ब्रश करताना रक्त, सूज, दुर्गंधी ही 'किरकोळ' लक्षणं की गंभीर आजारांची सुरुवात?
BBC Marathi March 20, 2026 04:45 PM
Getty Images

दररोज ब्रश करताना थोडंसं रक्त येतंय? हिरड्यांना सूज, तोंडाला दुर्गंधी किंवा वारंवार जळजळ होतेय? दिसायला किरकोळ वाटणारी ही तोंडाच्या आरोग्याशी संबंधित लक्षणं प्रत्यक्षात गंभीर आजारांची सुरुवात असू शकतात.

अनेकदा ओरल हेल्थकडे आपण 'नंतर बघू' म्हणत दुर्लक्ष करतो, पण त्याच दुर्लक्षामुळे पेरिओडॉन्टल डिसीज, जबड्याच्या हाडांची झीज, सततचे इन्फेक्शन, किंवा अगदी ओरल कॅन्सरपर्यंतही समस्या पोहोचू शकते.

तज्ज्ञांच्या मते, तोंडातले अगदी साधे बदलही शरीरातील मोठ्या आजारांचे संकेत देतात आणि त्यांना वेळेत ओळखलं तर गंभीर गुंतागुंत टाळणं शक्य होतं.

या लेखात आपण या 'सूक्ष्म' पण धोक्याचे इशारे देणाऱ्या लक्षणांबद्दल आणि नियमित ओरल स्क्रिनिंग का जीव वाचवू शकतं याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Getty Images

तोंडाच्या आरोग्याकडे आपण सहसा 'दुखलं तरच डॉक्टरकडे जाणं' या सरळसरळ सूत्रानेच पाहतो. पण तोंडाच्या आरोग्याबाबतीत अनेक समस्या सुरुवातीला साध्या वाटणाऱ्या असल्या तरी त्या वेगानं वाढतात.

अगदी साधी सूज, अधूनमधून होणारी जळजळ, ब्रश करताना थोडंसं रक्त येणं, तोंडाची दुर्गंधी ही लक्षणं अनेकांना किरकोळ वाटतात.

पण तज्ज्ञांच्या मते, याच संकेतांतून गंभीर समस्या उदाहरणार्थ हिरड्यांचे आजार, संसर्ग किंवा अगदी ओरल कॅन्सरची म्हणजे मुख कर्करोगाची सुरुवात आपण वेळेआधीच ओळखू शकतो.

पण प्रारंभिक लक्षणे 'सामान्य' समजून अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे उपचाराची योग्य वेळ निघून जाते आणि नंतर दात हलणे, हाडांची झीज, सतत वेदना किंवा मोठ्या शस्त्रक्रियेची वेळ येते.

नियमित तपासणी आणि अगदी सूक्ष्म बदलांबाबत जागरुकता ठेवली, तर अशी गुंतागुंतीची स्थिती टाळता येऊ शकते, असं डॉक्टर नेहमी सांगत असतात. मात्र त्याकडे आजही दुर्लक्ष होतं.

या माहितीमधून आपण अशा सुप्त संकेतांबद्दल माहिती घेणार आहोत. हे सुप्त संकेत ओळखले तर अनेक आजार थांबवता येतील किंवा आजार गंभीर होण्याआधीच त्यांना आळा घालता येईल.

त्यामुळे तोंडाच्या आरोग्याला बिघडवणारे हे संकेत कोणते, ते ओळखणे का गरजेचे आहेत आणि त्यांच्याबाबतीत वेळेवर निर्णय घेणं का गरजेचं आहे? याची माहिती आपण इथं घेऊ.

तोंडाचं आरोग्य म्हणजे नक्की काय?

तोंडाचं आरोग्य म्हणजे केवळ दातांची स्वच्छता नाही. यात संपूर्ण तोंड, हिरड्या, दात, लाळ, जीभ, ओठ, आतील त्वचा, चावण्याची पद्धत, जबड्यांचे आरोग्य आणि तोंडातून सुरू होणाऱ्या पचनप्रक्रियेपर्यंतचा समावेश होतो.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ओरल हेल्थ म्हणजे खाणं, बोलणं, स्मित करणं आणि सामाजिक आयुष्यात आत्मविश्वासाने सहभागी होण्यासाठी तोंडाचे सर्व अवयव निरोगी असणे.

आपल्या शरीरात तोंड हे सर्वात जास्त 'एक्स्पोज्ड' वातावरणात असतं.

अन्न, पेयं, सूक्ष्मजंतू आणि बाहेरून येणाऱ्या प्रदूषणाशी ते सतत संपर्कात असतं. त्यामुळे येथील लहान बदलही मोठ्या आरोग्यस्थितीचे संकेत देऊ शकतात.

उदाहरणार्थ, वरवर साधी दिसणारी जळजळ ही व्हिटॅमिन-डी किंवा बी-कॉम्प्लेक्सच्या कमतरतेची खूण असू शकते.

