नाशिक : शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातची (Ashok Kharat) एसआयटीकडून (SIT) सोमवारी तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांनी अशोक खरातची स्वतः चौकशी केली. यावेळी त्यांनी खरातकडून इतर गुन्ह्यांचेही जबाब नोंदवून घेतले असल्याची माहिती आहे.
एसआयटीच्या एका टीमने नाशिकमधील कॅनडा कॉनर येथे असलेल्या प्रॉपर्टीची पीडित महिलांसोबत जाऊन खरातची मोडस ऑपरेंडी जाणून घेतली. मंगळवारी अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे अशोक खरातला मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
पोलिसांकडून अशोक खरातचं कार्यालय तसंच इतर कागदपत्रं तपासणी करत सबळ पुरावे गोळा करण्यात येत असल्याची माहिती आहे. महिलांना भोंदू अशोक खरात कशा पद्धतीने जाळ्यात अडकवत होता याचा सखोल तपास केला जात आहे.
भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचने तपासणी केली. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परसरातील ओकस कार्यालयाची क्राईम ब्रांचने तपासणी केली असून याच कार्यालयात महिलांचं शोषण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी पीडित महिलांना सोबत घेऊन कार्यालयाची तपासणी केली. तसंच या कार्यालयातून अनेक जमिनींचे व्यवहारदेखील झाल्याची माहिती मिळाली आहे.
नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात विरोधात आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोंदू खरातवर आतापर्यंत 6 गुन्हे दाखल झाले आहेत. खरातविरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. नाशिक पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला असून अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचं आवाहन एसआयटी प्रमुखांनी केलं. त्यामुळे खरातच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे.
बुवाबाजी करत खरातनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. भोंदू अशोक खरातनं रबराचा नकली नाग आणि वाघाचं कातडं दाखवून अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. खरात नाशिकच्या मीरपूर येथील ईशानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा. त्या ठिकाणी भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्ये करुन खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा.
धक्कादायक म्हणजे साधं चिंचोका हे एखादं रत्न असल्याच्या भूलथापा मारत खरातनं हे कवडीमोल चिंचोके एक लाखांना विकल्याचं समोर आलं. ही सर्व चक्रावून टाकणारी माहिती खरातच्या एका निटकवर्तीयाच्या एफआयआरमधून समोर आली.
ही बातमी वाचा: