राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. भोंदू बाबा प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पण चाकणकर यांनी ज्योतिषी अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्याशी आपला काही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. तसेच ज्या गोष्टी घडल्याच नाही, त्या आपल्या नावावर खपवल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला असून याबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. चाकणकर यांच्या राजीनाम्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी स्वागत केलं आहे. मात्र, हे स्वागत करतानाच त्यांनी आता आपलं पुढचं टार्गेट शिंदे गटाचा बडा नेता आणि राज्याचा मंत्री असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भोंदू बाबा तसेच कथित ज्योतिषी अशोक खरात यांच्या दरबारात राष्ट्रवादी आणि शिंदे गटाचे अनेक मंत्री हजेरी लावत होते. या मंत्र्यांचा खरातशी चांगला दोस्ताना असल्याचं समोर आलं आहे. तो इतका की खरातच्या मुलाच्या लग्नालाही या नेत्यांनी हजेरी लावल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जयंत पाटील, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनीही खरात यांच्या दरबारात हजेरी लावल्याचं समोर आलं आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या सर्व प्रकारावर संतापही व्यक्त केला आहे.
पुरावे मिळू द्या
रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला. दीपक केसरकर यांचंही काही करू. फक्त पुरेसे पुरावे मिळू द्या, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दमानिया यांचं पुढचं टार्गेट आता केसरकर असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पाच सहा केसेसमध्ये काहीच केलं नाही
रुपाली चाकणकर यांनी काल सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा दिला आहे. महिला आयोग महिलांच्या सुरक्षेसाठी असतो. पण स्वार्थासाठी राजकीय मंडळी खरात सारख्या मंडळींना आधार देतात तेव्हा महिलांचा आधार जातो. पाच ते सहा केसेसमध्ये महिला आयोगाने काहीच केले नाही, अशी टीका दमानिया यांनी केली.
तरी तुम्हाला सोडणार नाही
रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर 24 तासात गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. सुनील तटकरे यांची बॉडी लँग्वेज बघितली. तुम्ही पाळलात तरी आम्ही लढू आणि सोडणार नाही. हा पहिला टप्पा आहे. जेवढे राजकारणी खरातकडून ओशनो जल घ्यायचे त्यांची नावे बाहेर आली पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणाला साफ करण्याची गरज आहे. रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.