शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
Marathi March 23, 2026 08:25 PM

मुंबई : भारतीय शेअर बाजारात पुन्हा घसरण सुरु झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. सेन्सेक्स 1837 अंकांनी कमी होत किंवा 2.46 टक्के घसरण होऊन 72696 अंकांवर पोहोचला आहे. निफ्टी  50 निर्देशांक 602 अंकांची घसरण होऊन 22512 अंकांवर बंद झाला. बीएसई 150 मिडकॅप आणि बीएसई 250 स्मॉलकॅप निर्देशांकात 4 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Share Market Update : गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले

शेअर बाजारात सुरु असलेल्या घसरणीमुळं  बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य घसरलं. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य शुक्रवारी 429 लाख कोटी रुपयांवर होतं. त्यात 14 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. आज बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 415 लाख कोटींवर आलं आहे.

शुक्रवारी शेअर बाजारात थोडी तेजी दिसून आली होती. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार पुन्हा कोसळला. या घसरणीमागे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धाची वाढलेली तीव्रता हे आहे. अमेरिकेनं इराणला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास 48 तासांची मुदत दिलेली आहे. तर, इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी फक्त दुश्मन देशांसाठी बंद असल्याचं म्हटलंय.

भारतीय रुपयाचं होणारं अवमूल्यन हे देखील शेअर बाजारातील घसरणीला कारणीभूत आहे. भारतीय रुपया 26 पैशांनी कमजोर होत डॉलरच्या तुलनेत 93.97 रुपयांवर पोहोचला.

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात आता ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले होऊ लागले आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे सुरु नसल्यानं जगभरातील क्रूड ऑईलच्या दरात वाढ झाली आहे. याचा फटका देखील भारताला बसत आहे. क्रूड ऑईलचे दर 70 डॉलर प्रति बॅरलवरुन 110 डॉलर प्रति बॅरलच्या वर पोहोचले आहेत. भारत मोठ्या प्रमाणात खनिज तेलाची आयात करत असल्यानं भारताचा तेल खरेदीसाठी होणारा खर्च वाढला आहे.

क्रूड ऑईलच्या दरात झालेली वाढ आणि रुपयाचं होत असलेलं अवमूल्यन यामुळं विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून अमेरिका आणि इराण युद्ध सुरु झाल्यापासून 1 लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. एनएसडीएलवरील डेटानुसार गुंतवणूकदारांनी 103967 कोटी भारतीय बाजारातून काढून घेतले आहेत.

आशियातील मुख्य बाजारात जपानचा निक्केई आणि कोरियाचा कोस्पी या निर्देशांकात 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. यूरोपमधील शेअर बाजारांमध्ये 2 टक्क्यांची घसरण देखील झाली आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.