वारंवार संसर्ग होणं हे मधुमेहाशी थेट जोडलेले असू शकतं. तर सततचा कोरडेपणा (ड्राय माउथ) हा काही औषधांच्या साईड-इफेक्टमुळे किंवा हार्मोनल बदलांमुळे होऊ शकते.

तोंडाच्या आरोग्याचा शरीरातील इतर अवयवांशी असलेला संबंधही अतिशय महत्त्वाचा आहे. हिरड्यांच्या आजारांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, तर सततचे इन्फेक्शन रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करू शकते. त्यामुळे तोंडातील आरोग्य हे संपूर्ण शरीराच्या आरोग्याचे प्रतिबिंब मानले जाते.

तोंडाच्या आरोग्याबद्दल आपले शरीर कोणते संकेत आधीपासून देत असतं आणि ते ओळखणं का महत्त्वाचे आहेत? याबद्दल आम्ही तज्ज्ञांना विचारलं.

Getty Images

डॉ. मंदार देशपांडे हे कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालय मुंबई येथे, हेड अँड नेक ऑन्कोलॉजी विभागात प्रमुखपदावर कार्यरत आहेत.

बीबीसी मराठीच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "ओरल हेल्थच्या बहुतेक गंभीर समस्या सुरुवातीला एकदम शांत वाटणाऱ्या असतात. दातांच्या काळवंडलेल्या कडा, ब्रश करताना थोडंसं ब्लीडिंग, किंवा हलकी संवेदनशीलता ही लक्षणं रुग्ण 'नॉर्मल' समजून टाळतात. पण प्रत्यक्षात हीच बदलांची पहिली चिन्हं असतात.

माझ्या अनुभवानुसार, दाताची किड किंवा हिरड्यांची सौम्य जळजळ योग्य वेळी ओळखली गेली, तर पुढे होणारी हाडांची झीज, दात हलणे, किंवा मोठ्या शस्त्रक्रियेपर्यंत पोहोचणारी परिस्थिती टाळता येते.

ओरल कॅन्सरसुद्धा सुरुवातीला अगदी साधा दिसणारा पांढरा किंवा लाल ठिपका म्हणून सुरू होतो. पण समस्या ही आहे की 'दुखत नाही' तोपर्यंत बहुतेकजण दाताच्या डॉक्टरकडे जातच नाहीत.

माझ्या आजवरच्या अनुभवानुसार लवकर निदान झाल्यास उपचार सोपे असतात आणि परिणामही अधिक चांगले मिळतात. म्हणूनच तोंडातील कुठलाही बदल दोन आठवड्यांपेक्षा जास्त टिकला तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं."

तोंडाच्या आरोग्याबाबतीत कोणते संकेत पुढच्या काळात गंभीर होऊ शकतात याबाबत आम्ही अपोलो हॉस्पिटल पुणे येथे कार्यरत असलेल्या डॉ. विदिता पोवळे यांना विचारलं.

Getty Images

डॉ. विदिता अपोलो हॉस्पिटल पुणे येथे सिनिअर कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि हेड‑अँड‑नेक कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत.

त्या सांगतात, "हिरड्यांच्या आजारांची सुरुवात अत्यंत सूक्ष्म स्वरूपात होते. ब्रश करताना रक्त येणं, सूज, हलकी जळजळ किंवा दातांभोवती प्लाक‑टार्टर साचणं या लक्षणांकडे अनेकदा रुग्ण दुर्लक्ष करतात.

काही वेळा दात थोडे हलायला लागतात, ज्याचा अर्थ त्यांना आधार देणाऱ्या घटकांवर परिणाम होऊ लागला आहे. तसंच, तोंडातील छोटे अल्सर्स आणि कॅन्सरची सुरुवात यातला फरक ओळखणंही महत्त्वाचं आहे.

साधे 'ॲफ्थस' अल्सर्स वेदनादायी असतात आणि एक-दोन आठवड्यांत भरतात; पण कॅन्सरशी संबंधित जखमा बहुतेक वेळा वेदनारहित असतात, दोन‑तीन आठवड्यांहून जास्त टिकतात आणि त्यांचे कडे अनियमित किंवा खडबडीत असू शकतात."

"पांढरे‑लाल ठिपके, ल्यूकोप्लाकिया किंवा एरिथ्रोप्लाकिया यांसारखे बदल दिसताच तज्ज्ञांची तपासणी अत्यावश्यक ठरते. प्रारंभीची ही लक्षणं वेळेत ओळखली, तर रोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो."

लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर...

दात, हिरड्या, तोंडातले आतले अवयव याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्यांच्यातील बदलांना गांभीर्यानं घेत नाही हे आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल.

