साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार
सुरज सावंत March 21, 2026 11:43 AM

Satara Zilla Parishad: सातारा जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले आहे. या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ केवळ 28 सदस्यांपर्यंत मर्यादित असतानाही, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अचूक राजकीय रणनीती आखत अतिरिक्त पाठिंबा मिळवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे भाजपला एकूण 33 सदस्यांचा पाठिंबा मिळाला आणि सत्ता हस्तगत करण्यात यश आले. या पार्श्वभूमीवर प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, या निकालामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. या निकालाचे पडसाद आता थेट राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

या निवडणुकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, शेवटच्या क्षणी भाजपने राजकीय डावपेच रचत काही सदस्यांना आपल्या बाजूला वळवले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या ‘पळवापळवी’मुळे महायुतीतील समन्वयावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Satara Zilla Parishad: साताऱ्यातील राजकारण तापले 

विशेष म्हणजे, नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी असल्याने या निकालाला अधिक राजकीय रंग चढला आहे. एका बाजूला भाजपचा विजय, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी, अशा दुहेरी परिस्थितीत साताऱ्यातील राजकारण तापले आहे.

Satara Zilla Parishad: शंभूराज देसाई पोलिसांवर कायदेशीर कारवाईची मागणी करणार

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीदरम्यान पोलिसांच्या मदतीने राजकीय खेळी करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे हा मुद्दा आता केवळ स्थानिक पातळीवर न राहता राज्याच्या सत्ताकेंद्रात पोहोचण्याची चिन्हे आहेत.

Satara Zilla Parishad: बैठक चांगलीच गाजण्याची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री प्रशासनाच्या भूमिकेबाबत तसेच भाजपच्या काही मंत्र्यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करणार आहेत. त्यामुळे ही बैठक केवळ नियमित कामकाजापुरती मर्यादित न राहता राजकीय वादांनी गाजण्याची शक्यता आहे.

Satara Zilla Parishad: सातारा जिल्हा परिषद निवडणूकीत इनसाईड स्टोरी

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेत महायुती एकत्र लढेल, अशी चिन्ह असताना भाजपकडून चर्चेची जबाबदारी ही जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली होती. शिवसेनेकडून मंत्री शंभूराज देसाई तर राष्ट्रवादीकडून मकरंद आबा पाटील यांच्यावर होती. मात्र, जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई व मकरंद पाटील यांचे जिल्ह्यातील संबंध तितकेसे ठिक नाहीत. भाजपने चर्चेची जबाबदारी गोरे सोडून इतर कुठल्याही नेत्याकडे सोपवावी, ही शंभूराज आणि मकरंद पाटील यांची इच्छा होती. अशातच भाजपकडून यात कोणताही बदल न केल्याने शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी भूमिका घेत जिल्ह्यात भाजपला एकटे पाडले. मात्र, भाजपने शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीला अध्यक्षपदी उभे करत नवी चाल खेळली.

दुसरीकडे देसाई आणि पाटील यांनीही शशिकांत शिंदेंना सोबत घेत स्पष्ट बहुमत एकवटले. मात्र, मागच्या दाराने भाजपने काही उमेदवारांशी संपर्क सुरूच ठेवला होता. शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी आपले सर्व सदस्य एकत्र निवडणुकीला आणले खरे. मात्र पालकंमंत्र्यांना कळूही न देता पोलिसांनी गेम फिरवला. साध्यावेशात इतका बंदोबस्त होता की, कार्यकर्ता कोण आणि पोलिस कोण? हे ओळखणे कठीण झाले होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या एका मंत्र्याने जिल्हा परिषद निवडणूकीच्या दुसऱ्या माळ्यावर भाजपच्या एका बड्या मंत्र्याने शंभूराज देसाई यांच्यासोबत हातात हात घालून असलेल्या उमेदवाराचा हात खेचला. या झटापटीत शंभूराज देसाईंच्या हाताला जखम झाली. मात्र, शंभूराज देसाई यांना काही समजणार तोच पोलिस तिथे धावले. अशात तो उमेदवार गळाला लावण्यात यश आल्याने शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी ज्या भाजपमधून उभ्या होत्या त्यांचा विजय झाला. 

या पळवापळवीमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलंच गढूळ झाले आहे. महायुतीतील मंत्र्यांमध्येच या निवडणुकींवर टोकाचे वाद झाल्याने याचे पडसाद येणाऱ्या काळात साताऱ्यात पहायला मिळतील. सध्या साताऱ्यात भाजप विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी असा संघर्ष येणाऱ्या काळात पहायला मिळेल, यात शंका नाही. सध्या तरी सर्वांचे लक्ष राज्य कॅबिनेट बैठकीकडे लागले असून, या बैठकीत नेमके काय निर्णय होतात आणि कोणती भूमिका घेतली जाते? यावर पुढील राजकीय दिशा ठरणार आहे.

आणखी वाचा 

Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.