एका महिलेच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर तक्रारीनंतर महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय वेगवान आणि गोपनीय कारवाई करत आरोपीला जाळ्यात टाकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रीन सिग्नलनंतर सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये राजकीय-प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन विशेष रणनीती आखण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया इतकी गुप्त ठेवण्यात आली की, बातमी लीक होण्याची शक्यताही नव्हती.
फिर्यादी महिला तक्रार देण्यास तयार होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदेश मिळताच पोलिस यंत्रणा ‘अॅक्शन मोड’वर आली. आरोपी खरात यांचे राजकीय आणि प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन पोलिसांनी गुप्त प्लॅन तयार केला. बातमी बाहेर जाऊ नये म्हणून संपूर्ण ऑपरेशन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले.
सुरुवातीला तक्रारीचा ड्राफ्ट तयार करण्यात आला, त्यात खरात यांचे नावही टाळण्यात आले. पोलिस कर्मचाऱ्यांना फक्त ‘बंदोबस्त’चे आदेश देण्यात आले. खरी माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली गेली. एकूण पाच स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकाला फक्त आपले काम कळवण्यात आले, कोणालाही संपूर्ण प्लॅनची कल्पना नव्हती.
खरात घरात असल्याची खात्री झाल्यावर वरिष्ठांना गुप्त संदेश पाठवण्यात आला. त्यानंतर क्राईम ब्रँचने तत्काळ आरोपीला ताब्यात घेत अटकेची प्रक्रिया सुरू केली. अटकेनंतर खरात यांच्या कुटुंबीयांनी गोंधळ करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. प्रभावशाली व्यक्तींना फोन करून मोठ्या प्रमाणात दबाव आणण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, पोलिसांनी कोणत्याही दबावाला जुमानले नाही आणि प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले.