Gas Cylinder Shortage: कामगार गावाकडे, उद्योजक मात्र 'गॅस'वर
esakal March 21, 2026 09:45 AM

अविनाश ढगे

पिंपरी : ‘‘स्वयंपाकासाठी गॅस मिळत नाही, हॉटेल बंद आहेत, जे सुरू आहेत तेथे थाळीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे जेवणाची भ्रांत आहे. १५ रुपयांचा वडापाव २५-३० रुपयांना मिळतो आहे. काही दिवस वडापाव खाऊन काढले; पण आता गावाकडे जात आहे,’’ ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, कामगार सूरज गुप्ता यांनी. त्यांचे मनोगत प्राधिनिधिक असले तरी, सध्या अनेक मजुरांनी गावाकडची वाट धरली आहे. त्यामुळे गॅसटंचाई आणि कच्चा माल आयातीतील अडथळ्यांमुळे अडचणीत सापडलेल्या उद्योजकांपुढे मनुष्यबळाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ‘एमआयडीसी’ भागातील सुमारे ३० टक्के कामगार काम सोडून निघून गेले आहेत.

शहरालगत भोसरी, चाकण आणि तळेगाव येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्र विकसित झाले आहे. या परिसरामध्ये पंधरा हजारांहून अधिक प्लॉटधारक असून बहुउद्देशीय कंपन्यांना सुटे भाग पुरविणारे दहा हजारांहून अधिक लघुउद्योग आहेत. तसेच महिंद्रा, स्कोडा, व्हेल्स वॅगन यासारख्या विविध वाहन बनविणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. रोजगारानिमित्त देशभरातील नागरिक शहर परिसरात स्थायिक झाले आहेत. बहुतांश परप्रांतीय कामगार मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. अनेकांकडे रहिवासी प्रमाणपत्र नसल्यामुळे गॅस सिलिंडर कनेक्शन घेणे त्यांना शक्य होत नाही. ते आतापर्यंत पाच-सात किलोचा सिलिंडर अवैधरित्या भरून घेत होते. मात्र, इराणमधील युद्धामुळे गॅसपुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. सिलिंडरसाठी एजन्सीबाहेर रांगा लागत आहेत. नोंदणी असेल, तरच सिलिंडर मिळत आहे. मात्र, नोंदणी नसलेल्यांना सिलिंडर मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. अवैधरित्या गॅस सिलिंडर भरुन देणाऱ्यांनी किंमती वाढविल्या आहेत. कामगारांना एक किलो गॅससाठी १०० रुपये मोजावे लागत होते, तेथे आता ५०० रुपये मोजावे लागत आहेत. काही ठिकाणी तो ही मिळत नाही. परिणामी, कामगारांना गॅससाठी भटकावे लागत आहे.

Sangli Gas Cylinder : ‘आमचा गॅस सिलिंडर कुणी पळवला?’ ग्राहकांचा संताप एजन्सींचा काळा बाजार, सर्वत्र लागल्या रांगा

दुसऱ्या बाजूला व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, अन्नपदार्थ विक्रेते अडचणीत सापडले आहेत. अनेकांचे स्टॉल बंद झाले आहेत. जे हॉटेल सुरू आहेत, त्यांनी भाववाढ केली आहे. त्यामुळे कामगारांना हॉटेलमध्ये जेवणेही परवडत नसल्याने त्यांनी गावाकडची वाट धरली आहे. अनेक कामगार शहर सोडून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि इतर राज्यात माघारी निघाले आहेत. त्यामुळे कंपन्यांमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

मी गेल्या दीड वर्षांपासून चाकण एमआयडीसीत काम करत होतो. आमच्याकडे छोटा गॅस होता. काही दिवसांपूर्वी तो संपला. तो भरण्यासाठी गेलो, तर गॅस नाही असे उत्तर मिळाले. काही दिवस हॉटेलमध्ये खाल्ले. पण, दररोज तसे जेवण परवडणारे नाही. त्यामुळे परिस्थिती सुरळीत होईपर्यंत गावी जात आहे.

- अमित चौधरी, कामगार

एमआयडीसीतील कंपन्यामध्ये काम करणारे सुमारे ३० टक्के कामगार काम सोडून गेले आहेत. सध्या उद्योजक विविध अडचणींचा सामना करत आहेत. शासनाने काहीतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत.

- सुप्रिया बर्वे,

संचालक, बेलाराइज उद्योगसमूह, चाकण

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.