टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 8 मार्च रोजी न्यूझीलंडला पराभूत करुन आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाचा हा सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील पहिला आणि एकूण तिसरा टी 20i वर्ल्ड कप ठरला. त्यानंतर 28 मार्चपासून आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप निमित्ताने आपल्या देशासाठी एकत्र खेळणारे खेळाडू आता आयपीएलमध्ये विविध संघातील खेळाडूंसोबत खेळताना दिसणार आहेत. टीम इंडियाचा आयपीएलनंतर इंग्लंड दौरा नियोजित आहे. अशात आता टीम इंडियाचा नवा दौरा निश्चित झाला आहे.
टीम इंडिया आयपीएलची सांगता झाल्यानंतर जून महिन्यात आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. आयर्लंड क्रिकेटचे अधिकारी ग्राहम वेस्ट यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पॉल स्टर्लिंग याने आयर्लंडच्या टी 20i संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारताच्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे.
टीम इंडियाचा आयर्लंड दौराटीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. नियोजित मालिकेनुसार टीम इंडिया या दौऱ्यात 5 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.
टीम इंडियाचा इंग्लंड दौराटीम इंडियाचा इंग्लंड दौरा भरगच्च असा आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. तर याआधी टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तसेच भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांत्यात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. अफगाणिस्तानच्या या भारत दौऱ्याची सांगता 20 जून होणार आहे.
टीम इंडिया-आयर्लंडदरम्यान टीम इंडिया गेल्या 7 वर्षांत 3 वेळा आयर्लंड दौऱ्यावर गेली आहे. टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड यांच्यात पहिल्यांदाच 2008 साली आंतरराष्ट्रीय मालिका खेळवण्यात आली. त्यानंतर टीम इंडिया 2022 आणि 2023 साली आयर्लंड विरुद्ध खेळली होती. आयर्लंड टीम इंडियाच्या तुलनेत लिंबुटिंबु आहे. मात्र आयर्लंडने अनेक संघांना उलटेफरचा शिकार केला आहे. त्यामुळे सूर्यासेना या संघाला गृहीत धरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आयर्लंड या मालिकेत कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.