कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
विजय केसरकर, एबीपी माझा March 23, 2026 08:13 PM

कोल्हापूर : जिल्ह्यातील (Kolhapur) ज्योतिबा मंदिर परिसरात काल परिते गावातील काही नागरिक दर्शनासाठी गेले होते. यावेळी पुजारी आणि या नागरिकांमध्ये तुंबळ हाणावरी झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. ज्योतिबा मंदिरात 15 ते 20 पुजाऱ्यांनी मिळून दोन भाविकांवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला. व्हायरल झालेल्या (Viral video) व्हिडिओमध्ये संबंधित पुजारी भाविकांच्या अंगावर अक्षरशः तुटून पडल्याचे दिसून आले. याप्रकरणी आता पुजारी आणि भाविकांसह 30 जणांवर गुन्हा (Police) दाखल करण्यात आला आहे. परिते ग्रामस्थही घडल्या प्रकारावरुन आक्रमक झाल्याचं दिसून आलं.  

प्रसिद्ध ज्योतिबा मंदिरातील धक्कादायक प्रकार समोर आला असून मंदिर परिसरात काही पुजाऱ्यांकडून परीते गावातील दोन भाविकांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर, व्हिडिओत दोन ते तीन पुजाऱ्यांनी भाविकांच्या डोक्यात नारळ मारल्याचेही समोर आले आहे. ही मारहाण नेमकी कोणत्या कारणावरून झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. एका बाजूला काही नागरिक मद्यप्राशन करुन हुलडबाजी करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच देवकार्यात आणि देवाच्या छबिना सोबत छेडछाड केल्याच्या प्रकरणातून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान परिते ग्रामस्थांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मद्य प्राशन केल्याचा दावा खोडून काढत ज्योतिबा मंदिर मधील पुजाऱ्यांनी या वादाची सुरुवात केल्याचं परिते ग्रामस्थांचं म्हणणं आहे. गावचे सरपंच मनोज पाटील यांनी याबाबत माहिती दिली.  

या प्रकरणात परिते गावातील भाविकांना पुजाऱ्यांनी मारहाण केल्यामुळे गावकरी आक्रमक झालेले आहेत. परिते गावातील ग्रामस्थांनी आज गावात निषेध फेरी काढत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. मारहाण करणाऱ्या संबंधित पुजाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील केली आहे. कालच्या या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात 15 पुजारी आणि 15 भाविकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

पोलीस कारवाईकडे लक्ष

मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जोतिबा देवाची चैत्र यात्रा उद्या काही दिवसांवर आली असतानाच ही घटना घडल्यामुळे भाविकांमध्ये संतापाची देखील लाट आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. 

Ashok Kharat: अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.