Ashok Kharat: अशोक खरात जेरबंद होताच पेटलं मिरगाव; ग्रामस्थांची कुणाला थेट गावबंदीची हाक, मोठा उद्रेक… घडतंय काय?
Tv9 Marathi March 21, 2026 03:45 PM

Ban to Ashok Kharat village Mirgaon: कॅप्टन अशोक खरात याने अनेक महिलांचे जीवन नासवले. भोंदूगिरी करत, जीवे मारण्याची धमकी देत त्यांचं लैंगिक शोषण केले. त्याने राजकीय बळ वापरत अनेक ठिकाणी जमिनी हडपल्या, जमिनी बळकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचा गोरखधंदा समोर येत आहे. काळ्या कारनाम्यांमुळे समाजमन सुन्न झालं आहे. त्याला जेरबंद करताच त्याच्याविरोधात अनेक जण तक्रार देण्यासाठी समोर येत आहेत. त्याच्यावरचा राजकीय वरदहस्त दूर झाल्याचा संदेश पोहचताच त्याच्याविरोधात अनेकजण बोलत आहे. नाशिक जिल्ह्यातील मिरगावातही मोठा उद्रेक दिसून येत आहे. येथील ग्रामस्थांमधील उद्रेक समोर आला आहे.

खरात जेरबंद होताच ग्रामस्थ आक्रमक

नाशिक जिल्ह्यातील मिरगावात भोंदुबाबा अशोक खरातच्या अटकेनंतर त्याच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. ज्या गावात कॅप्टन अशोक खरातने कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं, त्याच मिरगावात आता त्याच्याविरोधात ग्रामस्थ उघडपणे आक्रमक झाले आहेत. वर्षानुवर्षे खरातच्या दहशतीखाली दबून गेलेले गावकरी आता निर्भयपणे पुढे येत आहेत. भीतीमुळे माध्यमांसमोर बोलायलाही तयार नसलेले ग्रामस्थ आता त्याचे कथित काळे कारनामे उघड करू लागले आहेत. पोलिस कारवाईनंतर गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून “आता गप्प बसणार नाही” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

खरातला गावबंदीचा ठराव

गावात आता निर्णायक पाऊल उचलण्याची तयारी सुरू झाली आहे. अशोक खरातला गावबंदी करण्याचा ठराव लवकरच ग्रामसभेत मांडला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर खरात अध्यक्ष असलेल्या ईशान्यश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा कारभार ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याची जोरदार मागणीही होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात देवस्थानचा कारभार ग्रामस्थांकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ग्रामसेवकावर ग्रामस्थांचा संताप

दरम्यान, ग्रामसेवक गैरहजर असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप अधिकच वाढला आहे. ग्रामसभा तात्काळ बोलावण्यासाठी ग्रामसेवकाने त्वरित हजर व्हावे, अशी ठाम मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. भोंदुबाबाच्या अटकेनंतरमिरगावमध्ये भीतीचे सावट दूर होऊन संतापाचा उद्रेक होताना दिसत आहे. आता ग्रामसभेत कोणते निर्णय घेतले जातात आणि प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.