खरातच्या संस्थानचं उत्पन्न साडे चार लाखांवरून वर्षाला अडीच कोटींवर; खडे, चिंचोके मंतरून लाखोंना विकायचा
esakal March 24, 2026 02:45 AM

भोंदूबाबा अशोक खरात याला अटक केल्यानंतर त्याची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे. खरातच्या मिरगाव येथील शिवनिका संस्थानच्या उत्पन्नात गेल्या काही वर्षात मोठी वाढ झालीय. जवळपास दहा वर्षांपूर्वी या संस्थानचं वार्षिक उत्पन्न साडे चार लाख इतकं होतं. आज त्याच संस्थानचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर पोहोचलं आहे. ही वाढ जवळपास ७४ पट इतकी आहे.

‘श्री शिवनिका संस्थान’च्या उत्पन्नात गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल ७४ पटीने वाढ झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. संस्थाननेच धर्मादाय आयुक्तालयाकडे सादर केलेल्या लेखापरीक्षणातून ही बाब उघड झाली असून, अचानक वाढलेल्या उत्पन्नामुळे संस्थानमधील आर्थिक व्यवहाराविषयी संशय व्यक्त होत आहे. महिलांच्या लैगिंक अत्याचारामुळे कॅप्टन खरात याच्याभोवती फास आवळला जात असतानाच त्यात आणखी भर पडली आहे, ती त्याच्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानातील आर्थिक गैरव्यवहारांची.

खरातच्या पायाच पडणार! मला तो सारखं बोलवायचा, एकदा अर्ध्या वाटेत गेलो अन्...; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अनुभव

संस्थानने धर्मदाय आयुक्तालयाला सादर केलेल्या लेखापरीक्षणानुसार, या संस्थानची गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी संस्थानची आर्थिक स्थिती तुटीची होती. संस्थानचे २०१८-१९ पर्यंत खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी आर्थिक स्थिती होती. सुमारे १ लाख ६० हजार ते १ लाख ६५ हजारांची तूट असताना, २०१९-२० मध्ये अचानक संस्थानच्या मालमत्तेमध्ये भरमसाठ वाढ झाली. ७ लाखांवरून थेट १ कोटी ४१ लाखांवर उत्पन्न गेले. २०२४ मध्ये तर, संस्थानचे एकाच वर्षात तब्बल ७६ लाख ९१ हजार ४१६ रुपयांच्या भरघोस देणग्या आल्या. तब्बल ७४ पटींनी ही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अचानक वाढलेल्या या उत्पन्नाचा शोध आता पोलिस घेत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मंतरलेले खडे

कॅप्टन खरात त्याच्याकडे येणाऱ्या हायप्रोफाईल वर्गातील लोकांना त्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी बाजारात शंभर रुपये किलोने मिळणारे खडे, चिंचोके मंतरलेले असल्याचे भासवून लाखो रुपयांना विकायचा. मिरगावातील त्याच्या श्री इशान्येश्वर मंदिरात तो पूजाविधीही करायचा. त्यामाध्यमातूनही तो लाखो रुपये उकळत होता. हेच पैसे तो संस्थानच्या बँक खात्यावर घेत असल्याचेही समोर येते आहे. त्याच्या या आर्थिक साम्राज्याच्या धाग्यादोऱ्याचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.