इन्स्टाग्राममधून बाहेर पडा, तुम्ही प्रश्न विचारू नये यासाठी करमणुकीत गुंतवून ठेवलं जात आहे : राज ठाकरे
एबीपी माझा ब्युरो March 19, 2026 11:43 PM

मुंबई : लोकांनी प्रश्न विचारू नये यासाठी त्यांना सातत्याने करमणुकीत गुंतवून ठेवलं जात आहे, त्यासाठी चित्रपट, आयपीएल आणि इतर अनेक माध्यमांचा वापर केला जात आहे. लोकांनी यामध्ये गुंतून जावं आणि सत्तेला प्रश्न विचारू नये यासाठी ही सोय केली जात असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. लोकांनी आधी इन्स्टाग्रामधून बाहेर पडावं, रोज महाराष्ट्राचं अस्तित्व मिटवलं जात आहे असंही राज ठाकरे म्हणाले. 

राज ठाकरेंच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. आपण या ठिकाणी आहोत ते महाराष्ट्रासाठी आहोत. आपल्याला ही सत्ता भविष्यात हाती घ्यायची आहे आणि ती आपण घेणार म्हणजे घेणार, असा विश्वास यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केला. 

Raj Thackeray On Iran War : इराणला साथ द्यायला हवी होती

जो इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता, त्या इराणवर हल्ले होताना आपण त्यांना साथ द्यायला हवी होती. आपल्याला इराण तेल रुपयामध्ये देतो. पण खामेनी गेल्यानंतरही आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी एकही निषेधाचं वक्तव्य केलं नाही. इराणने जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर आपल्याला पाठिंबा दिला होता, पण आपण तो देश अडचणीत असतानाही त्यांना साथ दिली नाही. याचा भविष्यात आपल्याला त्रास नक्कीच होणार. या देशात काय चाललंय, लोक कुठे निघालेत... कुणाला काही पत्ता नाही. 

Raj Thackeray On Instagram : करमणुकीच्या गटारगंगेमध्ये अडकून ठेवलंय

आपल्याला आज करमणुकीमध्ये गुंतवून ठेवलं आहे. आयपीएल,  कुठले तरी पिक्चर आणि इतर माध्यमातून गुंतवून ठेवलं जातंय. त्यामुळे पहिल्यांदा इन्स्टाग्राममधून बाहेर पडा. तुम्ही गुंतवून राहिला तर सरकारला प्रश्न विचारू नये यासाठी हे सगळं आखलेलं आहे. हे फक्त भारतात नव्हे तर जगभरात सुरू आहे. सर्वसामान्य माणसांनी मोबाईलमध्ये, करमणुकीमध्ये अडकून राहावं, मग कुणीही विचार करणार नाही. 

पूर्वी लोक रस्त्यावर यायचे, पण आता मोबाईलवर निषेध व्यक्त केला जात आहे. माध्यमांची वाट लावून टाकली आहे. सरकारला विरोध केला तर जाहिराती बंद करू अशी धमकी दिली जाते. या अशा विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकला आहे. 

या करमणुकीच्या गटारगंगेत वाहत जाऊ नका. आपल्याला तीन ट्रिलियन इकॉनॉमी करणार असं मुख्यमंत्री होतात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दोन लाख कोटी रुपये राज्यावर कर्ज होतं. आता राज्यावर 11 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. कुठे चाललोय आपण? असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी विचारला. आपल्या राज्यात तीन वेळा कर्जमाफी झाली, पण शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्याही आपल्याच राज्यात होतात हे दुर्दैवी असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

महापुरुषांच्या कार्याचा गौरव

या भाषणादरम्यान राज ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी योगदान असलेल्या व्यक्तिमत्वांची यादी वाचवून दाखवली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक महान लोकांची नावं घेतली. त्याचवेळी त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या विकासात ज्यांचा वाटा आहे त्यांचीही यादी वाचून दाखवली. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, वि स पागे, संघाचे हेगडेवार, वि का राजवाडे, बाबासाहेब पुरंदरे, रणजित मेहंदळे यांच्या नावांचा आणि कार्याचा गौरव राज ठाकरे यांनी केला. 

आपल्याकडे या महान लोकांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात, पण त्यांचे विचार कधीही घेतले जात नाहीत. महाराष्ट्र हा प्रतिमेत अडकल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.