आयोगाच्या पदाला लागलेली किड गेली, रुपाली ठोंबरे यांची चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर जळजळीत टीका
Tv9 Marathi March 21, 2026 02:45 AM

नाशिक भोंदू बाबा कॅ. अशोक खरात प्रकरणात अखेर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आरोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणात आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर यांचा राजीनामा दिल्याने एकप्रकारे महिला आयोगाच्या पदाला लागलेली किड गेली अशा भाषेत टीका केली आहे.

या संदर्भात रुपाली ठोंबरे – पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘ज्यांना पदावर बसवलेले आहे ते जर त्यांचे कर्तव्य करणार नसतील, ते जर लोकांची मदत करणार नसतील, न्याय देणार नसतील तर त्यांनी राजीनामा देणे क्रमप्राप्त आहे. म्हणजे या गुन्हेगारी कटामध्ये सामील होऊन गुन्हेगारांना अभय देत होत्या. संविधानिक पदावर बसून त्या हे काम करत होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या समस्त महिलांच्या वतीने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुनेत्रा वहिणींना केली होती. महायुतीचे मुख्यमंत्री यांनी गांभीर्याने दखल घेत राजीनामा घेतलेला आहे असेही राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे.

सहआरोपी करणे गरजेचे

रुपाली चाकणकर यांनी संपदा मुंडे प्रकरणातही महिलेची बदनामी होईल असे वक्तव्य केले होते. त्यावेळीही मी अजितदादा पवार साहेबांकडे त्यांची तक्रार केली होती. अजितदादांनी त्यांना समज दिली होती. आता ही या प्रकरणात त्यांना या नाशिक भोंदू बाबा कॅ. अशोक खरात प्रकरणात सहआरोपी करणे गरजेचे आहे असेही रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे.

भोंदूगिरी करणारे सर्वच जेरबंद होतील – बावनकुळे

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात महसूल मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणात सखोल तपास करुन कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर सरकारच्या वतीने कारवाई करण्यात येईल आणि सर्व दोषींना जेरबंद करण्यात येईल असेही आश्वासनही त्यांनी दिले आहे.

माज उतरलेला नाही – विजय वडेट्टीवार

राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा तर दिला, पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही अशा शब्दात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी याप्रकरणात प्रतिक्रीया दिली आहे. रुपाली चाकणकर यांनी आपण स्वेच्छेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे! म्हणजे खरात प्रकरणात त्यांनी महिलांवर, पत्रकारांवर टाकलेला दबाव ,या प्रकरणी पोलिस तक्रार होऊ नये म्हणून केलेले उद्योग याचा कुठलाही खेद, चूक झाली असे त्यांना वाटत नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

राजीनामा देताना पण उपकार असल्यागत चाकणकर यांचे वागणे निषेधार्ह आहे, रूपाली चाकणकर हा छोटा मासा आहे यात अजून किती मंत्री होते ? कोणी या बलात्कारी बाबाला राजाश्रय दिला, वाचवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि हे प्रकरण दाबण्यासाठी कोणत्या नेत्यांनी, मंत्र्यांनी फोन केले याचीही चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

चाकणकरांचा आणि नैतिकतेचा सुतराम संबंध नाही – सुषमा अंधारे

चाकणकरांना जर स्वेच्छेने राजीनामा द्यायचा असता तर तो त्यांनी एक वर्षापूर्वी,  जेव्हा हे प्रकरण त्यांच्या कानावर आले,  तेव्हाच किंबहुना किमान तीन दिवस आधी तरी राजीनामा दिला असता, चाकणकर शेवटच्या क्षणापर्यंत पद वाचण्यासाठी धडपडत राहिल्या अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोस्ट करत चाकणकर राजीनामा प्रकरणावर टीका केली आहे.

चाकणकरांना जरा जरी पश्चातापबुद्धी झाली असती तर त्या खरातची अटक झाल्याबरोबर राजीनामा देऊन मोकळ्या झाल्या. असत्या मुळात हा राजीनामा नाही ही हकालपट्टी आहे. चाकणकरांनी शब्दाची मलमपट्टी करून उगाच केविलवाणी धडपड करू नये. नुसता राजीनामा पुरेसा नाही. चाकणकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करून आणि त्यांची अटक होणं जास्त गरजेचे आहे असेही अंधारे यांनी म्हटले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.