिन्यांच्या बॅग व पर्सची चोरी, चार्जिंगला लावलेल्या मोबाईल संचांची चोरी, लॅपटॅाप व टॅब चोरीचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात धावत्या गाडीतून दोन ज्येष्ठ महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. आरक्षित, अनारक्षित व वातानुकुलित डब्यांमध्ये या चोऱ्या होत आहेत. कडेवर लहान मूल घेऊन प्रवासी गाड्यांच्या खिडकीतून किंवा आत जाऊन प्रवाशांकडे खाद्यपदार्थ मागणी करून अथवा भीक मागण्याच्या नावाखाली टेहळणी केली जात आहे. अवघ्या २ ते ४ मिनिटांत मोबाईल संच आणि चीजवस्तू चोरल्या जात असताना प्रवाशांना चोरी झाल्याचे लक्षात येईपर्यंत स्थानक सोडलेले असते. चोरी झाल्यानंतर प्रवास खंडित न करता धावत्या गाडीतच रेल्वे अधिकार्यांकडे तक्रार देण्याची व्यवस्था आहे. परंतु बहुतांश प्रवासी त्यांच्या गंतव्य स्थानकावरून उतरून तक्रार देत असल्याने चोरांचा शोध घेणे कठिण होऊन बसते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.