नाशिकमधील भोंदू ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. अशोक खरातने अनेक महिलांनावर बलात्कार करुन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. काही महिलांसोबतचे त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान, अशोक खरातचे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे देखील फोटो व्हायरल झाले. त्यानंतर एकच खळबळ माजली. त्यांच्यावर टीका झाली आणि आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांना अजून फटका बसला आहे.
नेमकं काय झालं?
काल देवगिरी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची वेळ चाकणकर यांच्यावर आली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.
कालच्या बैठकीत मोठा निर्णय
काल देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यात बैठक झाली. ही बैठक सुमारे एक तास चालली. बैठकीत महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून रुपाली चाकणकर यांना हटवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. पक्षातील अनेक नेत्यांनी या प्रकरणात चाकणकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. या निर्णयामागे मुख्य कारण म्हणजे कॅप्टन अशोक खरात यांच्याशी संबंधित ‘भोंदू बाबा’ प्रकरण. या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
पक्षातील सूत्रांच्या मते, कालच्या बैठकीत चाकणकर यांना स्वतःहून राजीनामा देण्याचा सल्ला देण्यात आला. अन्यथा पक्षाकडून औपचारिक नोटीस बजावण्याची तयारीही करण्यात आली होती. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने चाकणकर यांच्या राजकीय जीवनाला मोठा धक्का बसला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
पदासाठी नवी नावे चर्चेत
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी आता दोन नवी नावे चर्चेत आली आहे. पुण्यातील वैशाली नागवडे यांच्या नावाचा विचार केला जातोय. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील प्रतिशा शिंदे यांच्या नावाची चर्चा होत आहे. या दोन्ही नावांपैकी एका नावाची निवड केली जाऊ शकते. परंतु या निवडीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे भविष्यात काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.