राज ठाकरे यांचे मनसे वर्धापन दिनाचे भाषण, कोणकोणते मुद्दे त्यांनी मांडले?
BBC Marathi March 20, 2026 02:45 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर भाषण केलं.

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या सभेला संबोधित केलं.

"एक दिवस महाराष्ट्राची सत्ता हातात घेणार म्हणजे घेणारच," अशी घोषणा करून त्यांनी भाषणाला सुरुवात केली.

या भाषणात त्यांनी सध्या राज्य आणि देशात सुरू असलेल्या गॅस टंचाई, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेलं युद्ध, आयपीएल, राज्यातील कंत्राटदारांची परिस्थिती अशा विविध मुद्द्यांना हात घातला.

शिवतीर्थावर केलेल्या भाषणाच्या राज ठाकरे म्हणाले, "20 वर्षानंतर 19 मार्चला गुढीपाडवा यावा याला मी शुभसंकेत समजतो. आपण महाराष्ट्रासाठी उभे आहोत. मी जो तुम्हाला शब्द दिलाय. भविष्यात आपण सत्ता हातात घेणार म्हणजे घेणार. पुढच्या तीन वर्षात महाराष्ट्रात निवडणूक नाही त्यामुळे कंत्राटदाराकडून पैसे घ्यायला सगळे मोकळे आहेत."

"काही गोष्टी आपल्या पंतप्रधानांकडूनही राहून गेल्या. जो इराण आपल्याला इतके वर्ष साथ देत होता त्या इराणला आपण आज साथ द्यायला हवी होती. बरसचं तेल ते आपल्याला रुपयांमध्ये देत होते. खामेनी गेल्यावर पंतप्रधानांनी कुठलंही स्टेटमेंट काढलं नाही. जे काश्मीरच्या मुद्यावर आपल्या सोबत उभे राहत होते त्यांना आज आपण साथ देत नाही याचा त्रास आपल्याला भविष्यात होणार आहे," असं राज ठाकरे म्हणाले.

'भाषा संपली म्हणून जगातले अनेक देश संपले'

गुढी पाडव्याच्या निमित्ताने केलेल्या या भाषणात राज ठाकरे यांनी मराठी भाषेबाबत देखील चिंता व्यक्त केली.

ते म्हणाले, "जगात भाषा संपली म्हणून अनेक देश संपले आहेत. तमिळ, आंध्र, केरळ पाहा. प्रत्येक राज्य आपली भाषा टिकवून आहे. आमच्याकडचे आमदार खासदार कंत्राटदार एवढच सुरूय फक्त. महाराष्ट्र विकायला काढलाय."

MNS Adhikrut/facebook

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही राज ठाकरे यांनी भाष्य केलं.

ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं आहे. सगळी महाराष्ट्रात ड्रग्ज विकले जातायत. तरुण तरुणी ड्रग्जच्या सवयी लागत आहेत. लहान मुलं पळवल्या जात आहे. NCRB (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी महाराष्ट्रात 4500 ते 5000 मुलं बेपत्ता होतात. हे उत्तर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलंय. यात मुलींचे प्रमाण अधिक दिसते. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार मी हे सांगतो आहे. ही कोणती शहरं म्हणायची. राज्य म्हणायचं. भाषेची हमी नाही. शहराची हमी नाही आणि म्हणायचं आम्ही शिवरायांच्या राज्यात राहतो."

विविध क्षेत्रातलं महाराष्ट्राचं योगदान

राज ठाकरे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हा शब्द दिला. छत्रपती संभाजी महाराजांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर राज्य टिकवण्यासाठी शत्रूंशी समर्थपणे लढले. बाळाजी विश्वनाथ पेशवे मराठा साम्राज्याचे पंतप्रधान होते. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र मोठा केला त्यांच्याकडे जातीच्या चष्म्यातून बघू नका. त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. हे मतं मिळावीत म्हणून तुम्हाला भिडवत आहेत. पहिले बाजीराव पेशवे यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला. अहिल्याबाई होळकर आणि शिंद्यांनी संपूर्ण हिंद प्रांतावर वचक ठेवला. नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड, तात्या टोपे, झाशीची राणी यांनी महाराष्ट्राला आकार दिला."

"आता अठराव्या शतकातील मराठी माणसांची यादी ज्यांनी मुंबईला आकार दिला यामध्ये जगन्नाथ शंकर शेठ, भाऊंचा धक्का बांधणारे भाऊ लक्ष्मण अजिंक्य, सीताराम खंडेराव वैद्य ज्यांनी टाटांचं ताजमहाल हॉटेल बांधलं त्याचे ते आर्किटेक्ट होते. सामाजिक सुधारणा करणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीदेवी फुले, महादेव रानडे, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपालकृष्ण गोखले, शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील, संत गाडगेबाबा, महर्षी धोंडो केशव कर्वे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, भारतरत्न पांडुरंग काणे, भारतरत्न विनोबा भावे, प्रबोधनकार ठाकरे धर्मातील चुकीच्या परंपरांवरती टीका करणारा माणूस अशी कितीतरी नावे घेता येतील."

'प्रबोधनकार ब्राह्मण विरोधी नव्हते'

राज ठाकरे पुढे म्हणाले, "माझे आजोबा कधी ब्राह्मण विरोधी नव्हते. त्यांची पुस्तके आजही आणून वाचा तुम्ही. ते भटभिक्षुकीच्या विरोधात होते. धर्माच्या नावाने जी पिळवणूक व्हायची त्याच्या विरोधात होते ते. समाजाच्या विरोधात नव्हते."

