Raj Thackeray Gudi Padwa Melva : आपल्या पक्षाला आज 20 वर्ष झाली आहेत. 20 वर्षानंतर 19 मार्चला गुढीपाडवा यावा, याला मी शुभसंकेत समजत असल्याचे मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. आपण महाराष्ट्रासाठी उभे आहोत. मी टाळ्यांसाठी बोलत नाही. महाराष्ट्राचे गतवैभव मिळवण्यासाठी, भविष्यात सत्ता घेणार हा माझा आत्मविश्वास आहे असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी इराण इस्रायल युद्धावर देखील प्रतिक्रिया दिली. इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवर हल्ले होत असताना आपण इराणाणला साथ द्यायला हवी होती अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. भविष्यात याचा फटका बसणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री सांगतायेत विकास करायचाय. तीन ट्रीलीयनची अर्थव्यवस्था करायची आहे. पण सध्या महाराष्ट्रावर 11 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा राज्यावर 2 लाख कोटींचे कर्ज होते. 2014 ते 2026 या काळात हे सगळं 11 लाख कोटींचे कर्ज झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. आज शहरं कोलमडून पडली आहेत. मी मध्यंतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलो असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. आपण सगळं गमावून बसलो आहे. तरुण शेती करायला नको म्हणत आहेत. शहरात यायचे म्हणातात. शहराला आकार ना उकार राहिला आहे. कोणालाही कसल्याही परवानग्या दिल्या जात आहेत. तुम्ही पाहता आणि राग मोबाईलवर व्यक्त करत आहेत. तुम्ही रस्त्यावर येता कामा नये, तुम्ही असेच सडा, मरा हे त्यांना हवे आहे असे राज ठाकरे म्हणाले. पहिल्यांदा मोबाईलच्या इन्स्टाग्रामधून बाहेर या असा सल्ला देखील राज ठाकरेंनी तरुणांना यावेळी दिला.
आजपर्यंत 3 वेळा शेतकरी कर्जमाफी झाली. आज राज्याते सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत. रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. तुमच्यासाठी कोस्टल रोड करत आहेत. तो रस्ता तुमच्यासाठी झाला नाही बाकीच्यांना आत येण्यासाठी झाला आहे. असे राज ठाकरे म्हणाले. अडाणीसारखे उद्योगपती जमिनी घेत आहेत. आपण महाराष्ट्राची ओळख गमावून बसत आहोत. आमपण भाषा गमावून बसत आहोत. हातातून गेलेली गोष्ट परत येणार नाही. भाषा संपली की अनेक देश जगातून सपंले आहेत असे राज ठाकरे म्हणाले.