अखेर मुहूर्त ठरला! सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची तारीख आली समोर, तीन ठिकाणी रिसेप्शन
Tv9 Marathi March 21, 2026 05:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या लग्नाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रेवती सुळे यांचे लग्न २० जून रोजी मुंबईत पार पडणार आहे. नागपूरच्या प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्याशी रेवती यांचा विवाह होणार आहे. लग्नानंतर तीन ठिकाणी रिसेप्शन देखील ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रेवती सुळे या शरद पवार यांच्या नात आहेत. फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केली होती. त्यावेळी राजकीय वर्तुळातूनच या लग्नाची चर्चा रंगली होती. आता लग्नाची तारीख निश्चित झाल्याने पवार-सुळे कुटुंब आणि लखानी कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Supriya Sule (@supriyasule)

लग्न आणि रिसेप्शनचे ठिकाण

रेवती सुळे यांचा मुख्य विवाहसोहळा २० जूनला मुंबईत पार पडणार आहे. तसेच त्यांचे लग्नानंतरचे रिसेप्शन मुंबई, नागपूर आणि दिल्ली या तीन प्रमुख शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. या रिसेप्शनमुळे राजकीय, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.

लग्नाच्या तयारीला सुरुवात

सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबातील ही आनंदाची घटना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. रेवती सुळे यांचे लग्न नागपूरच्या प्रभावशाली लखानी कुटुंबाशी जुळल्याने महाराष्ट्रातील राजकीय आणि व्यावसायिक संबंधांना नवे आयाम मिळण्याची शक्यता आहे. लखानी कुटुंब हे विश्‍वराज ग्रुपशी संबंधित असून, नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात ओळखले जाते. या लग्नामुळे पवार कुटुंबातील सनई-चौघडे वाजण्याची तयारी सुरू झाली असून, समारंभ साधेपणाने पण उत्साहाने साजरा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. रेवती आणि सारंग यांच्या या जोडप्याला सर्व स्तरांतून शुभेच्छा मिळत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.