महाआर्यमन सिंधिया यांचा दोन दिवसाचा दौरा, महाआरोग्य शिबिरासह क्रीडा कार्यक्रमांना लावणार हजेरी
Tv9 Marathi March 23, 2026 04:46 PM

मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे युवा अध्यक्ष महाआर्यमन सिंधिया हे मध्यप्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघात दोन दिवसाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते येथे भरणाऱ्या एका महा आरोग्य शिबीराला भेट देणार आहेत. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून उपचारासाठी आलेल्या रुग्णांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते या लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या क्रीडा कार्यक्रमांनाही हजेरी लावणार आहे. दोन दिवसाच्या या दौऱ्यात ते मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे सिंधिया यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण मध्यप्रदेशचं लक्ष लागलं आहे.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रयत्नाने गुना लोकसभा मतदारसंघातील शिवपुरी-अशोकनगर भागात महा आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या आरोग्य शिबिरात हजारो रुग्ण उपचारासाठी येणार आहेत. विशेष म्हणजे या रुग्णांवर दिल्लीच्या एम्स आणि मॅक्स हॉस्पिटलमधील प्रख्यात डॉक्टरांकडून उपचार करण्यात येणार आहे. तसेच ज्या रुग्णांचं ऑपरेशन करायचं त्यांचं ऑपरेशनही या तज्ज्ञ डॉक्टरांकडून केलं जाणार आहे. त्यामुलेच महाआर्यमन सिंधिया या महाशिबिराला भेट देणार आहेत. तसेच संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेऊन डॉक्टरांशी चर्चा करणार आहेत. त्याशिवाय रुग्णांशीही संवाद साधणार आहेत.

रोज हजारो रुग्णांवर उपचार

शिवपुरीत सुरू असलेल्या या आरोग्य शिबिरात रोज 9 ते 12 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. गुना, ग्वाल्हेर आणि चंबळ खोऱ्या शिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही रुग्ण या शिबिराचा लाभ घेण्यासाठी येत आहेत. या आरोग्य शिबिरामुळेच आतापर्यंत शेकडो रुग्णांची सर्जरी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सर्जरी निशुल्क करण्यात आली असून निशुल्क उपचारही करण्यात येत आहेत. या आरोग्य शिबिरात मुलींसाठी एजपीव्ही व्हॅक्सीनही ठेवण्यात आल्या आहेत. ही व्हॅक्सीन उपलब्ध व्हावी आणि मुलींनी ती घ्यावी म्हणून खुद्द केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि नंतर ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील महाराणी प्रियदर्शनी राजे सिंधियाही या शिबिरात आल्या होत्या.

तिसऱ्यांदा दौरा

याचबरोबर महाआयर्मन हे मुंगावली आणि अशोकनगरमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभागी होऊन खेळाडूंचा उत्साह वाढवणार आहेत. तीन महिन्यात दुसऱ्यांदा महाआर्यमन सिंधिया हे गुना, अशोक नगर आणि शिवपुरी येथील जनतेला भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. याआधी जानेवारीत त्यांनी गुना येथे येऊन इथल्या नागरिकांशी संवाद साधला होता.

असा असेल दौरा

आज 23 मार्च रोजी महाआर्यमन यांचा दौरा सकाळी 8 वाजून 10 मिनिटाने सुरू झाला. रात्री 11.30 वाजेपर्यंत त्यांचा दौरा असेल. या काळात ते विविध ठिकाणांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधतील. आरोग्य शिबिरासह क्रिकेट टुर्नामेंटलाही हजेरी लावतील. रात्री त्यांचा मुक्काम शिवपुरी येथे असेल. त्यानंतर उद्या 24 मार्च रोजी त्यांचा दौरा सकाळी 9 वाजून 45 मिनिटाने सुरू होईल. तो संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटाने संपेल. दिवसभराचे कार्यक्रम आटोपून संध्याकाळी ते दिल्लीला रवाना होतील.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.