आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. या 19 व्या मोसमात एकूण 10 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या घवघवीत यशानतंर अपवाद वगळता सर्वच देशात टी 20 लीगचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातंय. या टी 20i लीग स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळतंय. तसेच खेळाडू मालामालही होतायत. त्यामुळे आजूबाजूला क्रिकेट वर्तुळात टी 20 लीग स्पर्धेची चलती पाहायला मिळत आहे. त्यात आता आणखी एका देशात टी 20i लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे.
भारतानंतर, ऑस्ट्रेलिया (BBL), वेस्ट इंडिज (CPL), अमेरिका, दुबई आणि इतर देशांमध्ये टी 20 लीग स्पर्धा यशस्वी झाली. त्यानंतर आता न्यूझीलंडमध्ये टी 20I क्रिकेट लीग स्पर्धेचा थरार रंगणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने टी 20 लीग स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सुपर स्मॅश टी 20 जागी NZ20 फ्रँचायजी लीग स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ भिडणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2027 पासून या स्पर्धेला सुरुवात होऊ शकते. विशेष म्हणजे पुरुष आणि महिला या दोघांसाठी ही स्पर्धा होणार आहे.
NZ20 लीग स्पर्धेच्या प्रस्तावात काही बदल अपेक्षित असल्याचं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष लिंडन यांनी म्हटलं. “आम्ही NZ20 च्या सोबतीने या स्पर्धेत महिलांनाही सहभागी करावं यासाठी आग्रही आहोत”, असं लिंडन यांनी नमूद केलं. “प्रत्येक संघात त्या त्या भागातील स्टार खेळाडू असल्यास युवा क्रिकेटपटूंना त्यांना पाहण्याची संधी मिळेल”, असंही लिंडन म्हणाले.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून टी 20 लीग स्पर्धेला सुरुवात करण्यात आल्यास आर्थिक फायदा होऊ शकतो. या एकूण 6 संघांमध्ये उद्योगपतींनी गुंतवणूक केल्यास बोर्डाला तगडा फायदा होईल. तसेच स्पर्धेनिमित्ताने युवा खेळाडूंची नवी फळी तयार होईल. युवा खेळाडूंना ओळखीसह पैसाही मिळेल. न्यूझीलंडमध्ये क्रिकेटचा प्रचार आणि प्रसारही होईल.
दरम्यान भारतात आयपीएल निमित्ताने टी 20 लीग स्पर्धेचा प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर अनेक देशांमध्ये क्रिकेट बोर्डाकडून टी 20 लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. इंग्लंडमध्ये द हंड्रेड, बांगलादेशमध्ये बांगलादेश प्रीमियर लीग, दक्षिण आफ्रिकेत एसए20, पाकिस्तानमध्ये पीएसएल या स्पर्धेचं आयोजन केलं जातं.