IPL 2026: 18 कोटींचा भाव, मात्र क्रिकेट बोर्डाची आयपीएल खेळण्याची परवानगी नाही, कारण…
GH News March 20, 2026 01:10 AM

आयपीएलच्या 19 व्या मोसमाची प्रतिक्षा दिवसेंदिवस शिगेला पोहचत आहे. या 19 व्या मोसमाचं काउंटडाउन सुरु झालंय. या बहुप्रतिक्षित 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधीच दुखापतीमुळे खेळाडूंचं या मोसमातून बाहेर होणं सुरुच आहे. कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे. केकेआरचा मॅच विनर गोलंदाज हर्षित राणा यालाआधीच दुखापत झालीय. त्यामुळे टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलं आहे. तर दुसऱ्या बाजूला केकेआरच्या एका खेळाडूला त्याच्या क्रिकेट बोर्डाकडून आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळालेलं नाही. या खेळाडूला त्याला झालेल्या दुखापतीमुळे परवानगी मिळालेली नाही.

मथीशा पथिराणा याला दुखापत

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीषा पथीराणा याला दुखापतीमुळे क्रिकेट बोर्डाकडून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. पथीराणा याला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यादरम्यान पथीराणाच्या डाव्या पायाच्या पोटरीला त्रास जाणवला. त्यामुळे पथीराणाला बॉलिंग करताना तीव्र वेदना झाल्या. पथीराणा मैदानात पडला. पथीराणाला या दुखापतीमुळे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं.

त्यानंतर पथीराणा आगामी आयपीएलच्या 19 व्या मोसमापर्यंत फिट होण्याची प्रतिक्षा करत होता. मात्र पथीराणा फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला. त्यामुळे पथीराणाला श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून अद्याप ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही.

पथीराणासाठी केकेआरने मिनी ऑक्शनमध्ये 18 कोटींची बोली लावून त्याला आपल्या गोटात घेतलं. मथीशासाठी केकेआर आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये ऑक्शन दरम्यान कडवी झुंज पाहायला मिळालीय. मात्र केकेआर पथीराणाला आपल्यात घेण्यात यशस्वी ठरली.

पथीराणाचीआयपीएल कारकीर्द

दरम्यान पथीराणा आयपीएल स्पर्धेत 2022 पासून खेळतोय. पथीराणा याने आतापर्यंत एकूण 32 सामन्यांमध्ये 47 विकेट्स मिळवल्या आहेत. पथीराणाचा इकॉनमी रेट हा 8.6 इतका आहे. पथिराणा डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट गोलंदाज आहे. पथीराणा गेल्या हंगामापर्यंत चेन्नई सुपर किंग्स टीमकडून खेळत होता. यंदा तो केकेआरकडून पदार्पण करणार आहे. या मोसमातला सुरुवात होण्यासाठी 9 दिवस बाकी आहेत. आता त्याआधी मथीशा फिटनेस टेस्टमध्ये पास होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी केकेआर टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, अंगकृष रघुवंशी, मनीष पांडे, कॅमरून ग्रीन, फिन एलन, तेजस्वी सिंह, राहुल त्रिपाठी, टीम सायफर्ट, रोवमैन पॉवेल, अनुकूल रॉय, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रविंद्र, रमनदीप सिंह, वैभव अरोडा, मथीशा पथिराना, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, आकाश दीप, हर्षित राणा आणि उमरान मलिक.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.