संपदा सोवनी - sampada.sovani@esakal.com
उन्हाळी सुट्टी आणि व्याघ्र सफारी हे एक समीकरण आहे. आपल्या राज्याला व्याघ्र अभयारण्यांचा मोठा वारसा लाभला आहे. वाघांच्या दर्शनाचा ऐन हंगाम सुरू झाला की, बातम्यांमधून त्यांची आकर्षक नावे वाचायला मिळतात. बिजली, मटकासुर, कॅटरिना, लारा, जय, गब्बर, रावण, मुन्ना, माया, ही सगळी नावे वाचकांना परिचितच आहेत. त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले असो वा नसो, त्यांच्या दर्शनाच्या थरारकथा ऐकाव्याशा वाटतात. अशा ५१ कथा संजय करकरे यांच्या ‘कथा वाघांच्या’ या पुस्तकातून वाचकांच्या भेटीस आल्या आहेत.
करकरे यांचा वनांशी मोठा परिचय आहे. सृष्टी कंझर्वेशन फाउंडेशनमध्ये उपसंचालक म्हणून, तसेच बॅनियन ट्री फाउंडेशनमध्ये प्रकल्प प्रमुख म्हणून नागपूरमधून काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. तसेच, त्यांचा पिंड पत्रकाराचा. त्यामुळे ताडोबा, पेंच, बोर, नवेगाव- नागझिरा, मेळघाट, उमरेड या सर्व ठिकाणी त्यांनी भटकंती केली आहे. या भटकंतीतून वनाकडे, वाघांकडे पाहण्याची त्यांना प्राप्त झालेली दृष्टी या वाघांच्या कथांमध्ये उमटली आहे.
प्रत्येक वाघाच्या कथेला काही तरी स्पष्ट पार्श्वभूमी आहे. या कथा जरी लहान लेखांच्या स्वरूपात असल्या, तरी करकरे यांनी ती पार्श्वभूमी सविस्तरपणे मांडली आहे. स्थानिक लोक, जाणकार, यंत्रणा आणि स्वतः लेखक हे सर्व दृष्टिकोन त्यात येतात. उदाहरणार्थ, जय हा प्रसिद्ध वाघ बेपत्ता झाल्याची कथा सांगताना जसा जयचा इतिहास येतो, तसाच त्याच्या शोधाचा प्रवास आणि त्याबरोबर समजणाऱ्या वेगवेगळ्या बातम्या यांचाही अंतर्भाव लेखकाने पुस्तकात केला आहे.
एका वाघाने वाघिणीला मारणे आणि खाणे, दोन वाघांची तुंबळ मारामारी, आपले क्षेत्र राखण्यासाठीची धडपड, बिजली या वाघिणीने स्वतःच्या पिल्लाबरोबर आपल्या आईच्या पिल्लाचाही सांभाळ करणे, २९ बछडे देणारी आणि त्यांचा छान सांभाळ करणारी ‘सुपरमॉम’ ही कॉलरवाली वाघीण, वाघांचे प्रेमाराधन, उतरवयात त्यांचा रुबाब कमी झाल्याची लक्षणे, या गोष्टी लक्षवेधी पद्धतीने त्यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत. प्रत्येक गोष्टीत त्या त्या वाघाची शारीरिक वैशिष्ट्ये, स्वभाववैशिष्ट्ये उत्तम निरीक्षणाद्वारे सांगितली आहेत. उत्साही पर्यटक यातील काही गोष्टी प्रत्यक्ष सफारीच्या वेळी लक्षात ठेवतील.
Marathi book : काव्यपत्र: ध्रुव भट्टांच्या 'डाव मांडला'तून आठवणींचा अनोखा प्रवासजंगल आणि मानव यांचा संबंधदेखील या लेखनात वारंवार अधोरेखित होतो. वन्यप्राणी आणि माणूस यांच्या संघर्षाला सध्या वेगळीच धार चढली आहे. त्या पार्श्वभूमीवर व्याघ्र संवर्धन हा विषय काही प्रमाणात या पुस्तकात आला आहे. माणूस आणि वन्यप्राणी यांना सहजीवनाला पर्याय नाही. त्याचे विविध उपाय सध्या चर्चिले जात असताना या पुस्तकात जंगलाच्या राजाचे जग उलगडते आणि ते एका भावनिक स्पर्शासह आपल्यासमोर येते.
वाघ कशाला वाचवायचा, असा प्रश्न अनेक मंडळी विचारतात. १९७० पर्यंत वाघांची संख्या देशात २ हजाराच्या खाली आली होती. वाघांना संघटित शिकारी टोळ्या, जंगलांमधून जाणाऱ्या रस्त्यांचे जाळे अशा अनेक गोष्टींचा धोका आहे. परंतु, भारताने व्याघ्र संवर्धनाचे एक यशस्वी प्रारूप जगापुढे ठेवले आहे. वाघाच्या संरक्षणाबरोबरच इतरही दुर्मीळ होत चाललेल्या प्राण्यांना कसे संरक्षण मिळते याबद्दलची माहितीही करकरे यांनी पुस्तकाच्या शेवटी लिहिली आहे. वाघ बघायला गेल्यावर तो दिसलाच पाहिजे असा अट्टहास असलेले पर्यटक, ‘व्हायरल’ करण्यासाठी व्हिडिओ घेऊ पाहणारे आणि वाघाबरोबर चक्क सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणारे पर्यटक, हे मुद्देही त्यात आले आहेत.
व्याघ्र पर्यटनात वाघ कधी दिसेल किंवा दिसेल का, याची शाश्वती देता येत नाही. अनेकदा खूप वेळ प्रतीक्षा करूनही काहीच हाती लागत नाही. मग कधी तरी अवचित वेळी त्या वनाचा सम्राट दर्शन देतो आणि वाट बघून कंटाळलेल्या कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट सुरु होतो. वाघाच्या दर्शनाचे असे अनेक अनमोल क्षण करकरे यांनी रंजकपणे उलगडले आहेत.
ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी वाघ आणि जंगल या विषयावर विपुल लेखन केले आहे. ते अतिशय लोकप्रिय आहे. त्याची आठवण या आजच्या वाघ-कथा वाचताना वाचकांना होऊ शकते. या वाचनप्रवासात भेटलेल्या एका तरी वाघाला प्रत्यक्ष पाहावे अशी इच्छा वाचकाला निश्चितच होईल.
पुस्तकाचे नाव : कथा वाघांच्या
लेखक : संजय करकरे
प्रकाशक : साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी, नागपूर
पृष्ठे : २४१ मूल्य : ३५० रु.