महाराष्ट्राच्या योगदानाविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले, "भारतीय काँग्रेसची स्थापना महाराष्ट्रात झाली. आरएसएसच्या सहा सरसंघचालकांमध्ये चार मराठी झाले आजपर्यंत आणि निर्माण करणारा देखील मराठीच. श्रीपाद अमृत डांगे ज्यांनी कम्युनिस्ट चळवळ मोठी केली तेही महाराष्ट्रातूनच होते.

"शेतकरी कामगार पक्षाची स्थापना 1946 साली शंकरराव मोरे आणि केशवराव जेधे आणि नाना पाटील यांनी केली. कांशिराम यांनी बामसेफची स्थापना देखील पुण्यातल्या खडकी येथेच केली.

"ज्या इतिहासकारांकडे जगभरातले लोक आदराने बघतात असे वि. का. राजवाडेंपासून, पुरंदरेंपासून, गजाननराव मेहेंदळे असे इतिहासकार महाराष्ट्रात झाले."

राज ठाकरे पुढे म्हणाले, "विज्ञानात डॉ. वसंत गोवारीकर, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, मिचेल भाटकर अशी नावं. शिवकर बापूजी तळपदे यांनी राईट्स बंधूंनी विमान उडवण्याच्या आठ वर्षं 1895 मध्ये आधी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर मरोत्सका नावाचं मानवविरहित विमान उडवलं होतं.

पत्रकारितेमध्ये बाळशास्त्री जांभेकर, नारायण दीनानाथ बेलकर जे टाइम्स ऑफ इंडियाचे संस्थापक मालक होते. तुम्हालाही प्रश्न पडला असेल हे तुम्हाला कसं माहिती नाही. ते मुंबईचे पहिले महापालिका आयुक्त देखील होते," ही माहिती राज ठाकरे यांनी सांगितली."

यासोबतच चित्रपट क्षेत्रातील मराठी मान्यवरांचा उल्लेख देखील राज ठाकरे यांनी केला. हिंदी चित्रपटांमधील 6300 गाणी लिहिणाऱ्या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यामधला लक्ष्मीकांत हे कुडाळचे होते अशी आठवण देखील त्यांनी करून दिली.

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राला मिळालेल्या आठ भारतरत्न पुरस्कारांपैकी चार भारतरत्न हे दापोलीला मिळाले आहेत. बाबा काणे, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, बाबासाहेबांचा जन्म इंदौरचा पण त्यांचं बालपण कोकणात गेलं.

राज ठाकरेंनी भाषणात मराठी उद्योजकांची देखील यादी वाचून दाखवली. साहित्य, नाटक, कविता, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मराठी मान्यवरांची यादी देखील राज ठाकरे यांनी सभेत सांगितली.

राज ठाकरे यांच्याकडून 'महाराष्ट्र नेक्स्ट - महाराष्ट्र पुढचा' वेबसाईटचं उद्घाटन

राज ठाकरे भाषणात म्हणाले, "एवढं भरभरून आपल्याला महाराष्ट्राने दिलेलं आहे आपल्याला याची किंमत आहे का? आपण काही वेगळा विचार करतो आहोत का? कुठे चाललाय महाराष्ट्र? देश महाराष्ट्राकडे बघायचा की महाराष्ट्र आम्हाला काय देतोय? क्रिकेट संघात सुद्धा मुंबईचे मराठी आता कुणी उरलेले नाहीत. आम्ही नेमके कुठे कमी पडतोय? आम्ही विचारच करत नाही. आमच्यावर सरकार येतायत आणि नवनवीन कायदे लादतायत. आम्ही करमणुकीत गुंतलो आहोत. तुम्हा आम्हा सगळ्यांना मिळून भविष्यातला महाराष्ट्र घडवायचा आहे. सरकारवर अवलंबून राहून हे होणार नाही. म्हणून मी एक नवीन योजना घेऊन आलो आहे."

"2006 साली मी याच व्यासपीठावर उभं राहून म्हटलं होतं की मी महाराष्ट्राच्या विकास आराखडा आणेन. त्यावेळी मी जे म्हणालो होतो त्यानुसार 2014ला मी आराखडा आणला. या आठ वर्षांमध्ये सगळे मला कुत्सितपणे विचारायचे की तुमच्या आराखड्याचं काय झालं? जेव्हा मी आणला हा आराखडा तेव्हा 2014 ते 2026 पर्यंत या क्षणपर्यंत मला कुणीही विचारलं नाही की त्यात आहे तरी काय? कारण कुणीही ती वाचलीच नव्हती," अशी तक्रार राज ठाकरे यांनी केली.

MNS Adhikrut/facebook 'महाराष्ट्र नेक्स्ट - महाराष्ट्र पुढचा'

राज ठाकरे म्हणाले, "मागच्या बारा वर्षांमध्ये महाराष्ट्र बदलला आहे. त्यामुळे मी विचार केला आहे की हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक प्लॅटफॉर्म उभा करायला लागेल. महाराष्ट्रात नेमकं काय घडलं पाहिजे हे ठरवण्यासाठी, लोकांच्या याबाबतच्या योजना ऐकण्यासाठी मी एक नवीन वेबसाईट महाराष्ट्राला अर्पण करतो आहे. यावर येऊन तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. मोबाईलच्या जोखडातून बाहेर या, करमणुकीच्या गटारगंगेतून बाहेर येऊन मी एक पहिलं पाऊल टाकतो आहे. 'महाराष्ट्र नेक्स्ट - महाराष्ट्र पुढचा' मी तुमच्यासमोर उभा करतो आहे," असं म्हणत राज ठाकरे यांनी या वेबसाईटचं उदघाटन केलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

  • जेव्हा थेट बाळासाहेबांनाच आव्हान देत 'प्रति शिवसेना' स्थापन केली गेली होती
  • शिवसेनेबद्दल या 9 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
  • बाळासाहेब ठाकरेंचा तो निर्णय ज्यामुळे राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.