पण याच सवयीमुळे अनेक नवे त्रास सुरू होतात. तोंडाच्या आरोग्याच्या तक्रारी न ओळखणं, ओळखून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, किंवा लक्षणं ओळखताच न येणं यामुळे तोंडाचे आजार कर्करोगापर्यंतही जाऊ शकतात.

Getty Images

पुण्याच्या अपोलो हॉस्पिटलमधील डॉ. विदिता पोवळे तेच सांगतात.

त्या म्हणतात, "ओरल हेल्थच्या सुरुवातीच्या बहुतांश तक्रारी वेदनारहित असतात, आणि हीच मोठी समस्या आहे. लक्षणे सौम्य वाटत असल्यामुळे अनेक रुग्ण महिनोन्महिने डॉक्टरांकडे येत नाहीत कधी भीती, कधी खर्चाची चिंता, तर कधी 'हे काही गंभीर नाही' असे गैरसमज असतात.

पण प्रत्यक्षात या कालावधीत दातांच्या मुळांवरील इन्फ्लमेशन वाढत जाते, प्लाक‑टार्टर खोलवर साचतो, आणि हाडांची झीज सुरू होते. नियमित ओरल स्क्रीनिंग केले तर दातांच्या पोकळीपासून हिरड्यांच्या सूक्ष्म बदलांपर्यंत, अगदी बिनलक्षणीय अवस्थेतील हाडांची झीज किंवा कॅन्सरपूर्व स्थितीही वेळेवर शोधता येते.

माझ्या अनुभवात, वर्षातून एक तपासणी केली तरी अनेक गंभीर गुंतागुंतींचा धोका निम्म्याहून कमी होऊ शकतो."

त्या पुढे सांगतात की,"उशिरा निदान झाल्यामुळे दिसणाऱ्या गुंतागुंती खूप गंभीर असतात. दात हलू लागणं, तीव्र इन्फेक्शन, जबड्याची हाडं झिजणं किंवा स्टेज‑थ्री‑फोर ओरल कॅन्सर इथपर्यंत ते जातं. या पैकी मोठा भाग वेळेत तपासणी केली असती तर सहज टाळता येऊ शकतो."

"तोंडातील सूक्ष्म बदल हे शरीराच्या इतर रोगांचेही संकेत असू शकतात. यात व्हिटॅमिन कमतरता, ॲनिमिया, डायबेटिस किंवा ऑटोइम्यून डिसिजेस यांच्यामुळे अल्सर्स, बर्निंग सेन्सेशन किंवा वारंवार होणारे इन्फेक्शन वाढतात.

अशा वेळी योग्य ओरल हायजिन म्हणजे दिवसातून दोनदा ब्रशिंग, फ्लॉसिंग, टंग‑क्लिनिंग, साखर कमी खाणं, तंबाखू टाळणे ही साधी पावलंही रोगांचा वेग मोठ्या प्रमाणात थांबवू शकतात.

तोंडातील किरकोळ वाटणारे बदल दुर्लक्ष करू नका. वेळेवर ओळखले तर आपण केवळ दात वाचवू शकत नाही, अनेक वेळा जीवघेणा आजारही रोखू शकतो, असं मला स्पष्ट सांगायचं आहे."

Getty Images

तोंडाच्या आरोग्याच्या समस्यांवर उपचार घेण्यास उशीर झाला किंवा उशीरा निदान झाल्यावर किती त्रास होऊ शकतो? असा प्रश्न डॉ. मंदार देशपांडे यांना विचारला. त्यावर त्यांनी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये असं सांगितलं.

ते म्हणाले "भारतात उशिरा निदान ही सर्वात मोठी आणि नेहमीची समस्या आहे. आमच्याकडे येणाऱ्या 60% पेक्षा जास्त रुग्णांमध्ये त्यांचा आजार बराच पुढच्या टप्प्यावर गेलेला असतो. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना सुरुवातीची लक्षणं त्यांना किरकोळ वाटलेली असतात.

विशेषतः वृद्ध रुग्णांमध्ये जुनी, सैल बसलेली डेन्चर अनेक वर्षे वापरण्याची प्रवृत्ती दिसते. ही दीर्घकाळ चालणारी म्युकोजल ट्रॉमा नुसती जखम निर्माण करत नाही, तर कधीकधी ती प्रीकॅन्सरस बदलांचं कारणही ठरू शकते.

त्यामुळे तोंडातील न बरी होणारी अल्सर्स, पांढऱ्या किंवा लाल पॅचेस, किंवा वारंवार होणारी जळजळ ही कोणतीही लक्षणं हलक्यात घेता येत नाहीत. "

ते पुढं सांगतात, "माझा ठाम विश्वास आहे की, नियमित ओरल स्क्रीनिंगची सवय आणि थोडीशी जागरूकता असती, तर आपण कॅन्सरच्या अनेक जटिल केसेस टाळू शकलो असतो.

ओरल हेल्थ म्हणजे केवळ दात नाहीत; ते संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेलं आरशासारखं संकेत देणारं आहे, आणि या संकेतांकडे वेळेवर बघणं जीव वाचवू शकतं, असं मला वाटतं"

ओरल स्क्रिनिंग का महत्त्वाचे?

डॉ. राधिका रामस्वामी या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे कन्सल्टंट ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन, म्हणून कार्यरत आहेत. तोंड कायम निरोगी राहावं यासाठी ओरल स्क्रिनिंग महत्त्वाचं आहे, असं त्या सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "दाताच्या अनेक समस्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणं दाखवत नाहीत. दातांमध्ये लागणाऱ्या सुरुवातीच्या किडीपासून ते हिरड्यांना सौम्य सूज–रक्तस्रावापर्यंत अनेक आजार अतिशय शांतपणे वाढतात.

नियमित तपासणी झाल्यास हे आजार वेळेवर लक्षात येतात आणि त्यावर साध्या व सोप्या उपचारांनी परिणामकारक नियंत्रण मिळवता येते.

अशा तपासणीमुळे कोणत्या दातांवर परिणाम झाला आहे हे ओळखण्यास मदत होते. कधीकधी त्याची लक्षणं दिसत नाहीत, वेदनाही होत नाहीत पण त्यामुळे संसर्ग, वेदना किंवा जवळच्या दातावर परिणाम होणं अशा गोष्टी होत असतात. त्यावर उपचार करणं तपासणीमुळ शक्य होतं."

याचप्रमाणे एक महत्त्वाची गोष्ट तपासणीतून समजते. ती म्हणजे मिसिंग टिथ. एखादा दात पडलेला असणं किंवा ती जागा रिकामी असणं हे यातून समजतं.

एखाद्या जागी दात नसेल तर तुमची चर्वणावर, बोलण्यावर परिणाम होतो. तसेच त्याचा शेजारच्या दातांवर परिणाम होतो.

"जर तपासणीतून हे लक्षात आलं तर योग्यवेळेस तिथं पर्यायी व्यवस्था करुन स्थिती सुधारता येते तसेच तोंडातील दातांचा योग्य समतोल साधता येतो. त्यामुळे साधारणतः दर सहा महिन्यांनी तोंडाची तपासणी करुन घेणं आवश्यक आहे."

Getty Images

दातांच्या आरोग्याकडं अतिशय गांभीर्यानं पाहिलं पाहिजे असं डॉ. राहुल अगरवाल सांगतात. ते हैदराबादच्या केअर हॉस्पिटल येथे जनरल मेडिसिन विभागात सीनियर कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत.

ते सांगतात, "दररोज आमच्या समोर हिरड्यांना भरपूर सूज आलेले, दात हलत असलेले किंवा जबड्याच्या हाडाची झीज झालेले रुग्ण येतात. त्यांचे हे आजार प्रगत अवस्थेत गेलेले असतात. त्यांचा बराचसा त्रास साध्या आणि वेळेवर केलेल्या तपासणीने टाळता आला असता असं दिसतं."

ते सांगतात, "सुरुवातीच्या टप्प्यात रक्त येणं, झिणझिण्या येणं, दुर्गंधी येणं अशा अनेक समस्यांकडे लोक दुर्लक्ष करतात. याच काळामध्ये त्यांची समस्या आत शांतपणे वाढत असते.

सिस्टेमिक आजारांचा तोंडावर होणारा परिणामही तितकाच गंभीर असतो. अनियंत्रित डायबेटिसमुळे हिरड्यांचे संसर्ग वाढू शकतात, जखमा भरून येण्याचा वेग कमी होतो, आणि पेरिओडोंटल डिसीजचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

व्हिटॅमिन B आणि C ची कमतरता असेल तर जिभेवर-तोंडात अल्सर्स होतात, लालसरपणा येतो आणि रक्तस्रावही होतो."

ते पुढं म्हणतात, "पान, सुपारी, जर्दा, पान मसाला, सिगारेट, कार्बनयुक्त पेयं, अशुद्ध पाणी तसेच योग्य पोषक घटकांचा अभाव असेल तर त्यांचा तोंडाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

GERD आणि ब्रुक्सिझमसारख्या आजारांचाही दातांवर परिणाम होत असतो. त्यामुळे दाताची तपासणी आवश्यक आहे."

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

  • नाक चोंदून 'डोकेदुखी' वाढवणारा सायनसचा त्रास नेमका कशामुळे वाढतो?
  • लहान बाळांना दिल्या जाणाऱ्या 'या' 11 लशींची तुम्हाला माहिती आहे का?
  • नाक बंद, डोळ्यात पाणी; आधी सर्दी वाटली पण 12 वर्षांच्या मुलीच्या नाकात बुरशी तयार झाली
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.